Home > Max Woman Blog > स्वावलंबी महिलेची नकळत झालेली बाहुली

स्वावलंबी महिलेची नकळत झालेली बाहुली

स्वावलंबी महिलेची नकळत झालेली बाहुली
X

काही दिवसांपूर्वी, मी मुंबईला एका कार्यक्रमाला जात असताना, मला मी स्वत: किती बदलले आहे हे प्रकर्षाने जाणवले - मला आता काही काही गोष्टींची, उदा. एकटीने प्रवास करायची, स्वत:चे ticket स्वत: काढायची, bank चे व्यवहार करायची, व काही निर्णय स्वत: घेण्याचीही अजिबातच सवय राहलेली नाही हे जाणवले.

मग मला प्रश्न पडला की हे असं कसं झालं? आणि हे फक्त मा‍झ्याच बाबतीत झालं आहे का?

मला वाटतं हे असं झालं कारण गेल्या अनेक वर्षात, विशेष करून माझे लग्न झाल्यानंतर, मला बऱ्याचश्या गोष्टी कराव्याच लागल्या नाहीत, किंवा त्या मी केलेल्या नाहीत. मला एकटीला सहसा कुठे बाहेर गावी जावं लागलं नाही, मला फार वेळेस bank मध्येही जावं लागलं नाही, मला कशाची कमी पडली नाही किंवा मला फार कुठल्या अडचणींनाही तोंड द्यावं लागलं नाही... आणि मग या सगळ्याचा परिणाम, चांगल्या गोष्टींचा side effect म्हणूया हवं तर, हा झाला की मी माझी निर्णय क्षमता, माझा आत्मविश्वास काही प्रमाणात तरी गमावून बसली.

आणि हे फक्त मा‍झ्याच बाबतीत घडतं आहे असं मला तरी वाटत नाही. हे बहुतेक तरी अनेक स्त्रियांच्या बाबतीत घडलं असेल, घडत असेल. गाडी चालवता येते, गाडी दारात उभीही आहे पण ती चालवण्याचा आत्मविश्वास नाही म्हणून बाहेर जाण्याचे टाळणार्‍या स्त्रीया, स्वत: कमावत्या असूनही रोजच्या गरजांसाठी नवऱ्याकडे पैसे मागाव्या लागणार्‍या स्त्रीया, स्वत: साक्षर आणि सुशिक्षित असूनही घरची मंडळी सांगतील तिथे न वाचता सह्या करणाऱ्या स्त्रीया, काही करावसं वाटलं तरी इतर लोक काय म्हणतील म्हणून तसं बोलू व करू न शकणार्‍या स्त्रीया आपल्या आजूबाजूला असतातच, आहेतच.

कदाचित प्रत्येकीच कारण वेगवेगळं असेल - काहींना चांगल्या जोडीदाराची साथ मिळाली आणि सगळं काही चांगलं झालं म्हणून अस झालं असेल तर काहींना स्वत:च मन स्वतंत्र असूनही कधी मनासारखे वागता - बोलता न आल्यामुळे असं झालं असेल. पण कारण काहीही असो, या सगळ्या स्त्रियांचे विश्वच संकुचित झाले आहे आणि त्या खऱ्या अर्थाने ‘अबला’ झाल्या आहेत असे मला वाटत.

पण हे असं होऊ नये असं मला वाटतं, आणि त्यासाठी मी प्रयत्नही करत आहे. ज्या गोष्टी मला करता येतात, मला करता आल्या पाहिजे त्या गोष्टी शिकण्याचा, करायचा प्रयत्न, मनात येईल ते मोकळेपणाने बोलायचा प्रयत्न मी करत आहे. आणि तसा प्रयत्न तुम्हीही करायला हरकत नाही.

Updated : 9 May 2020 2:46 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top