आरती आमटेंना का भावला सुशांतचा ‘दिल बेचारा’
X
सुशांत सिंह राजपूतचा ‘दिल बेचारा’ हा सिनेमा पाहिला. छान होता. आम्हाला आवडला. आणि त्यातील काही गाणी आम्ही अजूनही वारंवार एकतोच आहोत. आणि सिनेमा संपल्यावरही त्यातील काही प्रसंग, संवाद मनात घोळत राहिले, त्यातून काही जुन्या आठवणींनाही उजाळा मिळाला. त्याबद्दल बोलत असताना उदयने मला मध्येच विचारलं की ‘हे ठीक आहे, पण तू प्रत्यक्षात असे, वेदनांचा आणि जे घडणारच आहे त्याचा आनंदाने स्वीकार करणारे, किती लोक पाहिले आहेत?’ तेव्हा मात्र मला तसं फारस कोणी आठवलं नाही, त्या प्रश्नाच व्यवस्थित उत्तर देता आलं नाही.
खरं तर, मी नर्स म्हणून काम केलेले असल्यामुळे, आणि लहानपणापासून प्रकल्पात व दवाखान्यात वावरल्यामुळे, दुर्धर व्याधींनी त्रस्त असलेल्या अनेक रूग्णांच्या सहवासात मी राहिलेली आहे. मी त्यांना त्यांच्या व्याधीशी लढताना, त्यांच्या व्याधींसोबत जगताना पाहिलं आहे. अगदी सिनेमातील किझी बासू विचारते तसा ‘हे सगळं माझ्याच वाट्याला का आलं?’ हा प्रश्न विचारतांनाही पाहिलं आहे, आणि त्यांना आपापल्या वाट्याला आलेल्या वेदनांचा आणि दु:खाचा स्वीकार, अर्थातच नाइलाजाने करतांनाही पाहिलेलं आहे. आणि तरीही, जरी त्या सगळ्यांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या वेदनांचा व दु:खाचा स्वीकार नाइलाजानेच केला आहे तरीही, त्यातील अनेकांना त्यांच्या वेदनां सोबत, काही मोजक्याच क्षणांपूरत का असेना पण तरीही आनंदाने जगताना, त्या क्षणांपुरत का असेना पण त्यांची दु:ख व त्यांच्या वेदना विसरून जातांनाही मी पाहिले आहे.
आणि बहुतेक तरी आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात, अगदी आपण कुठल्याही दुर्धर व्याधीने त्रस्त नसलो तरीही, आनंदाचे काही मोजकेच क्षण तर येतात, नाही का? पण हेच काही क्षण, अगदी मोजकेच असले तरीही, आपल्याला आयुष्यभर जगण्याची, लढण्याची ऊर्मी देतात हेही खरच आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात हे आनंदाचे क्षण थोडेसे अधिक प्रमाणात येवो हीच आजची प्रार्थना...
- आरती आमटे