Home > Max Woman Blog > भारत जोडो.. नव्या भारताची डिस्कव्हरी !

भारत जोडो.. नव्या भारताची डिस्कव्हरी !

इंदिरेचा नातू आलाय, आता चिंता नाही, असा आवाज विदर्भातून भारत जोडो यात्रा जाताना येत होता. भारत तुटलाच नाही तर भारत जोडो कशासाठी? असा सवाल उपस्थित केला जात होता. पण भारत जोडो यात्रा म्हणजे नेमकं काय? याविषयी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी आपलं मत मांडलं आहे.

भारत जोडो.. नव्या भारताची डिस्कव्हरी !
X

इंदिरेचा नातू आलाय... आता चिंता नाही..! विदर्भातून भारत जोडो यात्रा जात असताना अनेक ठिकाणी अशा प्रकारची वाक्यं ऐकू यायची. राहुल गांधींना काय गरज आहे इतकं चालायची, गाडीतून प्रवास करून भारत यात्रा काढता आली असती, रथयात्रा काढता आली असती.. पाच राज्यांमध्ये निवडणुका आहेत, त्या सोडून भारत जोडो का...? अशा असंख्य प्रश्नांना खेड्यापाड्यातील लोकांच्या या प्रतिक्रिया एक मजबूत उत्तर असल्यासारखं वाटायचं.

देशातील माध्यमांनी या देशात घडत असलेला इतिहास न दाखवण्याचा प्रयत्न केला. दररोज उठून राहुलजींबाबत नवनवीन कहाण्या पसरवायला सुरूवात केली. राहुलजींनी जेव्हा कन्याकुमारीवरून सुरूवात केली तेव्हाच मोदी सरकारचा पाया हादरला. मग दररोज फेक न्यूज पेरायचा धंदा सुरू झाला. पण राहुलजींच्या चेहऱ्यावर त्यांचा निग्रह दिसत होता. जसजसे ते चालत गेले तसतसा तो निग्रह अधिक दृढ होत जाताना दिसत होता. होणाऱ्या प्रत्येक हल्ल्याला ते हसून सन्मान देत होते. कुठेही द्वेष नाही, कुठेही अनाठायी आक्रमकता नाही... हा देश विविधतेने नटलेला आहे. या देशातील बहुविध परंपरांचं जतन करण्याची जबाबदारी आजपर्यंत काँग्रेसने पार पाडली, या जबाबदारीची जाणीव हीच या यात्रेमागची शक्ती होती... आणि म्हणूनच भारत जोडो म्हणून या यात्रेला सुरुवात झाली.

ही यात्रा सुरू होण्याआधी देशभरात विरोधी पक्षांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर केंद्रीय एजन्सींच्या माध्यमातून होत असलेल्या कारवाया, विविध कायद्यांमध्ये चर्चा न करता घडवण्यात आलेले बदल, मुलभूत हक्कांची पायमल्ली, आर्थिक घसरण, कोविड महामारीमधील गैरव्यवस्थापन... असे शेकडो विषय देशासमोर होते. माध्यमं या विषयांना हात घालत नव्हती. संसदेच्या सभागृहात माइक बंद केला जात होता. समाजमाध्यमांवर लोकशाहीवादी कार्यकर्त्यांचं दमन करण्यात येत होतं. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी एकही माध्यम शिल्लक नव्हतं. निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर अफरातफरी चे आरोप होत होते, अशा वेळी जनतेत गेल्याशिवाय पर्याय नाही हे राहुलजींनी ओळखलं आणि भारत जोडो यात्रेला सुरुवात केली.

भारत तुटलाच नाही तर जोडो कशाला असा सवाल सत्ताधारी पक्षाने वारंवार केला. मात्र या देशात विभाजनकारी प्रवृत्तीची जी बिजे मोदी सरकारने पेरली होती ती उगवायला लागली होती. मनं तुटत होती, हा देश फक्त भूप्रदेश नाही. तर इथली लोकं म्हणजे हा देश आहे. या देशातील लोकांमध्ये जाती-धर्म-भाषा-लिंग यांच्या आधारावर भेद पेरला जात असताना काँग्रेस स्वस्थ बसू शकत नाही. आज भारत जोडो मुळे स्वतःला एकाकी समजत असलेल्या लोकशाहीवादी तरूण-तरूणी, संस्था, विविध पक्ष यांच्यामुळे नवा आत्मविश्वास मिळाला. प्रामाणिक हेतू असेल तर लाखो लोकं व्रतस्थ भावनेने तुमच्या सोबत येतात, फक्त तुम्ही लढलं पाहिजे हा संदेश ही या यात्रेतून मिळाला. या यात्रेचे काही दूरगामी परिणाम ही होणार आहेत. भारत जोडो यात्रेमध्ये समाजातील सर्व स्तरातील लोकं सामिल झाले. लाखों लोकं राहुलजींना भेटले. आपल्या व्यथा सांगितल्या, त्यावरचे उपाय ही सांगितले, ध्रुवीकरणाच्या राजकारणाचे परिणाम ही या काळात प्रत्यक्ष पाहता आले. भारत जोडो यात्रा ही नव्या भारताची डिस्कव्हरी आहे. मोदी सरकारने आपल्या प्रचारतंत्राचा वापर करून जे चित्र निर्माण केलंय ते खोटं आहे याची जाणीव या नव्या भारताला आहे. या नव्या भारताकडे स्वप्न आहेत, आशा आहेत, आकांक्षा आहेत.. त्या पूर्ण करण्यासाठी त्यांना आपल्यातील नेता पाहिजे. या नव्या भारताला उद्योगपतींचा एजंट म्हणून काम करणारा पंतप्रधान नकोय. या नव्या भारताला जगावर राज्य करायचंय पण प्रेमाने.. भारत जोडो यात्रेने मुल्याधिष्ठीत राजकारणाची गरज ही अधोरेखित केली. राजकारण म्हणजे तपस्या आहे. त्यासाठी संघर्ष करावा लागतो, यातना सहन कराव्या लागतात. या यात्रेने देशाला ‘डरो मत’ चा नारा दिला. आज हा नारा या देशाच्या संघर्षाचा मूलमंत्र झाला आहे.


Updated : 9 Sep 2023 11:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top