Home > Max Woman Talk > "..तेव्हा मात्र वाईट वाटत"

"..तेव्हा मात्र वाईट वाटत"

प्रकाश आमटे यांच्या वाढदिवसानिमीत्त आरती आमटे यांची भावनीक पोस्ट..

..तेव्हा मात्र वाईट वाटत
X

बाबा आज सकाळी म्हणत होता की "आत्ता मागच्या दोन-तीन दिवसांपासून थोडं चांगलं ऐकायला मिळत आहे नाहीतर गेल्या काही महिन्यांपासून सगळं वाईटच ऐकायला मिळत होत". खरच आहे. गेले काही महीने आई - बाबाला, घरातील सगळ्यांनाच खुप त्रास सहन करावा लागला, अजूनही होत आहे, आणि बहुतेक तरी अजून बरेच दिवस असेच जातील. झाल ते विसरता किंवा दुर्लक्ष करता येण्यासारखं नाहीये, कदाचित तसा मुद्दाम प्रयत्नही घरातील कोणी करणार नाही. कोण बरोबर होत, कोणाची काय चूक होती यावर चर्चा करूनही आता विशेष काही फायदा नाही. पण तरीही मनात अनेक प्रश्न रेंगाळत राहतात, आणि वाईट वाटत राहत.

बाबाने अनेक प्राण्यांना प्रेमाने वाढवलं, खेळवलं, व हे सर्व तो आजही करत आहे, पण त्याने कधी 'मला प्राण्यांची भाषा समजते' असे कोणाला सांगीतले नाही किंवा कोणी कौतुक कराव म्हणूनही त्याने हे सर्व केल नाही. अस असत तर त्याच्या अंगा खांद्यावर प्राण्यांच्या नखांनी - दातांनी उमटलेले ओरखडे व जखमा दिसल्या नसत्या, साप चावल्यावर काही विशिष्ट reaction आल्यामुळे मृत्युशी लढा द्यायची वेळ असी नसती, किंवा प्राणी जप्त होणार या भीतीने त्याची झोप उडवली नसती. पण तरीही काही लोक जेव्हा म्हणतात की 'यांना मुक्या प्राण्यांची भाषा समजते, पण मग माणसांची भाषा समजत नव्हती का' तेव्हा मात्र वाईट वाटत.

आई – बाबा नेहमी नीटनेटके राहतात, पण त्यांच्या वैयक्तिक गरजा मात्र खुपच कमी आहेत, आणि आता गेल्या अनेक महिन्यांपासून तर त्यांनी जेवणही आणखिनच कमी केले आहे, तेही बऱ्याचदा फक्त एकच वेळ व तेही शक्यतो प्रकल्पाच्या mess मध्येच. ते कायमच वैयक्तिक व्यवहार व संस्थेचा व्यवहार यांची सरमिसळ होणार नाही म्हणून, व आम्हा सर्व मुलांच्या मनात देखील त्याबद्दल कुठलेही गैरसमज निर्माण होणार नाहीत व राहणार नाहीत म्हणूनही कायमच दक्ष राहीले आहेत. आमच्या सर्वांच्या शिक्षणाच्या वेळेस होत असलेल्या खर्चाचा ताळमेळ लावताना त्यांना झालेला त्रास आम्ही सर्वांनी पाहीला आहे, अनुभवला आहे. आमच्या शिक्षणानंतर आम्ही काय करावे याचे पूर्ण स्वातंत्र्यही त्यांनी आम्हाला दिले होते. पण या सर्व गोष्टींची त्यांनी कधी जाहिरात मात्र केली नाही. आणि तरीही जेव्हा काही लोक म्हणतात की 'यांनी समाज सेवेच्या नावाखाली फक्त पैसा जमा केला व मुलांची - नातवांची सोय करून ठेवली' तेव्हा मात्र वाईट वाटत.

कायमच अतिशय बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत असतानाही आई - बाबांनी आम्हाला संयमाने व आनंदाने आयुष्य जगता येत हे दाखवून दिल, नकळत शिकवलंही. त्यांच्यामुळे अनेकांची आयुष्य घडली, संसार जुळले, कुटुंब तुटण्यापासून वाचले. व या सर्वाचाही त्यांनी कधी बोभाटा केला नाही किंवा याचे classes ही घेतले नाहीत. पण तरीही जेव्हा काही लोक म्हणतात की 'यांनी जरा सांभाळून घ्यायला पाहिजे होत, मन मोठं करायला पाहिजे होत, समजूतदारपण दाखवायला पाहिजे होता' तेव्हा मात्र वाईट वाटत.

पण असो. झाल ते झाल. वाईट वाटण्यासारखं बरच असलं तरी आनंद मानावा अस मात्र त्याहून नक्कीच जास्त आहे, असतच. आणि आजचा दिवस आनंदाने जगायलाही त्यांनीच आम्हाला शिकवलयं, तेच तेही करत आहेत व आम्हीही करायचा प्रयत्न करतोय.

Happy birthday बाबा. Love you. Miss you.

- आरती आमटे

(लेखिका ज्येष्ठ सामजसेवक डॉक्टर प्रकाश आमटे यांची कन्या आहेत)

Updated : 27 Dec 2020 1:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top