Home > Max Woman Blog > मराठवाड्यातील शेख वसिमा, मुस्लिम युवतींची ऑयकॉन

मराठवाड्यातील शेख वसिमा, मुस्लिम युवतींची ऑयकॉन

मराठवाड्यातील शेख वसिमा, मुस्लिम युवतींची ऑयकॉन
X

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षांचा निकाल गेल्या आठवड्यात जाहीर झाला. त्यात ४२० परिक्षार्थी यशस्वी झाले आहेत. तथापि यावेळचा निकाल खूप वेगळा आहे. उच्च शिक्षण आणि स्पर्धात्मक परीक्षा ही ठराविक वर्गाची मक्तेदारी आहे हा समज या निकालाने मोडीत काढला आहे. यावेळी मुस्लिम समाजातील तीन मुली आणि एक मुलगा स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाला आहे. या परीक्षेत सय्यद आसमा सय्यद झहिर अहमद ही गट अमधील असिस्टंट कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स, शेख महंमद फयाज महंमद मुनीर हे सेक्शन ऑफिसर, समीनाबानू अब्दुल रज्जाक बागवान यांची ब गटात डेप्युटी सुपरिटेंड ऑफ एक्साईज आणि शेख वसीमा महेबुब या महिला खुल्या प्रवर्गातून सब डिव्हीजनल मॅजेस्ट्रिट ही परिक्षा उत्तीर्ण झाली आहे.

अत्यंत गरीबी, कुठलेही आर्थिक पाठबळ नाही. मुलींच्या उच्च शिक्षणासाठी कर्मठ मुल्ला मौलवींचा विरोध असतो. चूल आणि मूल हीच मुलीची जबाबदारी असते. तिने अनावश्यक म्हणजे शिक्षणासाठीसुद्धा घरचा उंबरठा ओलांडता कामा नये. धर्माचा पगडा आणि वर्तमान काळापेक्षा मृत्यूनंतर जन्नत म्हणजे स्वर्ग मिळविण्यासाठी साऱ्या जीवनाचा आटापिटा. नुसती धार्मिक रुढीपरंपरा पाळण्यास महत्व पण मुलीला आर्थिकदृष्ट्या तिच्या पायावर उभे करण्यासाठी उच्च व व्यावसायिक शिक्षणाची संधी नाकारली जाते. असे वास्तव असलेल्या मराठवाड्यातील वसीमा शेख या मुलीचे यश समाजाला नवी दिशा देणारे आहे. संधी मिळाली की त्याचे सोने करता येते. पण जिथे दोनवेळेला हाता तोंडाची गाठ पडेल की नाही याची शाश्वती नाही. अशा बालपणी चंद्रमौळी झोपडीत राहणाऱ्या वसिमाच्या यशाचे कौतुक करावे तितके कमी आहे.

मुघल साम्राज्य, निझामशाही, अदिलशाही, हैदराबादचे रजाकार अशा शाह्यांची सत्ता देशात काही काळ होती. अर्थात यास केवळ धर्माचे लेबल लावून चालणार नाही तर ती सत्ताकारण व त्यातील सत्तेसाठी लाचारांची फौज होती. काळ बदलला तशी मुस्लिम राजवटीची सत्ता लयास गेली. सत्तेत राहणारा हा मूठभर वर्ग होता. त्या सत्तेत सर्व धर्माची मंडळी सहभागी होती. पण गेल्या दोन शतकात मात्र सामान्य मुस्लिमांची अवस्था बिकट असून, तो गरीबी आणि दारिद्र्याच्या समृद्ध अडगळीत फेकला गेला आहे. धर्म प्रसाराच्या नावाखाली तबलिग सारख्या संघटनांनी या समाजाच्या तोंडावर झापडे लावण्याचाच उद्योग केला आहे.

माजी न्या. राजेंद्र सच्चर आयोगाने भारतीय मुस्लिम समाजातील गेल्या ७३ वर्षांचे भयानक समाज वास्तव जगासमोर मांडले आहे. सर्वाधिक सत्ता भोगणाऱ्या काँग्रेसने मुस्लिमांचे लाड केले अशी हाकाटी आणि कंठशोष संघाच्या मुशीत घडलेली मंडळी उठता बसता करीत असतात. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आणि भारतमातेचे संरक्षण करणे आणि भारतीय मायभूमीची अस्मिता, स्वाभिमान टिकविण्यासाठी भारतीय मुस्लिमांचे योगदानही मोठे आहे. दुर्दैवाने भारतीय मुस्लिम समाजाला काळाचे व्यापक भान असलेले, दूरदृष्टीचे प्रगल्भ नेतृत्व लाभले नाही.

सतत संशयाच्या फेऱ्यात सापडलेला हा समाज आणि त्याचे शत्रू राष्ट्राशी जोडलेले चुकीचे नाते यामुळे सामान्य भारतीय मुस्लिम बचावात्मक पवित्रा राहत असतो. तथापि, समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी मुस्लिमांनी केली आहे. मिसाईलमॅन अशी ओळख असलेले डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनीही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जगविख्यात शास्त्रज्ञ ते राष्ट्रपती पदापर्यंत मजल मारली. अर्थात यापूर्वी ख्यातनाम शिक्षण तज्ञ डॉ. झाकीर हुसेन आणि फकरुद्दिन अली अहमद यांनी देशाचे राष्ट्रपती पद भूषविलेले आहे.

भारतीय मुस्लिमांची सध्याची अवस्था आदिवासी दलितांपेक्षाही वाईट आहे. सत्ताधारी वर्गाचा या समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोण सर्वज्ञात आहे. गरीबी आणि द्रारिद्र संपुष्टात आणायचे असेल तर त्यासाठी शिक्षणाची गुरुकिल्ली हाच उपाय आहे. देशात महिलांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांनी रोवली. स्त्री शिक्षणासाठी आग्रह धरल्याबद्दल सावित्रीबाईंची त्याकाळी तथाकथित अभिजन वर्गाने दगड शेणाचा मारा करुन हेटाळणी केली. तोच अभिजन समाज शिक्षणात पुढे गेला आहे. सावित्रीबाई यांच्यासोबत १८५० च्या सुमारास फातिमा शेख ही पहिली भारतीय मुस्लिम शिक्षिका बनल्या. शिक्षण पण तेसुद्धा आधुनिक काळाशी सुसंगत व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यातूनच समाज बदलता येईल. मुलगी शिकली की पुढची पिढी शिक्षित होते या न्यायाने नांदेड जिल्ह्यातील वसिमा शेख यांचे यश लाखमोलाचे आहे.

शिक्षण हा असा एकमेव मार्ग आहे की ज्यातून एक व्यक्तिमत्व घडते. आयुष्य बदलण्याची ताकद आहे शिक्षणात आहे. यासाठी आमच्या समाजातील मुलींनी शिकायला हवे. यासाठी लोकांनीही मानसिकता बदलायला हवी. आमच्या समाजात पालकांचा कल धार्मिक हा शिक्षणाकडे असतो. पण माझ्या पालकांनी मला मराठी माध्यमाच्या शाळेतून शिकवले. हा त्यांचा निर्णय खूप महत्त्वाचा होता. बहुतांशी पालकांचा हा निर्णय कुठेतरी चुकतो असे वसीमा शेख यांची प्रतिक्रिया खूप बोलकी आणि काळाच्या बरोबरीने जाणारी आहे.

मराठवाड्यातील मुस्लिमांची अवस्था तशी बरी नाही. नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यातील जोशी सांगवी या तीन हजार उंबऱ्याच्या गावात वसीमा शेख व त्यांचे कुटुंब राहते. वसिमा शेखच्या घरात सहा भावंडे आहेत. त्यात चार बहिणी, दोन भाऊ आणि आई वडिल आहेत. वडिलांचे मानसिक आरोग्य पहिल्यापासूनच बरे नाही. त्यांच्याकडून कोणतेही काम होत नाही. साहजिकच घर चालविण्याची जबाबदारी आईवर आली. वसिमाची आई शेतीत मोलमजुरी करणे, लोकांच्या घरी जाऊन भांडीकुंडी धुणे असे करीत घर सांभाळायच्या. मोठा भाऊ ऑटो रिक्षा चालवून आईला मदत करायचा. काही वर्षांपूर्वीची वसिमाच्या घरात दिवाबत्तीसाठी वीज कनेक्शनसुद्धा नव्हते. पिण्याच्या पाण्याचीही वानवा होती.

अशा प्रतिकूल परिस्थितीत वसिमाने दहावीपर्यंतचे शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत घेतले. दहावीनंतर १२ किमी अंतरावर कॉलेज होते. त्यासाठी दररोज सहा किमी पायपीट करुन वसिमा जायची. अकरावीला तिने वर्षभर चालत जाऊन कॉलेज केले. बारावीला मी एकटीच कॉलेजला जायचे, बाकी मुलींना पालक पाठवायला तयार नव्हते. त्यामुळे मग मी माझ्या आजोळी कंधारच्याजवळ बासोटी गाव आहे तिथे राहिले. बासोटीहून गावाहून कंधार १० किमी आहे. तेथून एसटीने शिक्षणासाठी प्रवास केला. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून राज्यशास्त्र आणि इंग्रजीत वसिमाने २०१५ ला बीए पदवी संपादन केली. त्यानंतर स्पर्धा परिक्षांच्या तयारीची सुरु झाली.

२०१५-१६ साली स्पर्धा परिक्षेचा अभ्यास वसिमाने सुरू केला. गावाकडे पुस्तके, वर्तमानपत्र आणि लायब्ररीची सुविधा नव्हती. आमच्या समाजात मुलीवर खूप बंधने असतात. नांदेडला होते तर तिथेपण लायब्ररीला जात येत नव्हते. समाजातल्या खूप साऱ्या लोकांचा विरोध होत होता. कारण एक तर मी मुलगी होते हा पहिला मुद्दा, आमच्या समाजात मुलींच्या शिक्षणाला विरोध आहे. मुलींना शिकवण्याची मानसिकताच नाही लोकांची असे भयानक समाजवास्तव ती मांडते. दुसरे म्हणजे परंपरेने लादलेली अनेक बंधने आहे. त्यात पडदा पद्धती आहे. अशा स्थितीत लायब्ररीला जाणे, तिथे १५- १५ तास अभ्यास करणे लोकांना पटणारे नव्हते. त्यामुळे मला नांदेडला अभ्यास करता येत नव्हता. आपल्या बहिणीची अडचण बघून वसिमाचा भाऊ इम्रानने त्याचे शिक्षण सोडले आणि ऑटो रिक्षा चालवायला घेतली. कारण भावाला वसिमाचे शिक्षण थांबवायचे नव्हते.

स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी इम्रानने वसिमला पुण्यात पाठविण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्याच प्रयत्नात २०१६ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा वसिमा उत्तीर्ण झाली. २०१८ साली ती विक्रीकर निरीक्षक म्हणून नागपूरला नोकरीस लागली. याच नोकरीत आणखी परीक्षा देऊन उपजिल्हाधिकारी पदासाठी निवड झाल्याचे वसिमा सार्थ अभिमानाने सांगते.

अभ्यासात सातत्य हवे. मी दोनच वर्ष व्यवस्थित अभ्यास केला. दररोज १५ ते १६ तास अभ्यास केला. अभ्यासात सातत्य, संयम आणि हार्ड वर्क या तीन गोष्टी असल्या की स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणे अवघड नाही. परिस्थितीनेच मला संघर्ष करायला शिकविले. यात आई आणि भावाची मोलाची साथ होती.

समाजातील बदल आणि विकासासाठी धोरणकर्ती शासकीय जमातीत जायला हवे. एक प्रशासकीय अधिकारी त्याचा एखादा महत्त्वाचा निर्णय लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणू शकतो. आमच्या समाजात तर घरातून बाहेर पडायची परवानगी नाही, अशा परिस्थितीत शिक्षण घ्यायला किती अडचणी येऊ शकतात, याची तुम्ही कल्पना करू शकता. मला सुरुवातीला खूप लोकांनी विरोध केला, माझ्या शिक्षणामुळे आई-वडिलांना, भावांना समाजाचे बोलणे खावे लागले. आज तो समाज भावी उपजिल्हाधिकारी वसिमा यांचे स्वागत करण्यासाठी फुलांचा हार घेऊन तयार आहे. लोकांना आपण जेव्हा चमत्कार दाखवतो, तेव्हाच नमस्कार केला जातो असेही वसिमा विनम्रपणे सांगते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुसऱ्यांदा परीक्षा पास झाल्यानंतर एक दोन महिन्यांत वसिमा शेख यांचे प्रशिक्षण पूर्ण होईल. त्या उपजिल्हाधिकारी पदाचा कार्यभार हाती घेतील. मुस्लिम समाजाला आणि मुस्लिम मुलींचे आयकॉन बनलेल्या वसिमाला भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा…

ताजा कलम या पोस्टसाठी ज्येष्ठ पत्रकार ज्योती पुनवानी, पत्रकार श्रीकांत बंगाळे तसेच मराठवाड्यातील स्थानिक वर्तमानपत्र आणि न्यूज चॅनेलमधील माहिती साभार घेतली आहे. या सहकाऱ्यांच्या माहितीमुळे ही पोस्ट लिहता आली हे नम्रपणे नमूद करावेसे वाटते.

समीर मणियार

Updated : 27 Jun 2020 7:12 AM GMT
Next Story
Share it
Top