Home > Max Woman Blog > अनुराधा बोराडे.. नाव ऐकलं नसेलच..!

अनुराधा बोराडे.. नाव ऐकलं नसेलच..!

अनुराधा बोराडे.. नाव ऐकलं नसेलच..!
X

डॉ. अनुराधा बोराडे.. नाव कदाचित ऐकलं ही नसेल तुम्ही. पण त्यांची कहाणी ऐकली की तुम्हाला ही त्यांना सॅल्युट करावासा वाटेल. कोरोनाच्या विरोधातल्या युद्धात अनेक आरोग्य सेवक सैनिक म्हणून लढतायत. कुठल्याही सुविधा नसतानाही त्यांनी आरोग्य केंद्राचा मोर्चा लढवत ठेवला आहे. रावणगावच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुराधा बोराडे यांची कहाणी.

डॉ अनुराधा बोराडे यांची सध्या रावणगावातच वस्ती आहे. एरव्ही त्या हडपसर परिसरात वास्तव्याला असतात. सकाळी सात वाजता मांजरी रेल्वे स्टेशन वर पोहोचायचं तिथून ७.३० ची बारामती पॅसेन्जर पकडायची आणि मळद येथे उतरायचं. आरोग्य केंद्रात पोहोचायचं तर मळद वरुन पुढे ४ किलोमीटरवर त्यांना जावे लागते, अशावेळी कधी दुधाचा टॅन्कर, कधी ट्रक, तर कधी दुचाकी असं वाहन पकडायचं हा त्यांचा रोजचा दिनक्रम. कोरोना लॉकडाऊन नंतर आता तर त्या मुक्कामी रावणगाव इथेच आहेत. मात्र तिथल्या निवासस्थानाची स्थिती बघून त्यांना अश्रूच अनावर झाले. कुठे छत खराब तर कुठे अस्वच्छता. बाथरुम मध्ये पायही ठेवेनासा वाटेना. महत्वाचं म्हणजे दोन घासही खान्यासाठी मिळेना. सर्व प्रकारची हाॅटेलही बंद झालेली. या परिस्थितीत त्यांनी दोन दिवस काढले. पण त्यांनी हार मानली नाही.

कोरोनाची साथ सुरु झाली नी सगळ्या जगभर जणूकाही युध्दजन्य परिस्थितीच तयार झाली. या युध्दात डॉक्टर्स, नर्स, अंगणवाडी सेविका, वैद्यकीय अधिकारी हे सैनिक म्हणूनच काम करत आहेत. या सैनिकांची नोंद हे युध्द संपल्यावर नक्कीच घेतली जाईल. भारतातल्या या असंख्य सैनिकांपैकी एक असलेल्या डॉ. अनुराधा बोराडे, गेली १५ वर्ष रुग्णांची सेवा करतायत. त्या आता रावणगाव येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. 2016 मध्ये त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य अधिकारी म्हणुन रूजू झाल्या. तेव्हापासून या गावतल्या लोकांशी त्यांनी जणू प्रेमाचे नातेच गुंफले.

कोरोना चे युध्द सुरु झाले तेव्हा त्या सु्ट्टीवर होत्या, त्यांचा मुलगा दहावीच्या परीक्षांची तयारी करत होता. कोरोना मुळे परीक्षाही पुढे ढकलल्या गेल्या नी त्यांची सुट्टीही रद्द झाली.

सुट्टी रद्द होताच एखाद्या सैनिकाप्रमाणे त्या सेवेवर रूजू झाल्या. लॉकडाऊन मुळे शहरातून ग्रामीण भागात माणसांचे लोंढेच्या लोंढे दाखल होऊ लागले. त्या सर्वांची तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू झाली. येणा-या लोंढ्यामुळे गावकरी घाबरलेले होते या बरोबरच बाहेरुन येणा-या सर्वांची चाचणी करता करता आरोग्य यंत्रणेवर ताण पडत होता. हा ताण केवळ साधनसामुग्रीचा नाही तरच मानसिक ही होता. बाहेरुन येणा-या लोकांपासून तुम्हाला धोका नाही, असे गावक-यांना आश्वस्त करण्याबरोबरच आलेल्या लोकांनाही मनमोकळं- ताण विरहीत वातावरण गावात द्यायचं होतं. हे काम वाटतं तितकं सोपं नव्हतं. सगळेच एकमेकांकडे संशयाने पाहत होते. अशा वातावरणात अनुराधा बोराडे यांनी लोकांची तपासणी करणे, लोकांना सातत्याने बाहेर फिरु नका सांगणे, बाहेरुन आलेल्या लोकांशी सतत संर्पक ठेवून त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवणे याबरोबरच इतर आजारांवरील उपचारांसाठी आलेल्या रोग्यांना तपासणे अशी आरोग्य केंद्र तसंच फिल्डवरची कसरतही डॉ. अनुराधा यांना करावी लागत आहे. प्रेमळ नी हळव्या असलेल्या अनुराधा यांना या कसरतीचे काहीही वाटत नाही. रुग्णांची सेवा करणे हाच धर्म त्या मानत असल्यामुळे सततच युध्दजन्य परिस्थितीत काम केल्यासारखी स्थिती असते, असे त्या सांगतात.

गावात साधी राहायची सोय नसतानाही अनुराधा बोराडेंनी तक्रार केली नाही. आपल्याला योग्य प्रकारची आरोग्य सेवा द्यायची असेल तर आपले प्रश्न आपणच सोडवलेच पाहिजेत ते स्वतःजवळ ठेवता कामा नयेत असा विचार करुन त्यांनी सरपंचा जवळ हा प्रश्न मांडताच संरपंचांनी क्वार्टरची व्यवस्था करून दिली त्या बरोबर दोन वेळेला डबा पोहचवण्याची व्यवस्था केली, सकाळच्या नाश्ताची जबाबदारी एका सेवाभावी संस्थेने उचलली आणि डॉ अनुराधा यांच्या हाताला बळ मिळालं.

केवळ वैद्यकिय अधिकारी म्हणून काम करताना अनुराधा ताई दिसत नाहीत तर वेळ पडेल तेव्हा गावात हवी ती मदत करतात. स्वामी चिंचोली गावातली एक वयोवृद्ध महिला दोन दिवसांपूर्वी मरण पावली तिची मुलगी नालासोपारा इथे राहते. येताना वाटेत ठिकठिकाणी पोलीस अडवणूक करत होते. अशा वेळी डॉ अनुराधा यांनी त्या मुलीला पोहोचण्यासाठी मदत केली. तसंच संपूर्ण अंत्यविधीच्या दरम्यान सोशल डिस्टंसींग तसंच सुरक्षिततेच्या उपायांसंदर्भात जनदागृतीही केली.

हे सगळ करत असतांना आपल्या घराची आठवणही त्यांना येतेच. मुलगा व नवरा हे दोघेच घरात राहत असल्यामुळे आता त्यांच्या जेवणाचा प्रश्न तयार झालाय. कधी कडक पोळ्या तर कधी भातावर भागवणा-या आपल्या मुलाबद्दल त्यांना वाईटही वाटते. पण या लढाईत आपल्या घरच्यांचा पाठींबा नसता तर आपल्याला विस्तारित कुटुंबासाठी म्हणजे गावासाठी काही करणं शक्य झालं नसतं असं डॉ अनुराधा सांगतात. आज कोरोनाच्या विरोधातल्या लढाईत अनेक अज्ञात योद्धे लढतायत. मॅक्सवुमनच्या माध्यमातून आम्ही अशाच योद्ध्यांच्या छोट्या छोट्या कहाण्या तुमच्या पर्यंत घेऊन येणार आहोत. अनुराधा बोराडे यांच्या या कार्याला आमचा सलाम. तुम्ही पण तुमच्या भागातील अशा हिरोंच्या कहाण्या आम्हाला लिहून पाठवा.

-प्रियर्दशिनी हिंगे

Updated : 3 April 2020 8:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top