Home > Max Woman Blog > 'मी आणि माझी पाळी'

'मी आणि माझी पाळी'

मासिक पाळीविषयी समाजात अजूनही अनेक गैरसमज आहेत. खरतर 21 व्या शतकात पाळीवर बोलावं लागतं हेचं नवल आहे. पण खरंच पाळी इतकी विटाळ आहे का? पाळी येण्यात अपवित्र असं काय आहे? या सगळ्याच मूळ कारण आहे ते म्हणजे समाजात असलेले गैरसमज… ग्रामीण भागात महिलांच्या पाळीविषयी अनेक गैरमज आहेत..आजही तिथल्या मुली पाळीदरम्यान कापड व राखेचा उपयोग करतात. आता या सगळ्यावर एकच उपाय आहे तो म्हणजे पाळीवर उघड बोलून प्रबोधन करणे व त्यांचे गैरसमज दूर करणे. त्यासाठीच सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांनी त्यांना पहिल्या पाळी दरम्यान आलेला अनुभव 'मी आणि माझी पाळी' या लेखात सांगितले आहेत. त्यांचा हा लेख नक्की वाचा..

मी आणि माझी पाळी
X

सातवीच्या वर्गात शिकायला असताना या प्रसंगाला तोंड द्यावे लागले. तर झालं असं की, पोट दुखायला लागलं म्हणुन संडासला अर्थात उघड्यावर रानात टंमरेल घेऊन आम्ही दोघी बहिणी गेलो होतो. संडासला बसताना जँग्या (आता निकर म्हणतात) काढताना समजलं की निकरला लाल डाग पडलेत आणि ही गोष्ट मग बहिणीला सांगितली तर तिने माझ्या मायला सांगितले (कारण आई जवळ नव्हती मुंबई ला वडलांकडे होती) अन माझ्या मायने माझ्या तोंडावरून हात फिरवत लेकरू मोठं झालं माय, जीवाला घोर लागला आता! आसं म्हणत तिने तिच्या बहिणीला मी "इटाळशी" झाल्याचं सांगितले आणि नंतर मला घरात कवाड लावत बसवलं (कोंडलं) का तर म्हणे पहिला इटाळ आलेल्या पोरीच्या डोक्याच्या "केसांची बट" 'करनी' करण्यासाठी 'जानते' वापरतात मग पुढे लेकरूबाळ न होणे, वांझ रहाणे असं होत असतं म्हणे मग माझ्या मायने मला या इटाळात (पाळीत) तिच्या जुन्या लुगड्याच्या कपड्याचा 'धट्टा' करून तो कसा घ्यायचा ह्याचं प्रात्यक्षिक करुन दाखवलं म्हणजे कमरेला एक नाडा फिट बांधायचा आणि धट्ट्याच्या गुंडाळी च्या दोन टोकं बांधून निकर मधून घेत फिट्ट बसेल असे बांधायचे.

हा प्रयोग केला पण धट्टा कधी निसटायचा तर कधी सारखा बाजूला सरकायचा यामुळे निकर हाकनाक भिजत रहायची. हा धट्टा एवढा घासायचा की मांड्यांना रक्ताचा तो कपडा घासल्याने दोन्ही मांड्या सोलून निघायच्या आणि मग पाय फाकवत चालावं लागयचं. या पाय फाकवत चालल्यामुळेच मग आजुबाजूच्या बायांना कळायचं की पोरगी "घोड्यावर बसली" घरी पाव्हणा आला वाटतं' असं बाया हाटकून मिश्कीलपणाने हसत हसत म्हणायच्या. याच काळात योनीवर येणारे केस कसे काढायचे हे पण मायने सांगितले आणि घरगुती उपाय" राख लावून उपटणे"😳 काय भयानक उपाय असतात बाप रे! का तर म्हणे लय दिवस केस उगवत नाहीत🙄पण हा अघोरी उपाय नको रे बाबा म्हणत मी सोडून दिला आणि पुढे जवळ जवळ 5 वर्ष विजनवासत काढले भलेही पाळीत वाढलेल्या केसांचा त्रास नेहमी होत राहीला तरी (नंतरच्या काळात विट हेअर रिमुव्हर समजले). पुढे सातवीपासून दहावीपर्यंत धट्ट्याऐवजी कपड्याची घडी वापरायचे.

जेव्हा पाळी यायची आणि कधी जर गुरूवार की, शुक्रवार आठवत नाही पण या दिवशी सरस्वतीची आरती होत असे आमच्या शाळेत आणि या दिवशी जर पाळी आली तर मग मात मी शाळा बुडवून घरी रहायचे कारण पाप देव यामुळे भिती वाटायची पण माझी शाळा बुडायची याचं दु:ख वाटायचे. पुढे हायस्कूलची शाळा विठ्ठल रूक्मिणीच्या मंदीरात भरायची एकदा एका मुलीचा कपडा पडला होता बसलेल्या ठिकाणी या घटनेमुळे तिला कितीतरी पोरींचे बोलणे सहन करावे लागले होते. कारण मंदीरात बोळा पडणं म्हणजे पाप असतं हेच पोरीकडून सांगितले गेले.या घटनेमुळे माझ्यासहित अनेक मुलींचं लक्ष शाळेच्या तासावर कमी पण चार दिवस पाळीतील कपडा पडु नये म्हणुन त्यावरच असायचं पुढे 9वी ला असताना स्टेफ्रीची जाहीरात एका नर्सच्या (संगेवार नर्स) टिव्हीवर बघायचे त्या जाहीरातीमध्ये पोरगी छत्री हातात घेऊन फिरलेली दाखवत अचानक पँडवर चहा सांडलेला दाखवायचे हे बघत असताना त्या संगेवार नर्सचा नवरा नेहमी ती जाहीरात आली एक तर टिव्ही बंद करायचा नाही तर मग उठून जायचा.ही स्टेफ्रीच्या पाळीतील पँड कळायला मला 5 वर्षे लागली. (गरीबी परिस्थिती घरात कोणीच शिकलेले नव्हते यामुळे कदाचित) नंतर शासकीय वसतिगृहात जेव्हा शिक्षणासाठी मी रहायला गेले तिथे एक अख्खा हाँल मुलींच्या पाळीतील कपड्यांनी गच्च भरलेला असायचा कोणता कपडा कोणाचा ओळखायला येत नसं महिनाभरात कपड्यांवर धुळ बसायची. पण तसेच आम्ही वापरायचो काही लहान मुली संडासच्या भांड्यातच संबंधित कपडे कोंबुन ठेवत असायच्या नंतर आमच्या सिनियर पोरींकडुन पँड वापरायचं समजलं आणि मग स्टेफ्री 16 रुपये की 21 ला मिळायच ते वापरू लागले.जेव्हा जेव्हा पाळी यायची तेव्हा तेव्हा वाटायचं का असेल ही पाळी? दर महिन्यालाच हा ताप का असतो? पण नंतर या पाळीबाबतीत समज गैरसमज समजत गेले पाळीतील कंबर दुखणे ब्रेस्ट दुखणे चार दिवस पाळी येऊन गेल्यास फ्रेश वाटणे हे समजलं,जाणवलं आज स्टेफ्री व्हिसपर वापरतेय बाकी आज गरज आहे पौगंडावस्थेतील मुलींना पाळीबाबतीत समजून घेणे त्यांच्यातील भिती घालवणे गैरसमज दुर करणे पाळी आलेल्या मुलींचे बाहेर शारीरिक संबंध आले तर कौमार्य भंग पाप गरोदर राहील यामूळे मुलीवर पहारा देत बसणं यापेक्षा मुलींसोबत मोकळा संवाद साधनं गरजेचं आहे.

कोरोणा परिस्थिती मध्ये कोसो दुर पायपिट करत चालत जाणार्या महिला या लहान मुली यांना पाळी आली असल्यास पँड भेटले असतील का? की कपड्यावर भागवत असतील? कि त्यांच्या सुद्धा मांड्या सोलून निघाल्या असतील? असे विचार येत आहेत मनात😢

बाकी....सर्व महिलांना पाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि हो त्या सर्व पुरूषांना ही जे महिलांच्या पाळी प्रक्रियेत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी होतात. पँड घेऊन येणे,दर महिन्याचा पँडचा कचरा बाहेर नेत विल्हेवाट लावणे पाळीमध्ये बायको, बहिण, मुलगी यांची आराम,आहार याबाबत काळजी घेतात

(धट्टा ....धट्टा म्हणजे आजही दवाखान्यात डॉक्टर, नर्स बाळंतिन महिलेला बाळंतिन झाल्या झाल्या अंगावरून जास्त रक्त वहात राहील्याने स्टेफ्री व्हिसपर च्या पँडने शोषले जात नही म्हणून कपड्याची गुंडाळी करून बाळंतिनीला घ्यायला देतात.)

सत्यभामा सौंदरमल

निर्धार सामाजिक सेवाभावी संस्था

बीड

Updated : 3 Jun 2022 3:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top