"ब्रिटिश एअरवेज च्या विमानाच्या खिडकीशी बसून माझी मुलगी पेंगत होती........"
सौ. मंजुषा महेश गारखेडकर
X
ऐकलं होतं "झेप घेणाऱ्या पंखांना
ज्ञानचं बळ देणारी पुस्तके
जीवनात आनंदाचे
सप्तरंग ही उधळतात."
खरचच पुस्तकं आपले विचार अन् पर्यायाने आपले अंतरंग, आपले जीवन बदलून टाकतात.
असच एक पुस्तक वाचायला घेतलं. "ब्रिटिश एअरवेज च्या विमानाच्या खिडकीशी बसून माझी मुलगी पेंगत होती........"
सुरुवात वाचूनच पुस्तक वाचण्यात खूप रस निर्माण झाला. पुस्तक होतं बेट्टी मेहेमुदी यांचं 'नॉट विदाऊट माय डॉटर'
कथेचा गाभा : आपल्या कुटुंबीयांशी भेट घडवून आणण्याच्या निमित्ताने बेट्टी मेहमूदीचा नवरा डॉक्टर सय्यद मेहमूदी उर्फ मूडी तिला त्यांची चार वर्षाची मुलगी महातोब सह इराण मध्ये घेऊन आला. बेट्टी मेहमूदी अमेरीकेत वास्तव्य करणारी या आधी लग्न झालेली आणि दोन मुले आणि एक मुलगी असणारी डिव्होर्स झालेली अमेरिकन स्त्री असते. नंतर मूडी या इराणी अमेरिकेत प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरशी ती लग्न करते. त्यांचा संसार सुखाचा चाललेला असताना मूडीचा भाचा त्यांच्याकडे येऊन एकदा इरणला येण्याचा आग्रह करतो. मुडीही इराणला भेट द्यायला तयार होते पण जातांना त्याच्या मनात नक्की काय चालू आहे याची शंका बेट्टिला येत नाही.
बेट्टी आणि तिची लेक तिथे सुखात आणि सुरक्षित असतील आणि हवे तेव्हा अमेरिकेला परतू शकतील असं त्यांना आश्वासन दिलं होतं. त्यामुळे बेट्टी मेहमुदी इराणला जायला तयार झाल्या होत्या. जातांनाच विमानात आपण खूप मोठी चूक करतोय असं त्यांना वाटलं. पण स्वतःच्या मनाची कशीबशी समजूत घालून त्या मुलीसह तिथे जातात. दोन आठवड्यांसाठीच आपण तिथे जातो आहोत असं त्यांना सांगितलेलं असतं. तिथे गेल्यावर विमानतळापासूनच तिथली अस्वच्छता, गचाळपणा, बेजबाबदार पणा, रहदारीच्या नियमांचे उल्लंघन , एकमेकांना शिव्या देणे शिवाय घरातला अजागळपणा, बायकांना नसलेली किंमत आणि घाणेरडं राहणीमान याची त्यांना किळस येऊ लागते.
पण हे सगळं सहन करण्याशिवाय तिला काहीच पर्याय नसतो. काही दिवसातच "आता तू जन्मभर इथेच राहायचं. समजलं?? इराण सोडून कधी जायचं नाही. मरेपर्यंत इथेच राहायचं" हे ऐकायला मिळतं आणि ती हादरूनच जाते. ती पासपोर्ट शोधण्याचा प्रयत्न करते पण तिच्या हाती तो लागू नये अशीच व्यवस्था केलेली असते. मूडी डॉक्टर असून त्याची डॉक्टरी इथे चालत नसते. त्यामुळे पैशाची चणचण, मूडीची चिडचिड, भांडणं, बेट्टीला मारणं, घरात बंदिस्त करून ठेवणं सुरू होतं.
कसा बसा मूडीचा विश्वास संपादन करून ती बाहेर पडते आणि अमेरिकन एम्बसीला भेटते. पासपोर्ट मूडीने स्वतः कडे ठेवल्या मुळे काहीच मार्ग निघत नाही. मग तिला एका बेकायदेशीर हद्द पार करून देणाऱ्या एजन्सी बद्दल माहिती मिळते. पण ते तिच्या मुलीला नेण्यास तयार नसतात. पण ती मुलगी महातोबला या नरकात सोडून जायला तयार नसते. काही करून तिला न्यायची ती सोय करते. त्या एजंटला देण्यासाठी ती पै पै जमा करते.
अक्षरशः जीवावर उदार होऊन, वेषांतर करून, कडाक्याच्या थंडीचा, प्रवासाचा, वाळवंटातून चालण्याचा अत्यंत त्रास होत असतांना, सुके पाव खाऊन सतत कित्येक दिवस प्रवास करत बेकायदेशीर रित्या ती तुर्कस्तानला पोचते. मुख्य म्हणजे तिला त्यांची भाषा येत नसताना आपल्याबद्दल ते काय बोलतात हे ही माहिती नसताना ती जीव मुठीत धरून त्यांच्याबरोबर प्रवास करते. तिचा तो एकटीच थरारक प्रवास.... अंगावर अक्षरशः काटा येतो. एकटी बाई एका लहान मुलीसह जिला इथली काहीच माहिती नाही, तिथली भाषा समजत नाही, कोणाची ओळख नाही, तिला फसवणं सहज शक्य असतं. पुढे काय होणार...ते पकडले तर जाणार नाही याची धाकधूक वाचकांच्या मनात असतेच. पण देवाच्या दयेने आणि तिच्या हिंमतीने ती शेवटी अंकरा येथे पोचते. तिथे अमेरिकन एम्बासी तिला अमेरिकेत पोचवण्याची व्यवस्था करते.
ती तिच्या आईवडील आणि दोन मुलांना बघून ती ढसा ढसा रडते. आपण आईवडील आणि दोन मुलांना कधी पाहू की नाही असं तिला वाटत असतं. ते शक्य झालं होतं ते केवळ तिने दाखवलेल्या हिंमतीमुळे आणि तिने काहीही झालं, कितीही संकटं आली तरी तिच्या लेकीला तिच्यापासून वेगळं न करता तिचीही सुटका केली होती.
पुस्तक आवडण्याची कारणे:
*ही सत्य कथा असून लेखिकेने तिच्यावर आलेल्या प्रसंगाचे इतके छान वर्णन केले आहे की आपणच त्या परिस्थितीतून जात आहोत असे वाटते.
*वाचतांना क्षणभर तिच्या नालायक, फसव्या, क्रूर नवऱ्याला आणि त्याला साथ देणाऱ्या नातेवाईकांना आपणच शिक्षा द्यावी असे वाटून जाते. मनातून मूडीची खूप चीड येते. त्याने जणूकाही आपल्यालाच फसवल आहे असं वाटतं. कुठलाच मार्ग सापडत नाही आता काय असं एक क्षण वाटून जातं. पण बेट्टी त्यातूनही मार्ग काढते.
*बेट्टीच्या हिंमतीची, धडाडी, धडपड याचं कौतुक वाटतं. तिच्या चिकाटीची आणि धीराची दाद द्यावी तितकी कमीच आहे. तिच्यावर कधी स्वप्नातही विचार येणार नाही असा प्रसंग आला आणि तिने स्वतःच्या हिंमतीवर निभावून नेलं. प्रसंग आला की धीर एकवटावाच लागतो हे ही खरंच.
*तिचं साहस, प्रसंगावधान, तिची चिकाटी आणि काहीही झालं तरी आपल्या लेकीला बरोबर घेऊन जाण्याची जिद्द यांवर आधारित सुंदर पुस्तक वाचनात आलं. वाचतांना पुस्तक खाली ठेऊच नये असं वाटत होतं. लेखिका तिच्या लेखनाने आपल्याला अगदी शेवट पर्यंत खिळवून ठेवते.
*पुस्तक वाचतांना क्षणा क्षणाला उत्कंठा वाढत जाते. घडलेल्या प्रसंगाचं इत्यंभूत वर्णन लेखिकेने केलं आहे त्यामुळे अगदी 'आँखो देखा हाल' म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.
पुस्तकातून काय शिकावे :
*यातून कोणत्याही प्रसंगात घाबरून न जाता मार्ग काढल्यास नक्कीच यश मिळतं.
*प्रयत्न करणाऱ्यालाच देव साथ देतो म्हणजेच प्रयत्नांती परमेश्वर.
* प्रत्येक येणारा प्रसंग आपल्याला काहीतरी शिकवत असतो आणि आलेल्या अनुभवान आपण समृद्ध होत असतो.
वाचनात रस असला की ज्ञानाचे भंडार आपोआप भरते. प्रत्येकच पुस्तक आपल्याला काहीतरी शिकवून जाते हेच खरे.
सौ. मंजुषा महेश गारखेडकर






