Home > Max Woman Blog > भातुकलीच्या खेळातील राजा राणीचे अर्धशतक!

भातुकलीच्या खेळातील राजा राणीचे अर्धशतक!

`भातुकलीच्या खेळामधले राजा आणिक राणी...!' ही अजरामर कलाकृती निर्माण झाली त्या घटनेला आता तब्बल 50 वर्षे पूर्ण होत आहेत. पण मराठी मनावरचे या भातुकलीचे भारुड काही अद्याप उतरलेले नाही. मागील दोन पिढ्यांत या पठडीतील अनेक गीते आली व गेली. पण पाडगावकर, देव व दाते यांनी मांडलेला हा विलक्षण भातुकलीचा खेळ मात्र तसाच चालू आहे व आणखी काही दशके तरी ही भातुकली कुणी मोडणार नाही वा सोडणारही नाही. दुर्दैव हेच की हे तीनही कलाकार आज आपल्यात नाहीत.

भातुकलीच्या खेळातील राजा राणीचे अर्धशतक!
X

मराठी मनाला 1960, 70 व 80च्या दशकांत भुरळ घालणारी जी माध्यमे होती, त्यात रेडिओवर वाजणाऱ्या भावगीतांचा हिस्सा सर्वात मोठा. ज्या काळात तासन् तास चालणारी नाट्यगीतांची जादू ओसरू लागली व त्यामुळे संगीत नाटकांचा जमानाही मावळत चालला, त्याच काळात भावगीते हा काव्यप्रकार मराठी मनाला मोहवू लागला होता. एका बाजूला कविवर्य ग. दि. माडगूळकर व सुधीर फडके यांनी शब्दबद्ध व सूरबद्ध केलेली भावगीते मराठी मनात रुजू व ओठांवर घोळू लागली होती, त्याच काळात यशवंत देव, मंगेश पाडगावकर व अरुण दाते या त्रिकुटानेही मराठी भावविश्वात आपले साम्राज्य स्थापन करायला सुरूवात केली. या भावमंदिरावर कळस चढवला याच त्रिकुटाने साकारलेल्या `भातुकलीच्या खेळामधले राजा आणिक राणी...!' या विराणीने.

`भातुकलीच्या खेळामधले राजा आणिक राणी...!' ही अजरामर कलाकृती निर्माण झाली त्या घटनेला आता तब्बल 50 वर्षे पूर्ण होत आहेत. पण मराठी मनावरचे या भातुकलीचे भारुड काही अद्याप उतरलेले नाही. मागील दोन पिढ्यांत या पठडीतील अनेक गीते आली व गेली. हिंदी व आता इंग्रजी गाण्यांचीही गोडी मराठी माणसांना लागली. पण पाडगावकर, देव व दाते यांनी मांडलेला हा विलक्षण भातुकलीचा खेळ मात्र तसाच चालू आहे व आणखी काही दशके तरी ही भातुकली कुणी मोडणार नाही वा सोडणारही नाही. दुर्दैव हेच काही ही भातुकली साकारणारे तीनही कलाकार मंगेश पाडगावकर, यशवंत देव व अरुण दाते आज आपल्यात नाहीत.

ती पुढच्या पिढ्या चालवत राहतात. त्यामुळे अर्थातच मूळ कलाकारांचे स्मरण चाहत्यांना सतत होत राहते. हीच तर सर्जनशील कलाकृतींची खरी जादू असते. मराठीत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ नंतर बहिणाबाई अशांच्या ओव्या, अभंग असेच पिढ्यान् पिढ्या चालत आपल्यापर्यंत आले व पुढच्या पिढ्यांपर्यंतही ते तसेच पोहोचतील. त्यांच्या रचना व विसाव्या शतकात उदयास आलेल्या कवींच्या व गायकांच्या यांच्या कलाकृती यामध्ये रसिकाला खिळवून ठेवण्याची हातोटी तशीच असली, तरी त्यांची तुलना होऊ शकत नाही. टाळ-मृदंग यांच्या खेरीज कोणतीही वाद्ये न वापरता ज्ञानेश्वर-तुकयाच्या ओव्या, भारुडं व अभंग, घराघरात व मनामनात पोहोचले व रुजले. विसाव्या शतकात संगीतकार व गायकांच्या साथीला वाद्यवृंद व पुढे अद्ययावत ध्वनिमुद्रण यंत्रसामुग्री आली. त्यामुळे गीत व संगीताचा व गायकीचा दर्जा बदलला हे खरे, पण त्याचबरोबर स्पर्धाही वाढली. त्यामुळेच विसाव्या शतकातील व त्यापूर्वीच्या संगीताची व आताच्या संगीताची तुलना करू नये, हेच बरे!

कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी अनेक लयबद्ध कविता लिहिल्या, त्याची सुमधूर गीते झाली. गीतकार व संगीतकार यशवंत देव यांनी तर वेगवेगळ्या घाटणीच्या गीतांना सूरबद्ध करून अजरामर केले. गायक अरुण दातेंच्या गायकीचा बाज अगदीच वेगळा व तत्कालीन मराठी रसिकांना अपरिचित होता. त्यांचा जन्म मध्य भारतातला - इंदूरचा. सुप्रसिद्ध शास्त्रोक्त गायक रामुभय्या दाते हे त्यांचे साहजिकच सुगम संगीतापेक्षा शास्त्रोक्त गायकीतच त्यांची तालीम झाली होती. त्यांनी गझलांच्या बाजाची मराठी गाणी गायला सुरुवात केली व त्यात प्राविण्य व लोकप्रियताही कमावली होती.

या तिघांनी एकत्र येऊन जी मराठी गीते सादर केली, ती अजरामरच ठरली. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी हे त्यातलेच एक गीत. या त्रिकुटाने त्यापूर्वी व नंतर आणखी पाच गीते सादर करून ती अजरामर केली. अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी, भेट तुझी-माझी स्मरते अजुन त्या दिसाची, धुके दाटले हे उदास उदास, दिवस तुझे हे फुलायाचे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या गीतांनी करोडो मराठी मनावर कधी हलकेच फुंकर घातली, तर कधी सुखद फुंकर घातली. त्याबद्दल मराठी रसिक या तिघांच्या कायमच ऋणात राहतील.

भातुकलीच्या खेळा..हे गाणेच जणु आता मराठी संस्कृतीतील दंतकथा बनून राहिले आहे. या गीताबद्दलच्या अनेक कथा आणि दंतकथा! त्याची सत्यासत्यता आता कोण व कशी ताडून पाहणार? कारण त्यातील मुख्य पात्रेच आता या जगात नाहीत. असे म्हणतात की, सिद्धहस्त कवी पाडगावकर यांनी रेकाँर्डिंगच्या दोन महिने आधाीच हे गीत लिहून संगीतकार देवांकडे पाठवले. नंतर एकदा ते दोघे व दाते भेटले असता देवांनी ते गाणे ऐकवले. ती चाल ना पाडगावकरांना पसंत पडली ना दातेंना! त्या दोघांच्याही मते ती विराणी असल्याने तिला अशा भावगीताची चाल योग्य नाही. पण देव त्यांच्या सूररचनेवर ठाम होते. ते म्हणाले की, ही मुळात विराणी नाहीच. ते एक प्रेमभंगाचे दु:खद गीत आहे. त्याचा गायक पे्रमविरहात होरपळलेला पे्रमवीर नसून त्याची कथा तिसऱ्यानेच विशद केलेली आहे. त्यावर तिघांत बराच खल झाला. अखेर देवांच्या मनाप्रमाणेच करायचे ठरले. देवांनी शब्द दिला की पाहा, हे गाणे अजरामर होईल व तसेच झाले.

हे गीत आकाशवाणीवर सादर होताच ते कमालीचे लोकप्रिय झाले. आपली आवड या आकाशवाणीच्या साप्ताहिक कार्यक्रमात या गाण्याच्या फर्माइशीचा पाऊस पडू लागला. त्याची लोकप्रियता अशी की, अनेक वेळा विवाहाच्या समारंभांत ऑर्केस्ट्रावर हे गीत वाजवले जाई व लोकही ते आनंदाने ऐकत. स्वत: दातेच हा किस्सा त्यांच्या शुक्रतारा या कार्यक्रमात रंगवून सांगत.

पाडगावकरांनी जाहीरपणे सांगितलेला किस्सा असा की, हे गाणे सादर झाले, तेव्हा त्यांची कन्या कॉलेजात शिकत होती. तिच्या मैत्रिणींना वाटले की, पाडगावकरांचा खरेच कधी प्रेमभंग झाला असावा. त्यांनी ती गोष्ट पाडगावकरांच्या कन्येला सांगितली व त्यामुळे दु:खी झालेल्या त्या तरुणीने ते सारे काही आईला सांगितले. आई तिला म्हणाली, इतकेच ना! तुझे बाबा सकाळी बाजारात जातात, तेव्हा दररोज त्यांचे दोन-चार प्रेमभंग होतातच. स्वत: पाडगावकर हा किस्सा रंगवून रंगवून सांगत तेव्हा सभागृहात हास्याची थुईथुई कारंजी फुलत.

अशी जादू या गाण्याने केली होती. 1978 मध्ये नानासाहेब गोरे ब्रिटनचे हायकमिशनर झाले, त्यावेळी हे त्रिकूट ब्रिटनमध्ये गेले होते. तिथे इंडिया हाऊसमध्ये दातेंच्या गण्याचा कार्यक्रम झाला. स्वत: दाते तीन तास गायले. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ब्रिटिश अधिकारी अवाक झाले. एक गायक व केवळ दोन वादक इतक्या श्रोत्यांना तीन तास खिळवून ठेवतात, याचे त्यांना आश्चर्यच वाटत होते.

पुढे दोनच वर्षांनी बीबीसीने भातुकलीच्या खेळामधलीचे रेकॉर्डिंग केले. बीबीसीने मराठी गाण्याचे रेकाँर्डिंग करण्याची ती पहिलीच वेळ. असे अनेक किस्से व अनेक कथा! त्या किती सांगाव्यात व किती ऐकाव्यात!

या गाण्याचे शेवटचे चरण आहे, वाऱ्यावरती विरून गेली एक उदास विराणी! प्रत्यक्षात मात्र ती विराणी वाऱ्यावर विरुन न जाता मनामनात अमर झाली व मराठी संस्कृतीचा अविभाज्य भागच बनली!

- भारतकुमार राऊत

Updated : 28 Nov 2020 7:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top