Home > Max Woman Blog > जीवन गाणे गातची रहावे , झाले गेले विसरून पुढे पुढे चालावे... याची प्रचिती म्हणजे झिम्मा !

जीवन गाणे गातची रहावे , झाले गेले विसरून पुढे पुढे चालावे... याची प्रचिती म्हणजे झिम्मा !

जीवन गाणे गातची रहावे , झाले गेले विसरून पुढे पुढे चालावे...  याची प्रचिती म्हणजे झिम्मा !
X

टाळेबंदी अर्थात लॉकडाऊननंतर झिम्मा हा चित्रपट येत्या काही दिवसांत प्रदर्शित होत आहे. या सिनेमाचा प्रिमिअर नुकताच पुण्यामध्ये पार पडला. त्यावेळचा अनुभव सांगत आहेत पुणे ग्रामीणचे अपर पोलिस अधिक्षक मितेश घट्टे...

झिम्मा

भारतीयांवर चित्र व चित्रपटांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे चित्रपटांचे वेड नाही असा माणूस आपल्या देशात शोधायला अंमळ अवघडच आहे! पण कोरोनाच्या सावटाखाली आपल्या जगण्याला एका वळणावर अवचित थांबावे लागले. या अपरिहार्यतेत आमचा जगण्याचा अर्थ व आनंद यांतील निखळपणासुद्धा हरवला. पण आता हळूहळू कोरोनाचे सावट विरळ व्हायला लागले आणि त्याचबरोबर आमच्या चेहर्यानवर पण आनंदाचे प्रतिबिंब उमटू लागले. ठप्प झालेले व्यवसाय, छंद, व्यापार उदीम सारं काही सावध पावलांनी पुन्हा एकदा गतीचा वेध घेऊ लागले. मागील पावणे दोन वर्ष शांत झालेला चित्रपटगृहातील पडदा पुन्हा एकदा बोलू लागला. त्यामुळे आमचे सातारा व पुणे येथील पोलीस दलातील सहकारी अधिकारी श्री दयानंद ढोमे यांचे सुपुत्र हेमंत व स्नुषा क्षिती यांच्या प्रयत्नांतून साकारलेल्या झिम्मा चित्रपटाच्या प्रिमियर शोला नाही म्हणणे शक्यच नव्हते.

शुक्रवारी सिनेमाचा पहिला शो पाहण्याचे व्यसन काही जणांत पाहिले आहे. कॉलेज जीवनांत असा वेडेपणा आमच्याकडून पण काही वेळा झाला आहे. पण चित्रपट कलाकारांच्या उपस्थितीत चित्रपट पाहणे आणि त्यांच्या सोबत संवाद साधण्याचा असा आजचा पहिलाच अनुभव! श्री. ढोमे साहेबांनी आवर्जून आठवण करुन दिल्याने ही संधी गमवायची नाही असे ठरवले. त्याप्रमाणे बरोबर सातच्या ठोक्याला आम्ही कोथरूडच्या सिने प्राईडला पोहचलो. आमचे गुरुतुल्य वरिष्ठ मा. प्रदीप देशपांडे सर (निवृत्त संचालक, महाराष्ट्र गुप्तवार्ता अकादमी, पुणे) कुटुंबियांसमवेत तेथे अनपेक्षितरित्या भेटल्याने आनंद झाला.

चित्रपट सुरु होण्यापूर्वी उपस्थित कलाकारांसोबत ओळख व फोटो काढून घेण्याची संधी ढोमे साहेबांमुळे आम्हीपण सोडली नाही. वर्तमान पत्रे व TV वर दिसणारे चित्रपट तारे तारका प्रत्यक्ष भेटल्याने चि. शरयु व चि. शर्वरी खुश झाल्या. हेमंत व क्षितीच्या छोटेखानी स्वागतपर भाषणानंतर पडद्यावर सुरु झालेल्या चित्रपटामुळे सिनेमागृहांतील मागील पावणे दोन वर्षांचा विराम बाजूला पडला.

खरे तर आयुष्य हा एक प्रवास आहे. जीवन गाणे गातची रहावे , झाले गेले विसरून पुढे पुढे चालावे... या काव्यपंक्तीप्रमाणे जीवनाच्या वाटेवर भेटलेल्या अनेक भल्या बुऱ्या अनुभव व वाटसरुमुळे जगण्याचा आनंद समृद्ध होत जातो. नेमके हेच सुत्र केंद्रस्थानी ठेऊन हेमंतने चित्रपटाचा सारा डोलारा उभा केला आहे. वयोगट, कौटुंबिक व शैक्षणिक पार्श्वभूमी यांत फरक असलेल्या १२ जणींचा समुह इंग्लंडच्या सफरीवर रवाना होतो. ट्रॅव्हल्स व्यवसायाची सुरुवात करणाऱ्या कबीरची या साऱ्या महिलांचा मेळ जमवताना उडणारी तारंबळ गंमतीची वाटते. घराबाहेर प्रथमच स्वतंत्र पाऊल टाकलेल्या या महिलांच्या बिनधास्त वागण्यामागे काही ना काहीतरी किनार आहे. चित्रपट जस जसा पुढे जातो , तस तशी ही किनार समजू लागते. इंग्लडमध्ये स्थिरावलेल्या मुलांच्या संसारात घरकामापुरती अडकलेली इंदुमती आजी , फॅशन डिझायनर लेकीच्या लग्नापूर्वी तिच्यासोबत वेळ शोधणारी वैशाली व इंग्लंडमध्ये राहणाऱ्या नियोजित पतीशी अजून मनाने जवळीक साधू न शकलेली मैथिली, राजकीय कुटुंबातील निर्मला, पतीच्या अकाली मृत्यूची चाहूल ओळखू न शकल्याने मानसिक नैराश्याच्या गर्तेत गेलेली मीता आणि बिनधास्त जगणारी कृतिका , आई व्हायची स्वप्न पाहणारी गुजराथी घरातली रमा ... एकमेकांच्या कथा प्रवासादरम्यान उमजून घेताना सहप्रवाशांच्या औपचारिक नात्यांची गुंफण आपुलकीत बदलत जाते. काहीसा वेगळा विषय हेमंतने अतिशय कल्पकतेने मांडताना सारा झोत सिद्धार्थ चांदेकरवर ठेवला आहे. त्यानेही या संधीचे सोने केले आहे. सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव सार्यांीचाच वावर अतिशय सहज होता.

चित्रपट संपताना आमंत्रितांनी टाळ्यांच्या कडकडाटात हेमंत व क्षितीच्या प्रयत्नांना निश्चित दाद दिली. मराठी माणसाने साता समुद्रापार, अगदी गोर्याा साहेबाच्या देशांत जाऊन रंगविलेल्या अत्यंत सुंदर कलाकृतीचे कौतुक करताना हा कलाकार आमच्या पोलीस दलातील सहकाऱ्याचा मुलगा आहे याचा थोडा जास्तच अभिमान वाटतो.

हेमंत व क्षिती यांच्या कलागुणांना यश व किर्तीचे क्षितिज खुणावतंय. ते निश्चित या क्षितीजाला पार करतील. त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा !

मितेश घट्टे

अपर पोलीस अधीक्षक

पुणे ग्रामीण

१९ नोव्हेंबर २०२१

Updated : 20 Nov 2021 8:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top