Home > Max Woman Talk > रश्मी आणि उध्दव ठाकरेंची प्रेम कहाणी माहितीये का?

रश्मी आणि उध्दव ठाकरेंची प्रेम कहाणी माहितीये का?

प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे एक स्त्री असते,अगदी त्याचप्रमाणे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या राजकीय यशामध्ये त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचं मोलाचं योगदान आहे. या दोघांचा भेट कशी झाली, त्यांचा हा प्रेमाचा प्रवास कसा आणि कधी सुरू झाला याबद्दल आज जाणून घेऊयात.

रश्मी आणि उध्दव ठाकरेंची प्रेम कहाणी माहितीये का?
X

आधी फोटोग्राफर, मग शिवसेनेचे कार्याध्यक्ष त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख आणि आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या भल्या मोठ्या प्रवासात उध्दव ठाकरे यांनी अनेक चढ उतार अनुभवले आहेत. शिवसेनेची सुत्र हाती घेतल्यानंतर उध्दव ठाकरेंना अनेक कसोट्यांना सामोरं जावं लागलं. नारायण राणेंचं बंड असो वा राज ठाकरेंचा शिवसेनेला रामराम... या सगळ्या गोष्टी त्यांनी अगदी सचोटीने हाताळल्या. शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरेंच्या निधनानंतर शिवसेना उध्दव ठाकरेंनी ज्यापध्दतीने हाताळली ते सर्वश्रूत आहेच. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने न भुतो न भविष्यती अशा १८ जागा जिंकल्या. २०१९ ला देखील त्यांनी हीच जादू कायम ठेवत १८ च जागा मिळवल्या आणि पुढच्या काही महिन्यातच ते राज्याचे मुख्यमंत्री देखील झाले. आज ते प्रचंड यश अनुभवत आहेत पण त्यांच्या यशावर त्यांचा एकट्याचाच हक्क आहे असं जर आपल्याला वाटत असेल तर जरा थांबा. त्यांच्या या यशाला आणि दुखःला एक वाटेकरी कायम होता आहे आणि राहील ती व्यक्ती म्हणजे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे!


रश्मी ठाकरे कोण आहेत?

उध्दव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची पहिली भेट कशी झाली हे ठाऊक आहे का आपल्याला? नाही... मग आता जाणून घ्या. रश्मी ठाकरे ह्या स्वभावाने शांत स्वभावाच्या आहेत. त्या मितभाषी असल्या तरी निश्चयी आहेत. त्या स्वतःला नेहमी कामामध्ये गुंतवून ठेवतात. अशी माहिती त्यांचे काका दिलिप श्रुंगारपूरे यांनी एका मुलाखतीत दिली. रश्मी ठाकरे यांचा जन्म डोंबिवलीत माधव पाटणकरांच्या मध्यमवर्गीय कुटूंबात झाला. ऐंशीच्या दशकात मुलूंडच्या वझे केळकर महाविद्यालयातून त्यांनी पदवी मिळवली. रश्मी ठाकरे यांच्यावर त्यांचे आईवडील आणि सासू सासरे यांचा प्रभाव जास्त आहे. कौटूंबिक संस्कारांमध्येच मुलांचा सर्वांगिण विकास होतो या मताच्या त्या आहेत त्यामुळेच कधीही सत्ता आणि पैसा असूनही कधी त्यांनी डोक्यात हवा जाऊ दिली नाही.


अशी झाली रश्मी आणि उध्दव ठाकरे यांची भेट…

१९८७ साली रश्मी ठाकरे एलआयसी मध्ये कंत्राटी स्वरूपात नोकरीवर रूजू झाल्या. एलआयसीमध्ये नोकरी करत असताना त्यांची जयवंती ठाकरे यांच्या बरोबर मैत्री झाली. जयवंती या राज ठाकरे यांच्या सख्खी बहिण! रश्मी आणि उध्दव ठाकरे यांच्या भेटीमधील हाच खरा दुवा ठरला. त्यावेळी उध्दव ठाकरे आणि राजकारण यांचा दुर दुरपर्यंत काही संबंध नव्हता. ते त्यांच्या फोटोग्राफी मध्ये छान रमले होते. त्यांनी एक जाहीरात एजन्सी सुरू केली होती. फोटोग्राफर उध्दव ठाकरे यांची आणि रश्मी ठाकरे यांची भेट जयवंती ठाकरे यांनी एक दिवस भेट घालून दिली. या भेटीचं पुढे मैत्रीत आणि मग कालांतराने प्रेमात रूपांतर झालं. १३ डिसेंबर १९८९ रोजी हे दोघेही विवाहबंधनात अडकले. यानंतर या दांपत्याला आदित्य आणि तेजस ठाकरे हा अपत्य झाली. त्यापैकी आदित्य हे राज्याचे पर्यावरण मंत्री आहेत तर तेजस उत्तम फोटोग्राफर आहेत. एकूण काय दोघांनीही आपल्या वडीलांचा एक एक गुण आत्मसात करत करीयर घडवलं आहे.


रश्मी ठाकरे राज्याच्या मुख्यमंत्री होतील?

रश्मी ठाकरे यांचा राजकीय निर्णयात किती हस्तक्षेप असतो हे कुणालाही ठाऊक नाही मात्र ज्यावेळी पक्षचा वाईट काळ सुरू होता त्यावेळी पक्षातील लोकांना त्यांनी बांधून ठेवलं. आजही शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमात उध्दव ठाकरे यांच्यासोबत त्या जातीने हजर असतात. मग तो शिवसेनेचा दसरा मेळावा असो किंवा उध्दव ठाकरेंची राजकीय सभा! त्यांचा सध्याचा शिवसेनेतील वाढता वावर पाहून विरोधकांनी तर २०२१ च्या हिवाळी अधिवेशनात उध्दव ठाकरेंच्या अनुपस्थितीत रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करा अशी मागणीदेखील केली होती. अर्थात ती फक्त मुख्यमंत्र्याच्या अनुपस्थितीवर केलेली टीकात्मक चर्चा होती इतकंच! हे राजकारण आहे, इथे कधी काय होतं कशी सुत्र फिरतात हे कुणालाही ठाऊक नसतं त्यामुळे जर भविष्यात रश्मी ठाकरे यांच्या रूपात राज्याला पहिल्या महिला मुख्यमंत्री मिळाल्या तर त्यात आपल्याला काही नवल वाटायला नको! काय, भविष्यात संधी मिळाली तर रश्मी ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं का आपल्याला काय वाटतं आम्हाला प्रतिक्रीयांद्वारे जरूर कळवा.

Updated : 19 April 2022 7:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top