Home > Max Woman Blog > 'खानदेशी रत्न बहिणाबाई चौधरी'

'खानदेशी रत्न बहिणाबाई चौधरी'

खानदेशी रत्न बहिणाबाई चौधरी
X

अरे संसार संसार
जसा तवा चुल्ह्यावर।
आधी हाताला चटके
तेव्हा मिळते भाकर।।

अवघ्या संसाराचे व आयुष्याचे इंगित अत्यंत सोप्या शब्दांत उलघडून सांगणाऱ्या अहिराणी भाषेतील कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा आज ६९ वा स्मृतिदिन! त्यांच्या प्रतिभासंपन्न स्मृतींस आदरांजली !

जळगांव जिल्ह्यातील असोदे गावात जन्मलेल्या बहिणाबाईंचा रिवाजानुसार वयाच्या दहाव्या वर्षीच लग्न झाले. वयाची विशी गाठेपर्यंत दोन अपत्येही झाली. त्यांना क्रमिक शिक्षण मिळालेच नाही. त्यामुळे लिहिण्या-वाचण्याचा प्रश्नच नव्हता.

पण बहिणाबाई जन्मत:च अफाट प्रतिभा व शब्द सामर्थ्य घेऊन आल्या होत्या. दळण-सारवण, पाणी भरणे व स्वयंपाक अशी गृहकृत्ये करतानाच बहिणाबाई काही तरी पुटपुटत. त्या 'कविता' होत्या हे पुढे त्यांचे पुत्र कवी सोपानदेव चौधरी यांच्या ध्यानात आले. त्यांनी त्या उतरवून काढल्या व आचार्य अत्रे यांच्या आशीर्वादाने 'बहिणाबाईंची कविता' हा संग्रह प्रकाशित झाला. खानदेशच्या मातीत दडून राहीलेले हे रत्न महाराष्ट्राला ठाऊक झाले.

त्यांच्या बहुतेक कविता ओवी वृत्तात बांधलेल्या आहेत. बहिणाबाईंच्या ३५ कविताच जगाला ठाऊक आहेत पण त्यांच्या 'ग्रामीण शहाणपणा'चे दर्शन घडवण्यास पुरेशा आहेत. गाव-खेड्यात दररोज दिसणारी प्रतिके घेऊन बहुणाबाईंनी वैश्विक सत्ये सांगितली. संत मुक्ताई, जनाबाई यांनी जशा रचना केल्या, तशाच बहिणाबाईंनी २०व्या शतकात केल्या.


'आला सास, गेला सास,
जीवा तुझं रे तंतर,

अरे जगनं-मरनं
एका सासाचं अंतर!'


किंवा 'लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते' अशा किमान शब्दात अर्थाची कमाल गाठणारे शब्द, किंवा

'देव कुठे देव कुठे -
आभायाच्या आरपार
देव कुठे देव कुठे -
तुझ्या बुबुयामझार'.

असे एखाद्या मोठ्या ग्रंथाचा विषय असणारे जीवनाचे तत्त्वज्ञान त्या साध्या, सोप्या, शब्दांत सहजपणे सांगून गेल्या आहेत. त्या शिकलेल्या नसल्या तरी साक्षात देवी सरस्वतीला त्या आपली आई मानीत. त्यांनी लिहिले:

माझी माय सरसोती
माले शिकवते बोली
लेक बहिनाच्या, मनी
किती गुपीतं पेरली !
माझ्यासाठी पांडुरंगा
तुझं गीता-भागवत
पावसात समावतं
माटीमधी उगवतं !
अरे देवाचं दर्सन
झालं झालं, आपससूक
हिरिदात सूर्याबापा
दाये अरूपाचं रूप
तुझ्या पायाची चाहूल
लागे पानापानांमधी
देवा तुझं येनंजानं
वारा सांगे कानामधी

वयाच्या ७१व्या वर्षी ३ डिसेंबर १९५१ रोजी बहिणाबाई गेल्या. एक अशिक्षीत पण शहाणी विदुषी निघून गेली. त्यांची ही कविता आजही गीताच्या रुपाने लोकप्रिय आहे. अरे खोप्यामधी खोपासुगडिणीचा चांगला

पहा पिल्लासाठी तिनं
झोका झाडाला टांगला
पिल्लं निजती खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिल्लांमधी जीव
जीव झाडाला टांगला
खोपा विणला विणला
जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी
जरा बघ रे माणसा
तिची उलूशीच चोच
तेच दात, तेच ओठ
तुले दिले रे देवानं
दोन हात, दहा बोटं

Updated : 3 Dec 2020 6:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top