Home > Max Woman Talk > हे कसले 'आयडॉल'?

हे कसले 'आयडॉल'?

आपल्या आसपास अनेक घटना घडत असतात. या घटनांचे परिणाम दूर कुठे तरी इतक्या भयानक स्वरूपात होत असतात याची जाणीव कोणालाही नसते. अशाच छोट्या ‘कृती’तून घडणाऱ्या मोठ्या ‘कृत्यांवर’ भाष्य करणारा आश्विनी पवार सुर्यवंशी यांचा लेख..

हे कसले आयडॉल?
X

सोनी टीव्हीवरील लोकप्रिय रियालिटी शो इंडियन आयडॉल आता घराघरात पोहोचलाय. मात्र गेल्या काही दिवसात गायन सोडलं तर एक बाब जास्त अधोरेखित झाली. कोणत्याही गायकाचं गाणं उत्कृष्ट झालं की मग काला टिका परफॉर्मन्स, नजर ना लगे... वगैरे वगैरे प्रकार इथल्या जसेस किंवा पाहुण्यांकडून होताना पाहिले. यावेळी लक्षात आलं की इतका मोठा चाहता वर्ग असलेले हे गायक जसेस किंवा येणारे पाहुणे अशा प्रकारची कृती करतात तेव्हा त्यातून काय संदेश जात असेल.

खरंतर शिकल्याने विचारांचीही उंची वाढणं अपेक्षित असतं. मात्र, दुसऱ्या कोणाचं तरी परीक्षण करण्याआधी या जसेसना आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे की का काय? असं वाटतं. उच्चभ्रू लोकंही किती बेजाबदारपणे एवढ्या मोठ्या वाहिनीवर अशी कृती करतात हे यातून दिसून आलं.

हा मुद्दा मात्र इंडियन आयडल पुरताच मर्यादित रहात नाही. विद्या बालनची केसांच्या तेलाची जाहिरात असो किंवा मग 'फेअर अँड लव्हली' जे आता 'ग्लो अँड लव्हली' आहे.. त्यांनी स्वतःचं नामांतर केलं खरं मात्र विचार काही बदलला नसल्याचं त्यांच्या जाहिरातीतून ठळक दिसतंय.. अर्थात नाव बदलून काहीही 'फेअर' झालं नाही..

मूळ मुद्दा असा की किसी की नजर लगे..लोग तो नजर उतारेगेंही.. हे सगळं आपल्या 'ब्रँडेड' जाहिराती 'बँड्रेड' कलाकार करतायत..कदाचित हा मुद्दा वाचताना पाहताना फार गौण आणि छोटा वाटेल.. पण ही छोटी गोष्ट त्याचं मूळ कुठेतरी घट्ट करत जाते आणि त्यातून बीडच्या शुभमचा बळी जातो..जळगावची एक 17 वर्षांची मुलगी बळी जाते किंवा मग मावळमध्ये गरोदर महिलेला बाळासह जीव सोडावा लागतो...

नजर लागणं, दृष्ट लागली किंवा करणी केली अशा कारणातून हत्या झाल्याच्या घटना आजवरच्या करिअरमध्ये अनेक वेळा अनुभवायला मिळाल्या. बीडमध्ये शुभम नावाच्या मुलाला त्याच्या शेजारच्यांनीच करणीच्या संशयातून ठार केलं. जळगावमध्ये साप चावला म्हणून डॉक्टरकडे न जाता बाबाकडे नेलं आणि मुलगी मेली. मावळमध्ये गरोदर महिलेला पोट दुखायला लागल्यावर डॉक्टरऐवजी भगताकडे नेलं आणि महिला बाळासह मेली. पण या सगळ्या घटनांमध्ये हे बाबा, भगत, तांत्रिक, मांत्रिक हे एकदम प्रकट झालेले नाहीत..या सगळ्यांचं मूळ कुठेतरी घरातच होतं..

घरातूनच किंवा परिसरातून या तंत्र-मंत्राच्या उपचारांची सुरुवात होते. त्याला बळ मिळतं आणि मग सुरु होतो संघर्ष मरणाचा आणि मारण्याचा. गोष्ट छोटी..डोंगराएवढी.. असं म्हणतात..काही गोष्टी दिसतात खूप लहान मात्र दूरगामी त्यांचे परिणाम इतके भयंकर असतात की काही वेळा त्याची कल्पना करणं सुद्धा भयानक असते...आपण कृती करतो तेव्हा त्याचे परिणाम दूर कुठे तरी इतक्या भयानक स्वरूपात होत असतात याची जाणीव कोणालाही नसते..त्यामुळे किमान सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून अशा गोष्टींना पाठिंबा देणं सेलिब्रिटींसोबत सर्वसामान्यांनीही ठेवावं अन्यथा रोज कुठेतरी शुभम बळी गेल्याशिवाय राहणार नाही..

- आश्विनी पवार सुर्यवंशी

Updated : 25 Feb 2021 11:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top