तुमच्या धार्मिक भावना दुखावणार असतील तर हा लेख वाचू नका...
X
शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी पार्वतीने व्रत केले. मग शंकर प्रसन्न झाला आणि त्याने पार्वती बरोबर लग्न केले. ही झाली पुराणातली कथा. पण या कथेमागचे “ शास्त्र“ काहीतरी वेगळेच आहे बरं का…?
कसंय ना, देवाचे नाव घेतलं की, आपल्या इथल्या एक्स्ट्रा इमोशनल बायका लगेच पाघळतात. हे असे बायकांना उल्लू बनवून पुरूषांसाठी उपाशी रहायला लावायचं, मग तो पुरूष जो आता समाजासमोर त्या स्त्रीला मंगळसूत्र वैगरे घालून तिचा नवरा झालेला असतो. तो म्हणजे स्त्री च्या आयुष्यातला देवच जणू, हे त्या स्त्रीच्या मनावर बिंबवायच, मग कसं ना सोपं पडतं… अगदी बायकांना पुरूषप्रधान सत्तेत बंदिस्त करून ठेवणे.
बर चला मानलं, पार्वतीने शंकरासाठी व्रत केले, लग्नानंतरही ते व्रत चालू ठेवले, मग शंकराने का नाही केले पार्वती बरोबर हे व्रत आयुष्यभर? शंकरालाही पार्वतीसारखी छान बायको मिळालीच होती ना.
वट पौर्णिमेला या स्त्रिया नवऱ्याच्या ‘लांबलचक’ आयुष्यासाठी उपाशी रहाणार, हरितालिकेला ‘चांगला’ नवरा मिळावा म्हणून आपल्या मुलींना लहानपणापासून हे व्रत करायला लावणार. हे व्रत करूनही मारझोड करणारा, दारूडा, बायकोला वहाण समजणारा नवरा का मिळतो? मग हे व्रत करणाऱ्यापैकी काही स्त्रियांना? पण असला नवरा मिळाला तरीही आपल्या हरितालिका बधत नाहीत बरं का.
मार खात, स्वत:चा मान सन्मान, स्वाभिमान सगळं सगळं सोडून त्या हे व्रत करतच राहतात. किती त्या सोशिक, आदर्श स्त्रिया नाही का..? वाह.. मानल बुवा. यांचे नवरे मात्र, खाऊन पिऊन निर्धास्त... का नाही निर्धास्त होणार? त्यांच्या आयुष्याची दोरी तर बायकांच्या उपवासात दडलेली असते नं..
आपल्या इथे बलात्काराच्या, मारहाणीच्या, ॲसिड हल्ल्याच्या, स्त्री भ्रूण हत्येच्या खूप घटना घडतात. पण म्हणे स्त्रीला देवी मानलं जाते आपल्या इथे.. किती छान नं.. अगदी आदर्श तो आपला समाज. तसंही इतकं सगळं सोसून, परत आणि त्याग वगैरे करणारी स्त्री देवीच म्हटली पाहिजे नाही का..? पण मग या देवीला प्रसन्न करण्यासाठी काही करावे लागत नाही का? इतके सगळे अन्याय सहन करून, ती सदा प्रसन्नच असते.. !!! वाह, भारतीय स्त्रीचा जयजयकार असो.
तर या देवीरूपी स्त्रीच्या आयुष्यातला तिचा देव मात्र, त्याच्या आयुष्यातल्या या देवीच्या आयुष्यासाठी, तिला प्रसन्न करून घेण्यासाठी, कधीच कोणती व्रते करताना दिसत नाही ना.. असं का बरं?
- सई मनोज