कौटुंबिक हिंसाचाराचे नवे रूप
मानसिक, आर्थिक, डिजिटल आणि भावनिक नियंत्रणाचा गुंता आधुनिक भारतीय कुटुंबव्यवस्थेतील हिंसेची बदलती व्याख्या
X
भारतीय समाजात “घरातलं भांडण घरातच ठेवण्याची” संस्कृती इतकी मजबूत आहे की अनेक महिलांना हिंसा म्हणजे फक्त मारहाण, आरडाओरड किंवा दिसणाऱ्या जखमा असं वाटतं. पण वास्तविकता खूप वेगळी आणि भयानक आहे. कौटुंबिक हिंसेचं क्षेत्र आता अधिक क्लिष्ट, शांत, डिजिटल आणि मानसशास्त्रीय पातळीवर विस्तारत आहे.
समाजाच्या दृष्टीने न दिसणारी ही हिंसा स्त्रीसाठी मात्र दररोजची यातना बनते.
१. मानसिक हिंसा: शब्दांचे वार
“तू काही करू शकत नाहीस”, “तुझ्या माहेरच्यांना काही कळत नाही”, “तू वेडी झाली आहेस का?”,
अशा वाक्यांनी सतत कमीपणा दाखवणं ही मानसिक हिंसा आहे.
शारीरिक माराचा आवाज बाहेर ऐकू येतो, पण मानसिक हिंसेचा आवाज स्त्रीच्या मनातच अडकून राहतो.
अशा शब्दांनी तिच्या आत्मसन्मानावर वार होतात, निर्णयक्षमता ढासळते, आणि ती हळूहळू स्वतःवरच शंका घेत राहते.
ही हिंसा सर्वात घातक कारण तिची सवय लागते पीडितेचा आत्मविश्वास कमी होत जातो आणि अत्याचार करणाऱ्याला नियंत्रण मिळतं.
२. आर्थिक नियंत्रण: पैशांनी बांधलेला कैदखाना
अनेक पुरुष घरात पैसा देतात पण स्त्रीला स्वतःच्या पैश्यांबद्धलचे निर्णय घेण्यास रोखतात.
क्रेडिट कार्ड नाही, बँक पासबुक नाही, खर्चाचा प्रत्येक वेळी हिशोब मागणे आणि आर्थिक स्वातंत्र्याची पूर्ण गळचेपी हीही हिंसाच.
आर्थिक अवलंबित्व हे हिंसेचं सर्वात प्रभावी शस्त्र आहे.
कारण आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या महिलेला घर सोडणं, तक्रार करणं, किंवा स्वतःच्या सुरक्षिततेबाबत निर्णय घेणं कठीण होतं.
तिला पंख असतात, पण उडण्यासाठी आकाश नसतं.
३. डिजिटल हिंसा: मोबाईलमधून चालणारी चौकशी
नव्या युगात मोबाईलही नियंत्रणाचं साधन बनला आहे. लोकेशन ट्रॅक करणे, कॉल रेकॉर्ड मागणे, सोशल मीडिया पासवर्ड घेणे, चॅट्स तपासणे किंवा सतत ‘व्हिडिओ कॉल ऑन’ ठेवण्याची मागणी. ही हिंसा आधुनिक आहे, पण गुलामी तितकीच जुनी.
स्त्रीच्या खाजगी जीवनाचा नाश हा फक्त सुरक्षेचा मुद्दा नाही; तो स्वतंत्र अस्तित्वावरचा हल्ला आहे. संबंध विश्वासावर चालतात, चौकशीवर नाही आणि चौकशी जेव्हा प्रेमाच्या नावाखाली येते, तेव्हा ती आणखी धोकादायक होते.
४. गॅसलाईटिंग: स्त्रीच्या वास्तवावर प्रश्नचिन्ह
“तुलाच भ्रम होतो”, “हे तुझं काल्पनिक आहे”, “मी असं कधीच बोललो नाही”—
ही वाक्यं ओळखीची वाटतात?
हा प्रकार म्हणजे गॅसलाईटिंग ज्यात अत्याचार करणारा व्यक्ती पीडितेच्या वास्तवावरच प्रश्नचिन्ह उभं करतो.
हळूहळू ती काय खरं, काय खोटं, काय योग्य, काय अयोग्य याबद्दलच गोंधळलेली राहते.
गॅसलाईटिंग मानसिकदृष्ट्या व्यक्तीला पूर्ण मोडून टाकतं. ती स्वतःच्याच अनुभूतीवर विश्वास ठेवणं थांबवते आणि याच क्षणी अत्याचारी व्यक्तीकडे पूर्ण नियंत्रण येत.
५. ‘सांस्कृतिक हिंसा’: शांततेच्या नावावर चालणारा अन्याय
“समन्वय ठेव”, “घरात शांतता ठेव”, “मुलांसाठी सहन कर”
या सल्ल्यांमागे पिढ्यान्पिढ्या चालत आलेली सांस्कृतिक हिंसा दडलेली आहे. स्त्रीला शांतता राखण्याचं ‘कर्तव्य’ देऊन समाज तिच्या दुःखाला सामान्य ठरवत आलेला आहे. हिंसेसमोर शांत राहणं हा आदर्श नव्हे तर अस्तित्व गमावण्याची पहिली पायरी आहे.
कौटुंबिक हिंसा नवी का दिसते आहे?
कारण समाज, तंत्रज्ञान, नात्यांच्या अपेक्षा आणि पिढ्यांची मानसिकता बदलली आहे. शारीरिक मारहाण कमी झाली असली तरी नियंत्रणाची साधनं अधिक आधुनिक झाली आहेत. अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला काही प्रमाणात कायद्याची भीती आहे म्हणून आता हिंसा अदृश्य रूप धारण करताना दिसते.
मारहाणीपेक्षा ही हिंसा अधिक धोकादायक कारण ती सिद्ध करणे कठीण आणि सहन करणे त्याहूनही कठीण.
उपाय काय?
१. पीडितेला “proof” नव्हे, विश्वास द्या.
२. आर्थिक स्वातंत्र्य स्त्रीसाठी हक्क, लक्झरी नाही.
३. डिजिटल पाळत ठेवणे म्हणजे प्रेम नाही नियंत्रण आहे.
४. मानसिक हिंसा ओळखण्यासाठी शिक्षण आणि संवाद आवश्यक.
५. कायद्यांची जागरूकता वाढवणं अत्यावश्यक.
कौटुंबिक हिंसा आता फक्त मारहाण नाही; ती मनावर, अस्तित्वावर, स्वातंत्र्यावर, आणि महिला म्हणून जगण्याच्या संवेदनांवर घाव करते.
हिंसेची नवी रूपं ओळखणं म्हणजे स्त्रीच्या स्वातंत्र्याला नवं संरक्षक कवच देणं.
समाजाने हिंसेला ‘घरगुती’ नव्हे, ‘गंभीर’ मानलं तरच बदलाची पहिली पायरी उजळू शकते.






