Home > Max Woman Talk > एक झुंज करोनाशी

एक झुंज करोनाशी

एक झुंज करोनाशी
X

६ जुलै रोजी माझ्या बायकोला म्हणजे अनघाला पहिल्यांदा १०१ पर्यंत ताप आला. एव्हाना कोविड बद्दल भरपूर वाचन झाल्यामुळे मी याबद्दल आमच्या बिल्डींग मध्ये नव्याने राहायला आलेले डॉक्टर वेर्लेकर यांना बोललो. त्यांनी ताबडतोब आम्हा दोघांनाही Vitamin D, Vitamin C, तसेच Bikozinc च्या गोळ्या सुरू करायला सांगितल्या. दरम्यान आमचे फॅमिली डॉक्टर पिंगळे यांना देखील या संबंधी कल्पना दिली. तीन दिवसांनी सुद्धा रोजचा ताप येणे बंद होईना. तेव्हा मात्र तातडीने कोविड टेस्ट करून घेतली. तिचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आणि कोरोनाचे आमच्या घरी आगमन झाले.

अनघाला ताप आल्याच्या दिवसापासून मी मला कोरोना झाला आहे. असे समजून चाललो होतो आणि वर लिहिलेल्या सगळ्या गोळ्या अनघाच्या बरोबरीने घेत होतो. लक्षणे दिसली तर आपलीही टेस्ट करून घ्यायची असे ठरवले होते. परंतू तसे काही झाले नाही. कदाचित मला नकळता कोरोना होवून देखील गेला असावा असे मानायला जागा आहे.

नियमाप्रमाणे पेशंटचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला तर तो आपल्या आधी डायरेक्ट BMC ला कळवला जातो. तसा अनघाचा देखील कळवला गेला. सकाळीच BMC कडून आम्हाला फोन आला व त्यांनी वैद्यकिय बाबींच्या बरोबरीने आम्हाला राहता कुठे, घर केवढे आहे, टॉयलेट सेपरेट आहे का? वैगरे प्रश्न विचारले व ऑक्सिजन लावण्याची गरज नसल्याने घरीच क्वारंटाईन होण्यास सांगितले.

त्याबाबतचे नियम समजावून सांगितले आणि कोणतीही गरज भासल्यास संपर्क करण्यासाठी एक टेलिफोन नंबर दिला. तासाभराने BMC ची काही लोक घरी आली आणि माझ्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारला गेला.

दुसरी टीम येऊन घर सॅनिटाईझ करून गेली. त्या नंतर पुढचे दहा बारा दिवस BMC कडून रोज आम्हाला फोन येत असे व अनघाची स्थिती तसेच प्रगती ते जाणून घेत असत. एकदा मुद्दाम चेक करण्याकरीता म्हणून मी BMC ने दिलेल्या नंबरवर फोन केला होता. तिथे दोन डॉक्टर्स उपस्थित होते व त्यांनी माझ्या शंकांचे नीटपणे निरसन केले.

या कोविड काळात BMC वर होत असलेले उलट सुलट आरोप वाचनात आल्यामुळे मी मुद्दाम हा माझा अनुभव लिहित आहे.

माझ्या आईने मला आयुष्यभरासाठी एक कानमंत्र देऊन ठेवला आहे की, ‘आपले दु:ख नेहमी वेशीवर टांगायचे म्हणजे लोक मदतीला धावून येतात. लपवून ठेवले तर कुणीही येत नाही’ ...

या वेळी देखील मी तसेच केले. अनघाला कोरोना झाला आहे हे कुठेही लपवून ठेवले नाही. सोसायटीत, नातेवाईकांना व मित्रमंडळीत कल्पना दिली आणि लोक मदतीला धावले. आमच्या ब्रेकफास्ट, जेवणाची व्यवस्था ताबडतोब आमच्याच बिल्डींग मधल्या सेजल व्होरा हिने उचलली व उत्तम रीतीने निभावली.

बाहेरून औषधे वगैरे जे काही लागेल ते माझा पार्ल्यातला मित्र देवदत्त परांजपे आणून देत होता. फेसबुकवरच्या माझ्या स्नेही डॉक्टर शीतल पाटील श्रीगिरी यांच्याशी मी रोज संपर्कात होतो व त्या देखील बहुमुल्य मार्गदर्शन करत होत्या. माझा मित्र विद्याधर चिंदरकर तर कुठल्याही मदतीसाठी नेहमीप्रमाणे पाठीशी होताच. शिवाय आणखीही बरेच मित्र मैत्रिणी या ना त्या प्रकारे सहाय्यभूत होत होते.

या सर्वांचे आभार मानायला शब्द कुठून आणायचे? विश्वासातले आणि सहृदय डॉक्टर्स आपल्या बरोबर असणे. हा तर हल्लीच्या काळात माणसाच्या आयुष्यातला भाग्ययोग म्हणायला हवा. माझ्या नशिबात तो असण्याचे सुख मी या काळात डॉक्टर पिंगळे आणि डॉक्टर वेर्लेकर यांच्यामुळे अनुभवले. माणसाला आयुष्यात पैशांची गरज तर असतेच परंतू त्याहून अधिक गरज माणसांची असते. घरात कुणाला आजारपण आले की ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते.

कोरोना बाबत आता आपल्याकडे प्रचंड प्रमाणात जागृती झाली आहे. या विषयात डॉक्टरांपेक्षा हुशार आणि तज्ञ अशी मंडळी प्रत्येक गल्लीत सापडतायत, त्यामुळे त्याबद्दल मी वेगळे काही लिहिण्याची गरज नाही. फक्त मला अनुभवाने जाणवलेल्या काही बाबी लिहितो.

ज्यांची प्रतिकारशक्ती उत्तम आहे. ते चार पाच दिवसांत विशेष काही न होता सहज कोरोनामुक्त होतात, मात्र, सात आठ दिवस झाल्यावर देखील लक्षणे दिसत राहिली तर कोरोनाला अजिबात हलक्यात घेऊ नका.

डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणेच वागा. WhatsApp वर आलेल्या औषधांच्या सहाय्याने कोरोनावर मात करण्याचा प्रयत्न करू नका. कोरोना पेशंटच्या बाबतीत साधारण बाराव्या दिवशी इम्तेहान की घडी येते. पूर्वींच्या पिक्चर मधल्या फिल्मी आया हीरोला सांगायच्या की,

‘जिंदगीमे तुम्हे दो रास्ते मिलेंगे, एक तुम्हे अच्छाई की तरफ ले जाएगा और दुसरा बुराई की तरफ’

अगदी तशीच ही परिस्थिती असते. इथून पेशंट एक तर रिकव्हरीच्या मार्गाने जातो किंवा काहीतरी जास्त कटकटी निर्माण होतात, ज्या काही प्रसंगी प्राणांवर बेतू शकतात. त्यामुळे सावध रहा आणि सतत ऑक्सिमिटर वर ऑक्सिजन चेक करत रहा. या दिवसांत ऑक्सिमिटर हा जीवाचा सखा आहे एवढेच लक्षात ठेवा.

अनघाला ताप येणे दहा दिवसांनंतर देखील सुरू होते. त्यामुळे पिंगळे डॉक्टरांच्या सल्ल्यावरून आम्ही तिचा एक्स रे आणि HCRT स्कॅन करून घेतला होता. त्यात फुफ्फुसाला झालेले इन्फेक्शन दिसत होते. मात्र, ते थोड्या प्रमाणात होते. वेळीच उपचार न होता हलगर्जीपणा झाल्यास हे इन्फेक्शन पुढे वाढू शकते व गुंतागुंत निर्माण होते. अनघाच्या बाबतीत वेळीच निदान होऊन योग्य औषध योजना झाली आणि तिचा परिणाम पुढच्या तीन चार दिवसांत दिसला. तिची तब्बेत चांगली सुधारली. या संपूर्ण काळात अनघाची ऑक्सिजन लेव्हल चांगली होती ही सर्वात मोठी जमेची बाजू ठरली.

अनघाला ऑफिसला जायचे तर कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट असणे आवश्यक होते. म्हणून २७ जुलै रोजी तिची पुन्हा कोविड टेस्ट केली. ती पॉझिटीव्ह आली, परंतू डॉक्टर्सनी आश्वस्त केले की काळजीचे कारण नाही. काही दिवसांनी ती निगेटिव्ह येईल. त्याप्रमाणे काल पुन्हा एकदा केलेल्या टेस्टचा रिझल्ट निगेटिव्ह आला आणि आमची एक महिन्यानंतर या कटकटीतून एकदाची मुक्तता झाली.

आता मी माझी antibody टेस्ट करून घेणार आहे. म्हणजे मला कोरोना होवून गेलाय किंवा कसे ते कळेल. माझ्यात antibodies तयार झालेल्या दिसल्या नाहीत तर मला सावध रहायला हवे.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या कोरोनाकाळात घरातली सर्व कामे मी उत्तमरीत्या केली असे प्रमाणपत्र मला अनघा कडून मिळाले आहे. जे सोनेरी फ्रेममध्ये आमच्या घरात सर्वांना दिसेल अशा जागी लावण्यात येणार आहे.

  • उदय जोशी

लेखक जेष्ठ पत्रकार आहेत...

Updated : 14 Aug 2020 1:14 AM GMT
Next Story
Share it
Top