Top
Home > Entertainment > कंगना हाजीर हो.. न्यायालयाची कंगनाला नोटीस

कंगना हाजीर हो.. न्यायालयाची कंगनाला नोटीस

पण, वारंवार पोलीसांचे समन्स धुडकावणारी कंगना हजर रहाणार का?

कंगना हाजीर हो.. न्यायालयाची कंगनाला नोटीस
X

वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेली बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत ही पुन्हा एकदा वादात सापडली असून गीतकार जावेद अख्तर यांनी केलेल्या फौजदारी मानहानी दाव्याप्रकरणी दंडाधिकारी न्यायालयाने बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला नोटीस बजावली आहे.

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना घेतलेल्या एका मुलाखतीत जावेद अख्तर यांची बदनामी केल्याचे दाव्यात म्हटले आहे.

दंडाधिकारी आर. आर. खान यांनी या प्रकरणी जुहू पोलिसांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. पोलिसांनी त्यानुसार सोमवारी न्यायालयात अहवाल सादर केला. कंगनावर केलेल्या आरोपांत तथ्य असल्याने आणखी तपास करावा लागेल, असे पोलिसांनी अहवालात म्हटल्याचे जावेद यांचे वकील कुमार भारद्वाज यांनी न्यायालयाला सांगितले.अख्तर यांनी केलेल्या दाव्यानुसार, कंगनाने अर्णव यांना दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर हे बॉलिवूडमधील 'सुसाईड गॅंग'मध्ये सहभागी होते. काहीही केले तरी ते मोकळे सुटू शकतात, असे म्हटले आहे. तिच्या या आरोपांमुळे जावेद यांची प्रतिमा मलिन झाली असा आरोप त्यांनी केला आहे. यू-ट्यूबवर ही क्लिप खूप पसरली, असा युक्तिवाद भारद्वाज यांनी केला.

कंगनाची चौकशी करण्यासाठी पोलीस तिला वारंवार समन्स बजावत आहेत. परंतु, ती त्याला उत्तर देत नाही, अशी माहिती भारद्वाज यांनी दंडाधिकाऱ्यांना दिली. त्यांचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने कंगनाला नोटीस बजावली. १ मार्चपर्यंत न्यायालयात उपस्थित राहण्याचे निर्देश न्यायालयाने कंगनाला दिले.

Updated : 2 Feb 2021 6:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top