Home > Entertainment > शेतकरी आंदोलनाबाबत मराठी कलाकार गप्प का?

शेतकरी आंदोलनाबाबत मराठी कलाकार गप्प का?

शेतकरी आंदोलनाबाबत मराठी कलाकार गप्प का?
X

जनतेच्या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांना थेट जाब विचारणाऱ्या साहित्यिक आणि कलाकारांची मोठी परंपरा महाराष्ट्राला आहे. अनेकांनी वेळावेळी आपल्या रोखठोक भूमिका पक्षांचा विचार न करता मांडल्या आहेत. पण शेतकरी आंदोलनावर महाराष्ट्रातील कलाकार मंडळी गप्प का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दिल्लीच्या सीमारेषेवर पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांनी सरकारविरोधात छेडलेलं जनआंदोलन हे त्यातही महिला शेतकरी आहेत. देशभरातील अनेक कलाकार, खेळाडू, संगीतकार या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवत आहेत. मात्र या सगळ्यात मराठी कलाकार कुठं आहेत? असा प्रश्न विचारला जात आहे.

सध्या दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला गायक दिलजीत दोसांज, अभिनेत्री प्रियांका चोपडा, रितेश देशमुख, सोनम कपूर, हेमंत ढोमे, महेश टिळेकर या कलाकारांनी पाठिंबा दिला. यात खेळाडूही मागे नाहीत. मात्र ही काही ठराविक नावं सोडली तर इतर मराठी कलाकार कुठं आहेत? असा प्रश्न पडतो. या प्रश्नावर आम्ही मराठी कलाकारांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी शेतकरी आंदोलन या मुद्द्यावर ठोस भूमिका घेणं टाळलं.

प्रार्थना बेहरे

"मला नाही वाटत मराठी कलाकार शांत आहेत. उलट मी तर म्हणेन मरठी कलाकार शेतकऱ्यांच्या विषयावर खूप वर्षांपासून बोलतायत आणि सांगतायत. ह्या टॉपिकला पंजाबमध्ये एवढं मोठं केलंय की असं वाटतं महाराष्ट्रात कोण बोलत नाही या विषयावर.. पण तसं नाहीये. हा टॉपिक सर्वांच्या जवळचा आहे आणि जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा तेव्हा मराठी कलाकार या विषयावर बोलतील."



प्राजक्ता माळी

"मला असं वाटतं की एक तर हे सर्व पंजाबमध्ये घडतंय. त्यामुळे रिजनल लोक फार बोलत नसावेत. पण म्हणून मराठी कलाकार न बोलण्यामागे काही आहे असं नाही. मी स्वत: शेतकरी आहे. माझे आजोबा, मामा अजूनही शेती करतात त्यामुळे या आंदोलनावर मी काय बोलणार?"


महेश टिळेकर

"ज्यांना कष्ट आणि गरिबीची जाणीव असते ते यावर व्यक्त होतात. जे स्वत: डायट करतात त्यांना काय अन्नाची आणि शेतकऱ्यांची किंमत कळणार? आपल्याकडे खूप नाटकी लोक आहेत. त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात. मी स्वत: शेतकरी असल्याने मला शेतकऱ्यांबद्दल वाटतं. जिथं पाहिजे तिथं पाठिंबा दिलाच पाहिजे."


हेमंत ढोमे

"बऱ्याच लोकांना खूप काही बोलायचं असतं, व्यक्त व्हायचं असतं, असं नाही की त्यांना काही कळकळ नाही. परंतू आता बोलण्याची सोयच राहिलेली नाही. मी व्यक्त होतो, मी व्यक्त होणार.. दुसरी गोष्ट अशी असते की, कलाकार मंडळी आपली मालिका, आपलं नाटक, आपला चित्रपट हा संपूर्ण महाराष्ट्राने बघावा या मानसिकेतून काम करत असतात. त्यामुळं कुठल्या एका वर्गाला दुखावून चालत नाही. आधीच किती प्रक्षेक येतात मराठी चित्रपट, नाटक पाहायला? जर शंभर असतील तर पन्नास एका विचारधारेचे आहेत आणि पन्नास दुसऱ्या विचारधारेचे आहेत. मग त्या पन्नास जणांना तरी का दुखवावे, हा विचार त्यामागे असावा.

जे प्रेक्षक बोलतायत आता की तुम्ही भूमिका घेत नाही त्या प्रेक्षकांनी या कलाकारांसाठी कधी भूमिका घेतलेय का?"


आमच्या या प्रश्नांवर कलाकारांनी कोणतीही थेट भूमिका घेणं टाळलं असलं तरी कलाकारांनी समाजात वावरताना विविध विषयांवर घेणं भूमिका घेणं महत्वाचं आहे. महाराष्ट्राला अशा समाजजभान असणाऱ्या कलाकारांची परंपरा आहे. कुणाचं या शेतकऱ्यांना समर्थन असेल तर कुणाचा विरोधही असेल. पण भूमिका घेणं महत्वाचं आहे. कारण साहित्य व कला क्षेत्र हे राजकारण असो की समाजकारणापासून वेगळं असू शकत नाही. ते एकमेकांना पूरक आहेत. इकडची किंवा तिकडची, कुठली का असेना कलाकारांनी भूमिका घ्यावी... ते जिवंतपणाचं लक्षण असतं !

Updated : 13 Dec 2020 3:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top