Home > Max Woman Talk > स्तनांचा कॅन्सर आणि 25 वर्षाची ‘ती’

स्तनांचा कॅन्सर आणि 25 वर्षाची ‘ती’

स्तनांचा कॅन्सर आणि 25 वर्षाची ‘ती’
X

तिची फाईल आणि तिचा पेपर सिस्टर माझ्या पुढ्यात ठेवून गेल्या.

रिपोर्ट पाहिल्यावर माझाच घसा कोरडा पडला.

आवंढा गिळला, तशीच काही मिनिटे जाऊ दिली आणि बेल दाबली.

सिस्टर आल्या.

त्यांना म्हंटलं, पेशंटला बसू दे बाहेरच,तिच्या मिस्टरना पाठव फक्त आत..

ते आले,

"बसा,

रिपोर्ट थोडा ठीक नाहीये,तुम्हाला मन घट्ट करावं लागेल.

आपण गाठीतून जे पाणी काढून तपासायला पाठवलं होतं त्याचा रिपोर्ट positive for malignant cells, ductal carcinoma म्हणजे स्तनांमधील नलीकेचा कर्करोग/कॅन्सर असा आलाय.

तिच्या मिस्टरांच्या चेहरा पडला.

मी पुढे बोलत राहिले,

"मी समजू शकते आत्ता या क्षणी तुम्हाला कसं वाटतंय ते...

पण फार हातपाय गाळून बसण्याइतकं सिरीयस नसतं हे .

तिचं ऑपरेशन करून त्या बाजूचा स्तन काढून टाकला तर अगदी खडखडीत बऱ्या होतील त्या.

नका काळजी करू..

उलट आपण सकारात्मक विचार करू की हा कॅन्सर शरीरात इतरत्र पसरण्याआधी आपण त्याचं निदान करू शकलोय आणि लगेचच आपण उपचारही सुरू करतोय.

म्हणजे बघा,तिला गाठ जाणवल्या जाणवल्या ती लगेच माझ्याकडे तपासणीसाठी आली,आपण लगेच सोनोग्राफी आणि एफ एन ए सी केली, आणि वेळेत निदान झालं."

त्या बिचाऱ्याचे चेहऱ्यावरील भाव बघून भयंकर कासावीस व्हायला झालं.

ती फक्त25 वर्षाची,एक वर्षाच्या बाळाची आई,गेल्याच वर्षी माझ्याकडेच प्रसुती झालेली..

खूप पेशंट्सची आपल्याकडे प्रसुती होते,ऑपरेशन्स होतात

पण ती पक्की लक्षात राहिलेली,कारण प्रसूतीदरम्यान ती इतकी सहनशील आणि शांत होती की, मी सिस्टरना तेंव्हा म्हणाले होते की इतक्या वर्षात प्रसूतीच्या कळा इतक्या शांतपणे सहन करणारी पहिलीच पेशन्ट पहिली मी.

अतिशय गुणी,सालस,बहुदा खूपशी धार्मिक अशी ती..

तिला इतक्या लहान वयात का कॅन्सर व्हावा?

आनुवंशिक म्हणावं तर तशी काही स्तनाच्या कॅन्सरची हिस्ट्री तिच्या आई,आजी,मावशी अश्या नातेवाईकांमध्येही नव्हती.

अश्या घटना मन सैरभैर करतात...

पण आपले डॉक्टर्स इतक्या छान पद्धतीने अश्या पेशंट्सना बरे करतात की त्यांच्या पुढे नतमस्तक व्हावंसं वाटतं.

कॅन्सरचे ऑपरेशन करताना एकही पेशी रक्तात मिसळून इतरत्र पसरू नये याची काळजी घ्यावी लागते,अश्या इतरत्र गेलेल्या पेशी फोफाऊ नयेत ,वेळीच मारल्या जाव्यात म्हणून काटेकोरपणे किमोथेरपी, रेडियोथेरपी द्यावी लागते,रुग्णांना मानसिक आधार द्यावा लागतो,त्यांना होणाऱ्या वेदना प्रचंड असतात त्या कमी कराव्या लागतात.

स्तनांचा कॅन्सर पन्नाशी नंतर,जाड असणाऱ्या,मूल नसणाऱ्या, कधीही स्तनपान न केलेल्या स्त्रियांमध्ये जास्त आढळतो,पण अलीकडे 25-30 या वयोगटातही तो आढळू लागला आहे.

स्तनाचा कॅन्सर हा आपल्या देशात ,आणि जगभरातच महिलांच्या मृत्यूचे,त्रासाचे मोठे कारण आहे.

त्यासाठी सर्व महिलांनी पस्तिशीनंतर ,दर महिन्याला स्तनांची स्वतपासणी करायला हवी,कोणतीही गाठ,सूज,लालसरपणा, संत्र्याच्या सालीसारखी त्वचा किंवा निप्पल्समधून स्त्राव आढळल्यास त्वरित डॉ.कडून तपासणी आणि मॅमोग्राफी (सोनोग्राफी किंवा एक्स रे)करून घ्यायला हवी.

स्तनाच्या सर्वच गाठी कॅन्सरच्या नसतात आणि जरी कॅन्सरची गाठ असली तरी तीचे सुरुवातीच्या काळात ,(कॅन्सरच्या पेशी इतर अवयवांमध्ये पसरण्याच्या आधी) निदान झाल्यास फक्त ती गाठ,किंवा तो स्तन काढून टाकला तरी कॅन्सरवर मात करून उर्वरित आयुष्य सुरळीत,सुंदररित्या व्यतीत करता येते.

होईल ती बरी, नक्कीच ....

आणि परत तिचं स्मितहास्य आणि गोंडस बाळ घेऊन येईल परत माझ्याकडे...

  • डॉक्टर साधना पवार

    MBBS, DGO

Updated : 7 July 2020 4:00 AM GMT
Next Story
Share it
Top