संतापजनक : 'आईचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह दाखवा' मुलांनी केली परिचारिकेस मारहाण
X
"आईचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल दाखवा, स्वॅब घेण्यासाठी घरी येणार असल्याने आमची बदनामी झाली' असा आरोप करीत आरोग्याच्या चौकशीसाठी गेलेल्या एका परिचारीकेस दोघा भावांनी चाबकाने मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील येळवी ग्रामपंचायतीसमोर हा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणी मारहाण करणाऱ्या दोघा भावांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीची आई सोनाबाई घोंगडे (वय 50) या नुकत्याच परगावी जाऊन आल्या होत्या. त्यामुळे वरिष्ठांनी आरोग्य सेविका सुरेखा विभुते यांना त्यांचा स्वॅब घेण्यासाठी त्या कुठं राहतात, याची विचारपूस करून ठेवण्यास सांगितले. याबाबतची माहिती घेण्यासाठी त्यांनी गावातील एका व्यक्तीकडून पत्ता विचारून घेतला व त्या शुक्रवारी घोंगडे यांच्या घरी गेल्या. त्यावेळी सोनाबाई घरी नव्हत्या. त्यामुळे आरोग्य सेविका आरोग्य उपकेंद्रात गेल्या. त्या नंतर दुपारी दोनच्या सुमारास दोघे संशयित तेथे आले. त्यांनी आरोग्य सेविका सुरेखा विभुते यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. "आमच्या आईचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल दाखवा, स्वॅब घेण्यासाठी घरी येणार असल्याने आमची बदनामी झाली', असे म्हणून दमदाटी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर शिवीगाळ करून चाबकाने मारहाण केली. यावेळी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि सदस्यही उपस्थित होते.
https://youtu.be/Bm7ync3qDOk