Home > Max Woman Blog > 'एक धागा प्रचंड अस्वस्थ करणारा'

'एक धागा प्रचंड अस्वस्थ करणारा'

एक धागा प्रचंड अस्वस्थ करणारा
X

लॉक डाऊन च्या काळा पासून एक "सिंथेटिक धागा" मला प्रचंड अस्वस्थ करतोय.आयुष्यात काही गोष्टीं मधली सत्यता कळायला काही काळ जाऊनच द्यावा लागतो पण यात जिवघेणे येवढेच असते की त्यातला खरे पणा समजतो तेंव्हा हातातली वेळ निघून गेलेली असते मग रहातात त्या फक्त आठवणी आणी स्वतःला कोसत रहाणे शेवटी प्रत्येकाने स्वतः भोवती एक अदृश्य कोष बनविलेले असतो त्या कोषा च्या आतला तो एकदम वेगळा असतो आणी त्याला ते वेगळे पण जपायचे असते फक्त स्वतः साठी.काही प्रसंग घडतात कोषातला तो बाहेर येतो मिनीटभरा साठी आणी मग वास्तव आणी भ्रम यांच्यात एक अघोषित युद्ध चालू होते. या रणभूमी वर शत्रू नसतो तर असते आपलेच आपल्याशी छेडलेले युद्ध अशाच एका प्रसंगी माझ्या च कोषातून क्षणभरा साठी बाहेर पडत असतानाचा एक नकोसा धागा मनाला टोचला ,तो व्रण काही केल्या बरा होत नाही. शेवटी आज ठरवीलच यावर उपाययोजना करायलाच हवी.

लॉक डाऊन सुरू होण्याच्या काही दिवस आधी पासून ते नंतरचे पंधरा दिवस पूर्ण प्रभाग सॅनिटायझ करण्याची एक मोहिम मी सुरू केली होती, त्यासाठी महत्वाचे औषध म्हणजे सोडियम हायपो क्लोराईड. हे औषध सांगितलेल्या प्रमाणात मिसळून अक्षरशः दिवसभर आम्ही फवारणी करत असू. फवारणीसाठी माझ्याच गाडी चा ड्रायव्हर होता. रस्ते दाखविताना चूकून ब्लोअर सुरू झाला की औषध अंगावर पडत रहायचे. नेहमी साडी घालण्याची सवय पण त्या काळात घरातले साधेच ड्रेस अंगावर असायचे रात्री दहा ला जेंव्हा घरी यायचे तेंव्हा आंगाची विचीत्र पद्धतीने लाही व्हायला सुरूवात झालेली असायची आणी मग थंड पाण्याच्या बादल्या अक्षरशः अंगावर ओतून घ्यायला लागायच्या.

मला लहान पणा पासूनच ब्रॅन्डेड कपड्यांची आवड आणी ती मी नेहमीच जपली ,पण या काळात थंड पाण्याने अंघोळ केल्या नंतर सुती,कॉटन सोडून काहीही घातले की अंगाची लाही व्हायला लागली मग एखाद्या ड्रेस मध्ये थोडे जरी टेरिकॉट अथवा नायलॉन मिक्स असले तरी ते नकोसे वाटायचे आणी मग भूतकाळा तली एक आठवण माझा पिच्छा च पुरवायला लागली.

माझी आई तीचे नाव "पुष्पलता" पण आजोबा तीला लाडाने "पिलू" म्हणायचे .तीचं लग्न ती दहावी पास झाल्या झाल्या लावले गेले. आजोबांची ती प्रचंड लाडकी. ते नेहमी म्हणायचे पिलू च्या पायात लक्ष्मी आहे जिथे जाईल तीथे भरभराट होईल .आणी तसेच झाले ती माझ्या वडीलांच्या घरी आली आणी त्यांनी मग मागे वळून पाहीलेच नाही.
माझ्या वडिलांनी BA पर्यंतचे शिक्षण भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेत कमवा आणी शिका या योजनेत झाले.अत्यंत चांगल्या मार्क्स नी त्यांनी ते पूर्ण केले. तेंव्हा शंकरराव मोहिते पाटील ( काका साहेब) यांनी त्यांना भाऊसाहेबांच्या नावाने एक पत्र आणी पाच रूपये खर्चाला देऊन साताऱ्याला पाठवीले .ते पत्र मी नंतर वाचले त्यातला साहेबांनी लिहीलेला एक उल्लेख मला फार भावला "हा मुलगा अत्यंत होतकरू आहे ,संस्थेचे नाव काढेल" आणि तसंच झाल वडील भाऊं साहेबांचे अत्यंत लाडके झाले .


आई लक्ष्मी च्या पावलाने घरात आली आणी त्यांनी मग मागे वळून पाहीलेच नाही. ते कारखान्या चे MD झाले .आई मग पोल्ट्री,डेअरी, शेती या मध्ये रमली .पण मला नेहमी कोडे पडायचे क्वचित राग ही यायचा, ही अशी का आहे? ती ने मरे पर्यंत अक्षरशः पाच/ सहा साड्या च वापरल्या. एक चप्पल तुटल्या नंतर तीच चप्पल ठिगळे लाऊन लाऊन ती पुढे एक वर्षा पर्यंत वापरायची. मी लहान असताना माझ्या भावाला अगाखान पॅलेस या शाळेत पूण्या ला शिक्षणा साठी ठेवलेले.तो तेंव्हा सहा वर्षाचा असावा.भली मोठी शाळा ,सगळे फाड फाड इंग्रजी बोलणारे , पण तीचे आपले नेहमीचेच तीच ती साडी तशाच त्या चपला आणी डोक्यावरचा तो ओढलेला पदर, तीला कसलाच फरक पडायचा नाही.

घरी पण तीचा दिनक्रम ठरलेला पहाटे पाच वाजता कोंबड्यांच्या पोल्ट्रीत त्यांना खाद्यपाणी देणे, आंड्यां चे ट्रे भरणे नंतर गाईंचा गोठा, वैरण देणे मग हाताखालच्या माणसा कडून गोठा साफ करून घेणे आणी मग तीच धार काढायला बसायची, परत शेती ची कामे.वडील खव्वये मग त्यांच्या साठी पदार्थ बनविणे.
पुढे मी पण पूण्या ला शिकायला गेले पण तीचा दिनक्रम तसाच.

ती होस्टेल वर यायची ,मी बर्याच वेळा चिडायचे तू मुद्दाम तशी राहतेस का? माझी कपाटे नव नवीन ड्रेस नी शिगोशिग भरलेली असायची आणी ही कधीही भेटायला आली की तीच ती साडी. मग मी खुप तडातड बोलायचे तु मुद्दाम अशी वागतेस. का घालते त्याच त्या उळगलेल्या( ती ला कोसतानाचा माझा हा आवडता शब्द) साड्या. ती रडवेलेसे तोंड करायची आणी म्हणायची अग याच बऱ्या वाटतात नव्या साडीतला नायलॉन चा धागा त्रास देतो. मला वाटायचं ही नौटंगी करतेय. मला नवीन सॅन्डल्स चे भारी वेड तेंव्हा स्टीलॅटो सॅन्डल्स ची फॅशन होती. ती भेटायला आली की कॅम्प च्या रिगल मधून मी त्या विकत घ्यायची. बराच वेळा तीच्या पायातल्या चपला बघून तीतला स्टाफ आम्हाला फॅशनेबल चपला ही नाही दाखवायचा. मग मी संतापून म्हणायचे अग एखादी फ्लॅट चप्पल घे. ती हळूच किंमत पहायची आणी मग गोठ्यात स्लिपर च बर्या पडतात पटकण धूता येतात चा घोष लावायची. वडीलांना चांगल्या हॉटेल मध्ये जेवायची खुप आवड मग आम्ही नेमाने खैबर, ब्लूॅ डायमंड मध्ये जेवायला जायचो पण तीच्या पेहरावात कधीच फरक पडला नाही. हॉटेल मध्ये डोक्यावरचा पदर आणखी खाली ओढूण ती शांतपणाने जेवण करायची. तीला आक्का (विजय दादांच्या आई) कोणा कोणा च्या लग्नात छान छान साड्या द्यायच्या पण ती त्यांचे मन राखण्या साठी त्या साडीची घडी मोडायची आणी जशी च्या तशी ठेऊन द्यायची, परत ती चे तेच पालूपद नायलॉन चा धागा नकोसा वाटतोय.


मधल्या काळात बरच पूला खालून पाणी गेले .माझं, माझ्या भावाचे लग्न झाले. कालांतराने वडील वारले.माझे व्याप खुप वाढले मग मी कधी मधे तीला नाशिक ला घेऊन यायला लागले. मग मी तीला शक्यतो कॉटन च्या साड्या आणून द्यायचे आणी रोज घालत जा अस सांगायचे. कितीही कॉटन म्हटलं तरी काही मिक्स असायचच मग ती माझ्या भिती ने एखादा दिवस ती साडी घालायची मग तीच्या नेहमीच्या सुती साड्या( कॉट खाली नॅचरल इस्त्री साठी ठेवलेल्या) काढायची आणी त्याच घालायची. थोडे दिवस माझ्या कडे राहीली की तीला भावाची आठवण यायला लागायची. ती चा जीव नेहमी त्याच्यात गूंतलेला तो फार धावपळ करतो आता मला जायला पाहीजे चा रट्टा सुरू करायची. मग मी तीच्या साठी पश्मिना, खादी साडी अस काही बाही आणायचे जाताना परत त्या साड्या माझ्या च कपाटात ठेवत ती म्हणायची तुला कार्यक्रमात घातल्या जातील मला तसा काहीच उपयोग नाही.

अगदी ती गेल्या नंतर सुद्धा माझा ठाम ग्रह होता ती या बाबतीत मुद्दाम नाटक करायची असा साडीत एखादा नायलॉन चा धागा अंगाला येवढा कधी तरी त्रास देईल का? आणी एक महिन्या पूर्वी फवारणी च्या निमीत्ताने सगळं चित्र स्पष्ट झालं.ते माझे रोजचे तीन / चार ड्रेस च मला बरे वाटायला लागले, वेगळं काही घातलं की अस्वस्थ व्हायला लागले,अगदी नकोसे वाटायला लागले.

निम्मीत कशाचे का असेना पण हो तो अदृश्य नायलॉन चा धागा मला आता प्रचंड टोचतो.आणी आता तेवढ्यां वर्षां नंतर आई ला म्हणावेसे वाटते की हो तु बरोबरच होतीस त्यात कूठलीच नौटंगी नव्हती .पण आता खुप उशीर झालाय तीच्या अशा वागण्याचे तीला कधी स्पष्टीकरण देताच आले नाही आणी मी तीला पाहीले कायम माझ्याच चष्म्यातून
आता प्रकर्षाने वाटते की एखादी तरी इंटरनेट सर्व्हिस अशी हवी होती ती फक्त एकदा जरी काही क्षणा साठी कनेक्ट झाली पाहिजे फक्त एकदाच झाली तरी चालेल कारण मला तीला मना पासून सॉरी म्हणायचे आहे.


-डॉ हेमलता पाटील

Updated : 25 April 2020 11:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top