Home > Max Woman Talk > रमाबाई नगर हत्याकांड आणि 5 वर्षाची ‘ती’

रमाबाई नगर हत्याकांड आणि 5 वर्षाची ‘ती’

रमाबाई नगर हत्याकांड आणि 5 वर्षाची ‘ती’
X

11 जुलैची सकाळ… एरवी जशी सकाळ होते. अगदी तशीच सकाळ होती. सतत धावणारी मुंबई 23 वर्षापुर्वी ही धावतच होती. साधारण 7 ते 7:30 ची वेळ असेल. तेव्हा मी 5 वर्षाची होती. आमच्या घरी सकाळी कामासाठी बाहेर पडणारी माणसं होती म्हणून लवकर आवरायचं. इतर मुंबईत जसं कोणी कोणाच्या घरात डोकावत नाही. तसं आमच्याकडं आजिबात होत नाही. एकमेकांचे दु:ख आमच्याकडे आजही समजून घेतली जातात. गल्लीत काही घडलं तरी सगळे माणसं मदत करतात.

त्या दिवशी सकाळी कोणीतरी सांगितलं की, बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. हे वाक्य मी सतत दारात उभी राहून ऐकत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोण आहेत हे मला 5 व्या वर्षी देखील माहिती होतं. आमच्या घरात बाबासाहेबांची गाणी, फोटो, चर्चा सतत होत असतं. त्यामुळं बाबासाहेब कोणीतरी एक मोठं व्यक्तीमत्व आहे. इतकं त्या वयात मला माहिती होतं. खरं तर ते बाळकडूच होतं.

मात्र, बाबासाहेबांच्या पुतळ्याबाबतचं हे वाक्य ज्यांच्या मनाच्या देव्हाऱ्यात बाबासाहेब आहेत. अशा सर्व आंबेडकर अनुयांयीसाठी मोठा धक्का होता. चीड आणणारं होतं. घरोघरी माझ्या अवती-भोवती गोंधळाचं वातावरण होतं. त्यात घरातला टेलिफोन वाजला. वडिलांनी आईला सांगितलं की तुम्ही चौघं ( आई,दोन भाऊ आणि मी) मोठ्या चुलत्यांच्या घरी निघून जा. वातावरण फार चिघळलंय. आईने ही हातातली सगळी कामं सोडून आम्हा भावंडांना सोबत घेतलं. घराला कुलूप लावलं आणि एकमेकांच्या हाताची साखळी बनून आम्ही गल्ली-गल्लीतून चालू लागलो.

लहान भाऊ आईच्याक़डेवर होता. मोठ्या भावाचा हात धरून मी चालत होती. कसंबसं आई आम्हा तिघांना घेऊन चालत होती… दुर्गा मंदिराच्या १० ते १५ फुटाच्या अंतरावर आम्ही पोहचलो नाही तोवर समोरून खूप माणसं आरडा-ओरडा करत धावत येत होते. ते सगळे घाबरलेले होते. अचानक समोर आल्यामुळे मी प्रचंड घाबरली आणि या गोंधळात माझा हात सुटला, आई आणि दोघां भावाना एका ओळखीच्या काकूने त्यांच्या घरात ओडून घेतलं आणि त्यांचा दरवाजा बंद झाला.

मी एकटीच त्या धावत्या मॉब मध्ये अडकली. मला ही काय घडतंय समजतं नव्हतं? काय करावं कुठे जावं? मी आई आई ओरडत होते. मात्र, त्या गोंगाटात माझा आवाज देखील मला ऐकू येत नव्हता. मी कुठं आहे? मलाही समजत नव्हतं.

मी घाबरलेली पाहून एका काकून मला उचलून तिच्या घरात नेलं. मी जोर-जोरात रडत होती. मला गप्प करण्यासाठी आणि बाहेर आपला आवाज होऊ नये म्हणून त्यांनी मला आपल्या कडेवर घेतलं आणि शांत केलं. बाहेर परिस्थिती इतकी चिघळली होती की, काही कळेना झालं.. वस्तीला आज एक वेगळं स्वरुप आलं होतं..

कोण-कुठे-कसे आहेत याची काहीच कल्पना नव्हती. काही तासानं वातावरण जरा शांत झालं. बाहेरचा आवाज कमी झाला होता. मला या सगळ्या घडामोडींमध्ये आईकडं जायचं होतं. असे किती तरी मुलं घरातील व्यक्ती जागा मिळलं तिथं दडून बसले होते.

काही तासानंतर मी आईकडे सुखरुप पोहोचले. त्यानंतर आमचे घराकडे जाणारे आमचे रस्ते बंद झाले होते. थोडक्यात परतीचे दोर कापले गेले होते. त्यामुळं एक-एक घर गाठत आम्ही मोठ्या काकांच्या घरी पोहचलो. त्यात घरात सगळ्या महिला आणि आम्ही लहानगे ६ जण होतो. घरात पोहोचल्यानंतर पुन्हा बाहेर तोडफोडीचा आणि किंकाळण्याचा आवाज येत होता.

घरातील कोणीच कोणाशी बोलत नव्हतं. मोठ्या काकांनी लहान मुलं आणि घरातील स्त्रियांना किचनमध्ये जाण्यास सांगितलं होतं. परिस्थिती काहीतरी गंभीर आहे. हे तर चांगलंच समजत होतं. आईच्या डोळ्याकडं पाहत मी आईला बोलले.

आई…

आग पाप्पा कुठं आहेत…?

तिनं हलकसं माझ्याकडं पाहिलं आणि मला जवळ घेत. काहीच बोलली नाही. तिलाही तिच चिंता सतावत होती. माझे वडील बाहेर अडकलेले होते. आई च्या नजरा डोळ्याकडं लागलेल्या होत्या.

खरंतर हे सगळं माझ्यासाठी भयावय होतं. आजही ते सर्व आठवलं की अंगावर काटा येतो. सर्व काही जसेच्या तसे कैद आहेत. मला सगळ दिसत होतं पण समजत नव्हतं हे कशामुळे सुरु आहे.

दुसरा दिवस उजाडला परिस्थिती फार काही चांगली नव्हती… वडील घरी आले होते. पण दंगल थांबली असं सगळेजण बोलत होते. मला दंगल म्हणजे नक्की काय असतं? हे काही माहित नव्हतं. त्यामुळे नेहमी प्रमाणे आम्ही बच्चा गँग नालंदा येथील मैदानात खेळायला गेलो. अत्यंत भयभीत करणारी आणि सर्व काही संपलं आहे अशी शांतता आणि चित्र मी माझ्या डोळ्यांनी पाहत होते.

मी आणि माझा बालमित्र सचिन आम्ही मैदानात डोक्याला हात लावून बसलेल्या बायकांकडे एकटक पाहतचं राहिलो. रस्त्यांवर पडलेल्या काचा, चप्पला, दगडं आणि तोडफोड झालेली वाहनं हे पाहून काहीतरी भयंकर घडलं आहे. याची कल्पना येत होती. पण नेमक काय झालं आम्हाला कळत नव्हतं. पण रोडवर मोठमोठ्या पोलिसांच्या व्हॅन आणि पोलिसांचा फौजफाटा पाहायला मिळत होता. हे काळीज धस्स करणार दृश्य म्हणजेच दंगल याची मला खात्री पटली होती. बाहेरची दंगल पाहून माझ्या मनातही दंगल सुरु झाली होती.

मनातील दंगल एकच प्रश्न विचारत होती…

हे सगळीकडे घडलंय का?

की फक्त आपल्या रमाबाईतच…?

त्या भयानक परिस्थितीने, हातावर पोट असणाऱ्या गोरगरिबांच्या वस्तीला उद्धवस्त करुन टाकलं होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची कुणीतरी विटंबना केली होती. इतकच त्या वयात समजत होतं.

जस जसं मोठ होत गेली. तेव्हा समजत गेलं नक्की काय घडलं? ह्रद्यात बाबासाहेब असणाऱ्या समाजाला जेव्हा बाबासाहेबांची विटंबना झाल्याचं समजलं तेव्हा वस्तीतल्या आंबेडकरी अनुयांनी आंदोलन सुरु केलं. एक्सप्रेस हायवे बंद पाडला. शांतीच्या मार्गाने हे आंदोलन सुरु असताना सरकारी यंत्रणेतील पोलिस अधिकारी मनोहर कदम यांनी कोणतीही पुरावे, तपासणी न करता गोळीबारचा आदेश दिला…

११ जुलैची ती उजाडलेली सकाळ रमाबाई नगरला उद्धवस्त करुन काळा इतिहास लिहिणारी होती. अनेक जण कामाला निघालेले होते. त्यात गोळीबार सुरु झाला आणि वस्तीतल्या १० जणांचा जागीच मृत्यू झाला. यात मंगेश शिवसरण हा ११ वर्षांचा मुलगा झोपेतून उठून बाहेर कसला गोंधळ सुरु आहे. बघायला आला असताना त्याच्या मस्तकात पोलिसांची ती गोळी लागली आणि तो जागीच ठार झाला….

पोलिस अधिकारी मनोहर कदम यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे रमाबाई हत्याकांड झालं. आज २३ वर्षे उलटली तरी त्याचे पडसाद पाहायला मिळतात. राजकीय पाठिंबा असलेले मनोहर कदम आजही मोकाटचं फिरत आहे. तसंही या महाराष्ट्रात दलीत समाजावर अत्याचार करणारे अनेक लोक राजरोसपणे फिरतच असतात. तसं शेकडो लोकांचे संसार उद्ध्वस्त करणारे कदम आज मोकाट फिरत आहे.

आज जेव्हा आम्ही हे सर्व मागे वळून पाहतो. तेव्हा पुतळ्याच्या विटंबनामुळे सुरु झालेला या वादाने वेगळचं वळण घेतलं आणि हे हत्याकांड झालं. आज इतकी वर्षे होऊनही आंबेडकर पुतळ्याची विटंबना करणारा विकृत मानसिकतेचा व्यक्ती अद्यापही सापडलेला नाही. रमाबाई हत्याकांड आज देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं आहे… दलितांच्या प्रश्नांची त्यांच्यावर झालेल्या अन्याय, अत्याचाराची चर्चा नेहमीच होत असते परंतु त्यांना कायम न्यायाच्या प्रतिक्षेत रहावं लागतेय.

हा गोळीबार… रमाबाई नगरला जरी उद्धवस्त करणारा असला तरी त्याचे परिणाम आजही समाजाला भोगावे लागत आहे.

जेव्हा हे सगळं घडत होतं. तेव्हा मी अवघ्या पाच वर्षांची होती… ती भयान शांतता माझ्या डोळ्यात, कानात आजही तशीच्यातशी आहे… आठवलं की काळजात धस्सं होतं. दंगल म्हणजे काय असतं हे मी चांगलचं अनुभवलं आहे. आज २३ वर्ष पूर्ण होत आहे. या हत्याकांडाला… यात निष्पाप ठार केलेल्या माझ्या १० शहीदांना मनापासून आंदराजंली व्यक्त करते..

awhad.priyanka11@gmail.com

Updated : 12 July 2020 3:31 AM GMT
Next Story
Share it
Top