"...पण भल्या सकाळी अभ्यासाला बसवणारी आई आता त्यांच्यासोबत नसेल"
X
आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोनाच्या विरुद्ध सुरू असलेल्या युद्धात सेनानायक म्हणून उतरले, तेव्हापासून त्यांच्या आई आजारीच आहेत.
रोज सकाळी राजेश आईला भेटायचे, तेव्हा 'आधी कामाचं बघा. राज्याकडं लक्ष द्या', असा आदेश आईचाच असे.
आईबद्दल वाटणारी काळजी मनाच्या तळाशी दडवून ठेवत कर्तव्यकठोरपणे राजेश कामाला सुरूवात करत. चांद्यापासून बांद्यापर्यंतचा महाराष्ट्र बरा व्हावा, यासाठी रात्रीचा दिवस करणा-या या आरोग्यमंत्र्यांना आपल्या आईच्या आरोग्याची काळजी चारचौघात व्यक्तही करता येत नसे.
आई हा राजेश टोपेंचा किती हळवा कोपरा आहे, हे त्यांच्या मित्रांना नीट ठाऊक आहे.
सन्मित्र राजेश टोपेंच्या आई आज त्यांना सोडून गेल्या. पण, या योद्ध्याला शोक करण्यासाठीही उसंत नाही.
कोरोनाचं गांभीर्य समजणं आणि त्यासाठी एखाद्या मिशनप्रमाणं लढणं, या संदर्भात देशातल्या दोघांनी मला विलक्षण प्रभावित केलं आहे.
त्यापैकी एक आहेत केरळच्या आरोग्यमंत्री शैलजा. आणि, दुसरे, आपले आरोग्यमंत्री राजेश टोपे.
राजेश टोपे ज्या 'सिन्सिअर' आणि 'सेन्सिबल' पद्धतीने कोरोनाच्या आव्हानावर मात करत आहेत, त्यासाठी शब्द नाहीत.
आज या योदध्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही, "नियमावलीप्रमाणेच अंत्यसंस्कार होतील", असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
या कोसळलेल्या आभाळावर उभं राहात, राजेश नियमितपणे कामाला सुरूवात करतीलच; पण भल्या सकाळी अभ्यासाला बसवणारी आई त्यांच्यासोबत नसेल.
- संजय आवटे