Home > Max Woman Talk > "मुछे होतो नथ्थुलाल जैसी"

"मुछे होतो नथ्थुलाल जैसी"

मुलींना किशोरवयामध्ये अंगावरिल केसांमुळं वाईट चिडवाचिडवीला तोंड द्यावं लागतं. अंगावर जास्त लव असण्यात तिचा काहीच दोष नसतो. शरीरातल्या संप्रेरकांचा हा खेळ असतो. पण आपल्याकडच्या या बावळटांना एवढी अक्कल असेल तर ना. त्यांना फक्त मजा करणं एवढंच माहीत असतं.

मुछे होतो नथ्थुलाल जैसी
X

काल नववीतल्या भाच्याच्या चेहऱ्यावर कोवळी लव पाहून त्याची जरा गंमत केली. त्याला माझा चेहरा दाखवत हसत म्हटलं, "हे बघ आत्या आणि भाचा आता मॅचिंग मॅचिंग". माझ्या चेहऱ्याकडे नीरखल्यावर त्याला थोडं टेन्शन आलं नी म्हणाला, "अरे बापरे आत्या! आता काय करायचं"? मी म्हटलं काय करायचं? ठेवूयात तशाच... बिचाऱ्याचा चेहरा गोरामोरा झाला..

आज अप्पर लिप करताना मला माझ्या कॉलेजचे दिवस आठवले. माझ्या चेहऱ्यावर बऱ्यापैकी लव होती. मिशी अगदी स्पष्ट दिसायची. मी ठाणा कॉलेजमध्ये फायनल इयरला असतानाची गोष्ट. आमच्या ग्रुपमधीलच काही जणांचा एक सिनियर मित्र कॉलेजमध्ये वेळ घालवायला यायचा. 3-4 वर्ष केट्या आणि नापास प्रकरण होतं ते. हा मुलगा आला की कॅन्टीनच्या पायऱ्या किंवा नाल्याच्या कट्ट्यावर मुलं जमवून गाणी म्हणत, टिवल्याबावल्या करत बसायचा. मी समोरून गेले की जोरात ओरडायचा, "मुछे होतो नथुलाल जैसी" मग बाकीचे सर्व फिदीफिदी हसायचे. कधी कुठुनही माझ्या समोर आला की, हे वाक्य जोरात ओरडायचा. मी आधी दुर्लक्ष केलं. पण नंतर 15-20 दिवस हे सतत सुरू होतं. त्याला सांगून पाहिलं तरी काय फरक नाही पडला. मला कसंतरी वाटू लागलं. तोपर्यंत मला माझ्या मिश्यांबद्दल कधीच काही वाटलं नव्हतं.

पण ते 15-20 दिवस मला खूप हैराण झालं. मी एनसीसी परेड मध्ये असली तरी हे चिडवणं सुरू असायचं. शेवटी मी पार्लरमध्ये जाऊन अप्पर लिप वॅक्स करून आले. चेहरा जरा वेगळा दिसू लागला. कॉलेजला जाताना मला वाटलं, हां आज काही चिडवाचिडवी नाही होणार. पण त्रास देणारे लोक कसाही देतात. मला पाहून तो मुलगा आणि त्याचे मित्र फिदीफिदी हसू लागले. आता नवीन चिडवणं "मुछमुंडा नथुराम". माझा खूप संताप झाला. मी तडक जाऊन त्याला प्रचंड बडबडले. परत चिडवलंस तर नाल्यात फेकून देईन म्हणाले. माझ्या ओरिजनल अवतारानं त्याची चांगली टरकली. नंतर कधी परत वाटेला आला नाही.

माझ्या मिशीचा पहिल्यांदा उल्लेख मी आठवीत असताना शाळेत माझ्या बाकावर शेजारी बसणाऱ्या मुलीकडून झाला. मला मिशी असल्याची जाणीव तिनंच मला करून दिली. मी खूप खूष झाले. कारण माझ्या बाबांना मस्त भरदार दाढी-मिश्या होत्या. ती त्यांची ओळख होती. रेग्युलर ट्रीमिंग करून ते दाढी मेंटेन ठेवायचे. मला कधीही येता-जाता त्यांच्या दाढीतून हात फिरवायला जाम आवडायचं. त्यामुळं आपल्यालाही मिशी असावी असं वाटायचं. म्हणून ती मुलगी मला मिशी असल्याचं म्हटल्यावर, मी खूषच झाले. त्यानंतर मी बऱ्याचदा आरशात पाहून मिशांवरून बोटं फिरवायची. त्यांना पीळ द्यायचा प्रयत्न करायचे. अकरावीत कॉलेजमध्ये एडमिशन झाल्यावर माझ्याहून चार वर्ष मोठ्या चुलत बहिणीनं पायाचं वॅक्स करण्याचा आग्रह केला. नाहीतर तू कॉलेजमध्ये स्कर्ट नाही घालायचा, असं तिचं म्हणणं. आम्हा राव भगिनींना या 'घर का खेती'चं वरदान आहे. 1996 चं वर्ष ते. आम्ही मराठी शाळेतल्या मुली, म्हाडा कॉलनीत राहणारे. वॅक्सबद्दल ऐकून होते तिच्याकडून. तिलाही बिल्डिंगमधल्या एका ताईकडून कळलेलं. तीही अकरावीपासून करू लागलेली. पण मलाही करावं लागेल असं कधी वाटलं नव्हतं. मग काय अकरावीत पायाच्या वॅक्सिंगला सुरूवात झाली. फस्ट इयरला आल्यावर हाताची खेतीही साफ करू लागले. पण मिशीबद्दल कधी विचार नव्हता केला. तो या चिडवाचिडवीमुळं झाला. पण नंतर मी परत काढली नाही. जर्नालिझमला एडमिशन घेतल्यावर मग नियमितपणे हा सोपस्कार करू लागले. पण ते मी माझ्या मनानं, स्वतःकरता करू लागले.

पुढं एका प्रसिद्ध न्यूज चॅनेलमध्ये अगदी सुरूवातीसच रुजू झाले. ट्रेनिंगच्या काळात आमचं ग्रुमिंगही सुरू होतं. एका प्रोड्युसरवर याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. याला माझ्या भुवयांशी वाकडं. प्रकरण आऊटपूट एडिटरकडे गेलं. दोघांचं म्हणणं, तुझ्या आयब्रोजचं जॉईन्ट काढावं लागेल. माझ्यासाठी माझ्या आयब्रोजचं जॉईंट माझी ओळख होती. मी उडवून लावलं. एकदम कडक शब्दात म्हटलं, "ज्या कामाकरता मी इथं रुजू झालेय ते नीट केलं की झालं ना. मी आयब्रो जॉईन्टची कुर्बानी नाही देणार". आणि मग माझ्या आयब्रो जॉईन्टचा विषय बंद झाला.

अनेक मुलींना किशोरवयामध्ये अंगावरिल केसांमुळं यापेक्षाही वाईट चिडवाचिडवीला तोंड द्यावं लागतं. खरंतरं अंगावर जास्त लव असण्यात तिचा स्वतःचा काहीच दोष नसतो. शरीरातल्या संप्रेरकांचा हा खेळ असतो. पण आपल्याकडच्या या बावळटांना एवढी अक्कल असेल तर ना. त्यांना फक्त मजा करणं एवढंच माहीत असतं. ग्रुमिंग, टापटीप राहणं ह्या सगळ्या गोष्टी मलाही मान्य आहेत. पण दबावामुळं ह्या गोष्टी करणं मान्य नाही.

-साधना तिप्पनाकजे

लेखिका पत्रकार आहेत.

Updated : 4 Dec 2020 6:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top