Home > Entertainment > महामानवांच्या विचारांची शक्ती दाखवणारा चित्रपट म्हणजे 'जयंती'!

महामानवांच्या विचारांची शक्ती दाखवणारा चित्रपट म्हणजे 'जयंती'!

महामानवांच्या विचारांची शक्ती दाखवणारा चित्रपट म्हणजे जयंती!
X

जयंती! चित्रपटाचं नाव ऐकलं किंवा वाचलंत तर आपल्याला वाटेल की एक तर शिवाजी महाराजांच्या किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीवर हा सिनेमा आधारीत असेल. आपण जर असा विचार करत असाल तर आपण चुकताय असं काही मी म्हणणार नाही पण बरोबर विचार करताय असंही म्हणणार नाही. चित्रपटात या दोन्ही महामानवांच्या जयंती चा उल्लेख आहे पण याही पलीकडे विचार करायला लावणारी या सिनेमाची कथा आहे. लॉक डाऊन नंतर प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट असल्याने अनेकांच्या या चित्रपटाडून अपेक्षा असणं रास्त आहे. जर आपल्याला थरार, विनोद, रहस्य असे सिनेमे आवडत असतील तर हा सिनेमा आपल्यासाठी नाही.

जयंती चित्रपटाची कथा ही त्या मानाने साधी सरळ आणि काही वेळाने प्रेडिक्टेबल होऊन जाते. कोणतंही ध्येय नसलेले, फक्त टाईमपास करणारे, वस्त्यांमध्ये उपद्व्याप करणाऱ्या मुलांचं प्रतिनिधीत्व करणारं संतोष उर्फ संत्या हे पात्र आहे. इतरांसारखाच हा देखील पल्लवी या पात्राच्या एकतर्फी प्रेमात पडतो. टोकाच्या जातीयवादाची पार्श्वभुमी असलेल्या कुटूंबात संत्या राहत असतो. परंतू संत्या वेळेनुसार स्वतःसाठी जातीय गणितं बदलत असतो. त्यामुळे वस्तीतील आदिवासी समाजातील रेखाला तो बहीण मानत असतो. या रेखासोबत एक घटना घडते. ज्यामुळे संत्याचं पुढचं संपूर्ण आयुष्यच बदलून जातं. इतकं की तो शहरातला एक प्रतिष्ठीत व्यक्ती म्हणून त्याला प्रसिध्दी मिळते. त्याच्यात हा इतका टोकाचा बदल कसा घडतो? तो बदल कोण घडवतं? हीच या चित्रपटाची कथा आहे.

चित्रपटातील कथा उत्तम असली तरी त्यातील भुमिका रूपेरी पडद्यावर साकारणारे कलाकार देखील तितकेच महत्वाचे असतात. या चित्रपटातील संत्याची मध्यवर्ती भुमिका साकारणारा अभिनेता ऋतूराज वानखेडे अक्षरशः ती भुमिका जगला आहे. नागपूरची वऱ्हाडी भाषा ऋतूराज अगदी सफाईने बोलला आहे. पल्लवीची साकारणाऱ्या तितिक्षा तावडेनेही आपली भुमिका चोख बजावली आहे. सहाय्यक भुमिकांमध्ये दिसणारे मिलिंद शिंदे, किशोर कदम, अंजली जोगळेकर, पॅडी कांबळे या कलाकारांनी देखील आपापल्या भुमिकांना न्याय दिलेला आहे. कोर्ट चित्रपटाच्या माध्यमातून आपल्यासमोर आलेले दिवंगत अभिनेते वीरा साथीदार देखील एका महत्वाच्या भुमिकेत आपल्याला पाहायला मिळतात.

चित्रपटातील तुला काय सांगू, तुला वंदन्या, भीमसैनिका ही गाणी उत्तम झाली आहेत. संगीतकार रूही यांनी ही तिन्ही गाणी उत्तमरीत्या संगीतबद्ध केली आहेत. जावेद अली, विक्रांत भारतीय, सेजुती दास यांनी तितकीच उत्तम गायली देखील आहेत. लव्हशीप देशील का? हे आणखी एक गाणं या चित्रपटात आहे. परंतू ते चित्रपटात नसतं तरीही काही फारसा फरक पडला नसता असं वाटत राहतं.

चित्रपटाचं दिग्दर्शन शैलेश नरवाडे यांनी केलं असून चित्रपटाची कथा रूपेरी पडद्यावर मांडण्यात यशस्वी ठरले आहेत. संत्याच्या भुमिकेच्या अवती भोवती चित्रपटाचं कथानक घडत असून सुध्दा त्यात इतर कलाकारांच्या भुमिकांना योग्य ती स्पेस त्यांनी दिली आहे.

२ तास २४ मिनीटांचा चित्रपट आहे. तो दोन तासांवर जरी केला असता तरी चालंलं असतं. मध्यांतरा आधीचा चित्रपट लहान असला तरी तो जरा संथ गतीने पुढे सरकतो. मात्र मध्यांतरानंतर चित्रपटाचा कालावधी मोठा असून सुध्दा त्याला वेग असल्यामुळे तो प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. एकंदरीत एक उत्तम कथा, प्रेरणादायी विचार सत्त्यात उतरताना पाहायचे असतील तर हा चित्रपट आपण नक्कीच पाहू शकता.

Updated : 11 Nov 2021 7:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top