Home > Max Woman Talk > बाईला शिक्षा फक्त ‘कमरेखालचीच’ आहे का ?

बाईला शिक्षा फक्त ‘कमरेखालचीच’ आहे का ?

बाईला शिक्षा फक्त ‘कमरेखालचीच’ आहे का ?
X

गेले काही दिवस अग्रिमा जोशुआचं नाव अनेक वेळा ऐकण्यात आलं. कारण काय तर तिने स्टँडअप कॉमेडी शोमध्ये शिवाजी महाराजांचा अपमान केला. मग सगळे शिवप्रेमी चवताळून उठले. सर्वांची शिवभक्ती जागी झाली. मग तिनं नक्की त्या कार्यक्रमात काय म्हटलं याचा काहीही विचार न करता सर्वांचं पित्त खवळलं. एकानं टीका केली म्हणून दुसऱ्यानंही त्याची री ओढली. मग सोशल मीडियावर अग्रिमा जोशुआ विरोधात रान उठवून तिला माफी मागायला भाग पाडलं.

अग्रिमा जोशुआने जर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला असेल तर तिनं नक्कीच माफी मागावी त्यात काही गैर नाही. मात्र, तिच्या माफीच्या बदल्यात आपणही काहीतरी गमावलंय. काय गमावलंय माहितीये?... आपली नितीमत्ता. ज्या महाराजांनी स्त्रीला स्वतःच्या देव्हाऱ्यात स्थान दिलं परस्त्रीला कायम सन्मानाची वागणूक दिली ते शिवभक्त आज या अग्निमावर टीका करताना कमरेखालची भाषा करतात. का हो स्त्रीला शिक्षा द्यायची असेल तर कायद्याने नाही का देता येणार? एखाद्या स्त्रीला शिक्षा द्यायची असेल तर तिच्यावर बलात्कार करा, ऍसिड टाका, भररस्त्यात तिच्या अंगावर हात टाका, किंवा मग अश्लिल शेरेबाजी करा. बस्स एवढंच...

महाराजांचा अपमान करण्याचं हेच काम अग्रिमा सोबत एका पुरुषानेही केलं. मग तुम्ही काय केलं? धोपटला ना त्याला. मग अग्रिमाला पोलिसांकडे द्यायचं होतं? पोलिसांनी केली असती योग्य ती कारवाई. पण नाही… आम्ही आमची नितीमत्ता दाखवणारच. या कार्यक्रमात खरतंर अग्निमानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरून राजकारण्यांवर टीका करण्याचा प्रयत्न केला, आणि एका ठिकाणी तिनं शिवाजी स्टॅच्यु असा उल्लेख केला. अर्थात शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. हाच न्याय असेल तर मग आपणही सर्व दोषी आहोत. कारण शिवाजी पुतळा, शिवाजी नगर, शिवाजी चौक म्हणताना आपण कोणता सन्मान करतोय महाराजांचा. एक परभाषिक, परप्रांतीय मुलगी शिवाजी पुतळा म्हणताना इंग्रजीत शिवाजी स्टॅच्यु म्हणाली ते एवढं बोचलं तर मग आपलं काय? आपला न्याय कोण करणार? दुसऱ्यावर टीका करणं सोपं आणि महिलांवर तर आणखी सोप्प. बाईच्या कपड्यांवर शरीरावर बोललं की छाती कशी फुगून येत असेल ना? पण मग स्वतःला शिवभक्त म्हणण्याचा अधिकार आहे का आपल्याला? हा विचार नाही का येत अशा विकृतांच्या मनात..

  • अश्विनी पवार-सूर्यवंशी

Updated : 13 July 2020 1:33 AM GMT
Next Story
Share it
Top