Home > Entertainment > "अनुपम खेर कलाकार म्हणून ग्रेट आहे पण माणूस म्हणून..."

"अनुपम खेर कलाकार म्हणून ग्रेट आहे पण माणूस म्हणून..."

मोराला आपल्या पिसाऱ्यावर गर्व असतो,तो पिसारा फुलवून दाखवला की पाहणाऱ्यांच्या कडून कौतुक होते वाहवा मिळते म्हणून मोर खुश असतो. पण पिसारा फुलवणाऱ्या मोराचा पार्श्वभाग हा मात्र उघडा असतो हे सत्य आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला म्हणून आंतरराष्ट्रीय महिला कलाकारांवर टीका करणाऱ्या बॉलीवुडच्या कलाकारांना दिग्दर्शक महेश टिळेकर यांचे उत्तर..

अनुपम खेर कलाकार म्हणून ग्रेट आहे पण माणूस म्हणून...
X

सिनेसृष्टीतील मुखवट्या मागचे खरे चेहरे आणि खायचे दाखवायचे दात वेगळे असणाऱ्या कलाकारांची संख्या कमी नाही.संधी साधू असणारे आणि लोकांच्या प्रेमामुळे मोठे झालेल्या काही कलाकारांचे खरे रूप वेळोवेळी माझ्या पाहण्यात आले आहे. लोकांचं प्रेम मिळून लोकप्रिय यशस्वी झालेल्या या काही कलाकारांची अवस्था आपल्या राष्ट्रीय पक्षी मोरा सारखी असते. मोराला आपल्या पिसाऱ्यावर गर्व असतो,तो पिसारा फुलवून दाखवला की पाहणाऱ्यांच्या कडून कौतुक होते वाहवा मिळते म्हणून मोर खुश असतो.पण पिसारा फुलवणाऱ्या मोराचा पार्श्वभाग (मागचा भाग) हा मात्र उघडा असतो हे सत्य आहे. काहीशी अशी अवस्था अनुपम खेर या नटाची आहे असं मला वाटतं.अर्थात अभिनेता म्हणून तो ग्रेटच आहे.

हा नट माझ्या मनातून पहिल्यांदा उतरला ते निळूभाऊ फुले यांच्या एका भेटी नंतर. निळू फुले यांनी अनुपम खेर यांची मुख्य भूमिका असलेल्या सारांश या हिंदी सिनेमात काम केले होते.सारांश सिनेमाला 25 वर्ष झाली म्हणून एका कार्यक्रमाचे मुंबईत आयोजन करण्यात आले होते त्यासाठी निमंत्रण द्यायला अनुपम खेर पुण्यात निळू फुले यांना भेटले.त्यावेळी एका मोठ्या आजारामुळे निळू भाऊंची प्रकृती उत्तम नसल्यामुळे आणि शरीर साथ देत नसल्यामुळे ते घराबाहेर पडत नसत की कोणाला फारसे भेटत ही नव्हते.अनुपम खेर यांनी निळू भाऊंना भेटून काढलेले फोटो आणि बातम्या जेव्हां मुंबईच्या काही पेपर मध्ये आल्या त्या वाचून अनुपम खेर ने तापलेल्या तव्यावर किती भाकऱ्या भाजल्या ते समजले.फिल्म इंडस्ट्रीपासून अज्ञातवासात गेलेल्या ज्येष्ठ कलाकार निळू फुले यांना अनुपम खेर ने शोधून काढले अश्या आशयाच्या बातम्या आणि त्यात अनुपम खेर यांनी किती कसे कष्ट घेतले निळुभाऊंना शोधायला त्याचे रसभरून वर्णन होते.

अण्णा हजारे यांच्या दिल्लीत झालेल्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला अनुपम खेर स्टेजवर जाऊन भाषण ठोकताना पाहून हा किती मोठा कल्लाकार आहे ते समजलं.तिथे जमलेला अफाट जनसमुदाय,प्रेस मीडिया यांच्या समोर स्वतः ची लाल करून अण्णा हजारे बद्दल कळवळा दाखवणारा हा संवेदनशील कलाकार, दिल्लीत शेतकऱ्यांना पाठिंबा द्यायला किंवा साधं भेटायला जाण्याचं धाडस का दाखवत नाही? का तो आता एका पक्षाचा कुणीतरी आहे म्हणून सोयीप्रमाणे भूमिका बदलली याने?अण्णा हजारे यांना दिल्लीत जाऊन पाठिंबा देताना देशभरात अण्णांची हवा होती पण हीच हवा कालांतराने निघून गेल्यावर अनुपम खेर नंतर कधी अण्णांच्या वाऱ्याला ही उभा राहिला नाही की त्यांची भेट घ्यायला राळेगणसिद्धी गावी गेल्याचे ऐकिवात नाही.

आता मात्र शेतकरी आंदोलनाच्या धगधगत्या आगीवर इतर देशातील कलाकारांनी ट्विट केलं म्हणून त्यांना अक्कल शिकवणारा हा नट आपल्या देशातील महत्वाची व्यक्ती जेंव्हा इतर देशातील एखाद्या घटनेबद्दल ट्विट करून मत व्यक्त करते तेंव्हा अनुपम खेर ते वाचून का नाही टिव टिव करत?

अनुपम खेर कलाकार म्हणून ग्रेट आहे पण माणूस म्हणून किती.. आहे ते आता चांगलंच समजलं टीप:शेतकरी आंदोलनात झालेल्या हिंसेचे समर्थन नाहीच

- महेश टिळेकर

Updated : 4 Feb 2021 12:15 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top