Home > Max Woman Talk > अब चुनरीपे पडा दाग छुपाना नही... मिलके आवाज उठानी हैं

अब चुनरीपे पडा दाग छुपाना नही... मिलके आवाज उठानी हैं

अब चुनरीपे पडा दाग छुपाना नही... मिलके आवाज उठानी हैं
X

मासिकपाळी… प्रत्येक स्त्रीच्या आपुलकीचा विषय. काही हेल्थ डिसआॅर्डरस् किंवा प्रेग्नसी असेल तरच गायब होणारी किंवा अनियमित होणारी ही आपली सखी. एरवी मात्र अगदी महिन्याच्या महिन्याला न चुकता हजेरी लावणारी.

आपल्या आज्जीबाई ‘त्या’ दिवसात कापडाचा वापर करायच्या. ती कापडे धुणे, वाळवणे अशा कटकटी पाळीच्या त्या वेदनांत, रक्तस्त्रावात आणखीनच भर टाकायच्या. आपल्या आईने तसे दोन्हीही अनुभवलय असं मला वाटतं. कपड्याची कटकट आणि सॅनिटरी पॅडसचा यूज ॲड थ्रो हा सुटसुटीतपणाही.

आपल्या जनरेशन मध्ये “सुखवस्तू” घरातल्या जवळपास सर्वच मुली पॅडस् वापरत असाव्यात. इथे सुखवस्तू हा शब्द ठळक होऊन नजरेला झोंबतो. अर्थातच सॅनिटरी पॅडसच्या प्रचंड किंमतींमुळे. आपल्याला ती किंमत प्रचंड वाटत नसावीही कदाचित, पण आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील स्त्रीयांचे काय? तुटपुंजी मिळकत आणि कुटुंबनियोजन वगैरे गोष्टींची माहिती शून्य असल्याने खाणारी तोंडे भरपूर. अशा परिस्थितीत ती स्त्री काय स्वत:च्या मासिक पाळीवर खर्च करणार? तसंही स्त्री, स्त्रीचे आरोग्य आपल्या इथे ‘नॉट सो इंम्पॉरटंट थिंग्स‘ आहेत. नाही का..!!

हे दुर्लक्ष, स्वत:ची हेळसांड यातून पाळीच्या दिवसात आवश्यक ती काळजी, स्वच्छता पाळली जात नाही. अत्यंत घाण कपड्याचा वापर संसर्गाला जन्म देतो. काही ठिकाणी तर स्त्रीया राख, झाडाची पाने वापरतात. या सगळ्यांतून गर्भाशयाच्या पिशवीचा कॅन्सर तसंच अनेक संसर्ग होण्याची शक्यता बळावते. ही शक्यता प्रचंड प्रमाणात सत्यातही उतरलीये.

पण हे एवढ्यावरच संपत नाही. पॅडसच्या अवाजवी किंमतींमुळे काही स्त्रीया एकच पॅड बऱ्याच कालावधीसाठी वापरतात. यातूनही गर्भाशयाच्या पिशवीचे वेगवेगळे विकार, संसर्ग उद्भवू शकतात. जनरली पाच तासांच्या वर एक पॅड वापरूच नये.

आधीच अपुरी माहिती, त्यात सॅनिटरी पॅडसच्या अवाजवी किंमती यांमुळे स्त्रीयांना ह्या प्रश्नांना तोंड द्यावे लागतेय. सॅनिटरी पॅडस ही अत्यंत महत्वाची, अत्यावश्यक गोष्ट आहे. ती अत्यल्प किंमतीत उपलब्ध होणे, तसेच बाकीच्या रेशनिंग गोष्टींबरोबर पुरवली जाणे गरजेचे आहे.

स्त्रीच्या पोटात देशाचे भविष्य उमलत असत. तीच स्त्री निरोगी नसेल तर कसं चालेल? स्त्रीयांनो स्वत:चे, स्वत:च्या आरोग्याचे महत्व ओळखा. काळजी घ्या स्वत:ची.

अब चुनरीपे पडा दाग छुपाना नही हैं.. मिलके आवाज उठानी हैं..

- सई मनोज देशमाने

Updated : 10 July 2020 4:42 AM GMT
Next Story
Share it
Top