Home > Max Woman Blog > यशोगाथा एका यशोधरेची... !

यशोगाथा एका यशोधरेची... !

यशोगाथा एका यशोधरेची... !
X

भगवान गौतम बुद्धांनी साऱ्या जगाला संदेश दिला, 'अत: दीप : भव :' म्हणजे तुम्हीच तुमच्या जीवनाचे मार्गदर्शक व्हा, तुम्हीच स्वतःचा मार्ग तयार करा. ही शिकवणूक खऱ्या अर्थाने आयुष्य जगतांना आपल्या आचरणात आणणाऱ्या एका यशोधरेची ही संघर्षमय जीवनगाथा. जीवनाच्या वाटेत जातीयव्यवस्थेचे चटके सोसावे लागले, आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले पण एकाच ध्येयाला यशोधरा बाईंनी जीवापाड जपले ते ' आपल्या मुलांना खूप शिकवायचे आणि मोठ्ठे करायचे ' या ध्येयामागे होता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दलितोद्धाराचा विचार.

यशोधरा यशवंत गायकवाड म्हणजेच पुर्वाश्रमीच्या गजरा दगडू वाकचौरे. ठाणे जिल्ह्यात असलेल्या मुरबाड तालुक्यातील खांडपे हे त्यांचे जन्मगाव. जन्म 9 फेब्रुवारी 1938. त्यांच्या आई-वडिलांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पगडा असल्यामुळे आंबेडकरी चळवळीचे बाळकडू त्यांना मिळाले. काळाराम मंदिर प्रवेश, महाडचा चवदार तळे सत्याग्रह, बाबासाहेबांचे धम्मपरिवर्तन या घडामोडी त्यांना आपल्या वडिलांकडून कळत होत्या. त्याचा त्यांच्या बालमनावर खोलवर परिणाम होत होता. आपणही बाबासाहेबांसारखेच खूप खूप शिकायचे ही जिद्द त्यांनी बाळगली.

संसार, मुले, नोकरी सांभाळून त्यांनी बी.ए. बी. एड., एम.ए.एम.एड. केले. आदर्श शिक्षिका, आदर्श पालक, आदर्श माता अशा पुरस्कारांसोबतच महापौर पुरस्कार व महाराष्ट्र राज्य पुरस्कार तसेच वीरांगना सावित्रीबाई फुले फेलोशीप (दिल्ली) अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. अनेक मासिके व दैनिकांतून लेखन व लेख माला प्रसिद्ध झाल्या आहेत.

दलित समाजातील यशोधरा गायकवाड यांनी स्वतःचे जीवन स्वतः घडविले, उच्च शिक्षण घेतले, शिक्षक म्हणून अनेक विदयार्थ्यांना त्यांच्या जीवनात मदत केली. त्यांची पाचही मुले मोठ्या हुद्द्यावर जाऊन पोहोचली ते या माऊलीने केलेल्या जिद्दीनेच.

परंतु हा सबंध प्रवास सोपा निश्चितच नव्हता. अनेक अडचणींचा डोंगर पार करावा लागला. शाळेत सर्वात हुशार विद्यर्थिनी असूनही कुणब्यांची मुले देखील त्यांना 'महार' म्हणून शिवून घ्यायची नाही. मधल्यासुट्टीत डबा खाल्ल्यावर सवर्ण प्यायला पाणीसुद्धा द्यायचे नाहीत. दिलेच तर ते वरतून ओंजळीत टाकत. पुरेसे पाणी तर प्यायला मिळायचे नाहीच पण गणवेश मात्र भिजायचा. त्यामुळे शाळा सुटल्यानंतरच त्या थेट घरी आल्यावर पाणी प्यायच्या संध्याकाळी. विहिरीवर सवर्ण पाणी भरु द्यायचे नाहीत. त्यांची वहिनी समोरून कोणी सवर्ण आल्यास पायातील चप्पल काढून डोक्यवरच्या टोपलीत ठेवायची. ही चातुर्वर्ण्य व्यवस्था पाहून त्यांचे मन व्यथीत होई.

दलितांना त्यांच्या व्यथा-वेदनांतून बाहेर काढणारा आपला एकच उद्धारकर्ता आहे ते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ही समज बालवयातच त्यांना आली होती. त्यामुळेच बाबासाहेबांसारखेच खूप शिकण्याची त्यांची इच्छा बळावत गेली. पुढे सातवीच्या परीक्षेत त्या केंद्रात पहिल्या आल्या पण सातवीनंतर पुढचे शिक्षण घेण्यासाठी मुलांच्या शाळेत जावे लागेल म्हणून त्यांचे शिक्षण तिथेच थांबविण्यात आले. चार वर्षांनंतर त्यांचा विवाह यशवंत गायकवाड यांच्याशी झाला. 'प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते' या उक्तीप्रमाणे ' प्रत्येक यशस्वी स्त्री मागे पुरुष असेलच असे नाही. दलित स्त्रीची तर आणखी कुचंबना. कारण चातुर्वर्ण्यव्यवस्थेतील शूद्रांच्याही खालचे स्थान तिला प्राप्त झाले होते. जातीय व्यवस्थेची ती बळी होतीच पण शुद्र म्हणवला जाणारा पुरुषही तिचे शोषण करीत होता.

विवाहानंतर कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर एकटीने. एकापाठोपाठ आलेली बाळंपण, मुलांचे संगोपन, त्यांचे आजारपण, शिक्षण, संस्कार, आर्थिक टंचाई अगदी संततीनियमनाच्या शस्त्रक्रियेच्या फॉर्मवर देखील पालक म्हणून त्यांनीच सही केली. कोणत्याही परिस्थितीत माहेरी की सासरी मदत मागितली नाही. प्रसुतीच्यावेळीदवाखान्यात इतर बायकांच्या जवळ त्यांची आई, सासू किंवा नवरा असायचे. पण यशोधराबाई एकट्याच असायच्या. बाळंतपण झाले की एकट्याच घरी जायच्या. मुलांच्या भवितव्याचा विचार करतांना कितीतरी रात्री त्यांनी जागून काढल्या. आज त्यांना जो निद्रानाशाचा त्रास होतो ते याचेच फलीत होय.

लग्नानंतर यशोधराबाई व त्यांचे पती यशवंत गायकवाड या दोघांनाही ठाणे जिल्हा स्कूल बोर्डात भिवंडी तालुक्यातील पिलंझे येथे शिक्षक म्हणून नोकरीला लागले. परंतु पती त्यांच्या स्वभावामुळे फार काळ नोकरी टिकवू शकले नाही. घराची सर्व धुरा यशोधराबाईंवर येऊन पडली. रोजच्या खर्चाची हातमिळवणी करता करता नाकी नऊ येई. झोपडपट्टीत राहण्याची वेळ आली. पाण्याची व्यवस्था नाही की खाण्याची, झोपण्याची. जमिनीवर ओल तर डोक्यावर छप्पर नाही. प्राथमिक विधीची सुविधा नाही. बाजूला वाहणारा नाला, नाल्याच्या दुसऱ्या बाजूला महारोग्यांची वस्तती, तिथेच दारू गाळणाऱ्यांचा व्यवसाय. चांगल्या जागेत खोली भाड्याने घेण्याइतके पैसे नाही शेवटी असे अनेक ठिकाणी विंचवाच्या बिऱ्हाडाप्रमाणे संसार पाठीशी घेऊन फिरल्यावर त्या मुरबाडच्या आपल्या गावी जाऊन तिथूनच मुंबईला येऊन-जाऊन नोकरी करायची असे ठरवितात. गावी आल्यावर निदान मुलांना राहायला नीट जागा तरी मिळेल हा त्यामागचा उद्देश. मुलांसाठी त्या इतका दूरचा प्रवास रोज करतात. सकाळी 9 वाजता निघाल्यावर घरी यायला रात्रीचे 9-10 कितीही वाजायचे. कधी कधी तर गाडी-भाड्याला पैसे नसले की रजा घ्यावी लागे. अशा परिस्थितीत त्यांनी मुलांना शिकविले व स्वतःचे पुढील शिक्षणही पूर्ण केले. या गरिबीतही त्यांच्याकडे दागिने होते ते म्हणजे त्यांची पाचही मुले.

या अथक परिश्रमाचे फलीत म्हणूनच की काय त्यांचा मोठा मुलगा जयंत डेप्युटी कलेक्टर झाला, राजय एल.एल.बी. झाला, संजय एम.बी.बी.एस., एम.डी. करून नंतर डी.वाय.एस.पी. झाला, मुलगी संघमित्राने संसार व नोकरी सांभाळून बी.ए. केले तर धाकट्या अभिनयाने एम.ए. एल.एल.बी. 1999 साली ब्रिटिश हाय कमिशनच्या 'शेव्हनिंग स्कॉलरशिप ' मध्ये पश्चिम भारतातून ती एकमेव निवडली गेली. सोमैया महाविद्यालयात ती राज्यशास्त्राची प्राध्यापिका असून विभाग प्रमुख आहे.

यशोधराबाईंनी आपल्याच मुलांचे भवितव्य घडविले नाही तर अनेक विद्यार्थ्यांना घडविले. समाजातील गरीब, वंचितांच्या समस्या आपल्या मानल्या. महिलांचे प्रौढ साक्षर वर्ग घेतले. वाम मार्गापासून विद्यार्थ्यांना परावृत्त केले. डॉ. बाबासाहेबांचा शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' हा संदेश त्या कधीही विसरल्या नाही. अशा या यशोधरा यशवंत गायकवाड यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम.

-प्रा. डॉ. अनुप्रिया ग्रीष्म खोब्रागडे

Updated : 18 April 2020 3:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top