Home > बालक-पालक > मुलांचा मोकळा वेळ

मुलांचा मोकळा वेळ

क्लासेसपेक्षा पालकांचा संवाद अधिक महत्त्वाचा

मुलांचा मोकळा वेळ
X

आजकालच्या पालकांसाठी मुलांचा वेळ “उपयुक्त” बनवणे ही एक सततची चिंता बनली आहे. बहुतेक पालक विचार करतात, “माझं मूल फक्त मोबाईलवर किंवा टीव्हीसमोर वेळ घालवणार असेल तर त्याला काहीतरी शिकण्यासारखे द्यायला हवे.” म्हणून अनेक पालक मुलांना शाळेबाहेरच्या कला, संगीत, नृत्य, क्रीडा किंवा अभ्यासाच्या अतिरिक्त शिकवण्यांमध्ये सामील करतात. या सर्व उपक्रमांचा मुलांना नक्कीच फायदा होतो नवीन कौशल्ये, शिस्त, आत्मविश्वास आणि सामाजिकता वाढते.

पण या सर्वांमध्ये दुर्लक्षित राहतो तो एक महत्त्वाचा भाग म्हणजे पालक आणि मुलांमधला संवाद. मुलांचा मोकळा वेळ फक्त क्लासेसने भरून काढणे हा त्यांच्या सर्वांगीण विकासाचा पूर्ण विचार नाही. मुलांना शिकवण्याइतकेच महत्त्वाचे आहे त्यांच्या सोबत वेळ घालवणे, त्यांचे विचार ऐकणे आणि त्यांना स्वतःला व्यक्त करू देणे.

हा संवाद मुलांच्या आत्मविश्वासासाठी, भावनिक समतोलासाठी आणि कुटुंबातील संबंधांसाठी अत्यंत आवश्यक असतो. प्रत्येक वयात मुलांची गरज वेगळी असते आणि पालकांनी त्या गरजेनुसार वेळ घालवला, तर तो वेळ मुलांसाठी आयुष्यभराचा खजिना बनतो.

लहान बाळांचे वय म्हणजे १ ते ३ वर्षांचा काळ मुलांनी जगाला ओळखण्याचा आणि प्रत्येक गोष्ट नव्याने अनुभवण्याचा असतो. या वयात पालकांचा संवाद हा सर्वात प्राथमिक भाषा शिकवणारा स्रोत असतो. मुलं एखाद्या वस्तूकडे पाहतात, तिला हात लावतात, रंगांबद्दल उत्सुकता दाखवतात आणि छोट्या हालचालींमधून जग समजून घेतात. पालकांनी या वयात मुलांशी जितकं बोलावं, तितकं चांगलं. “हा कोणता रंग आहे?” किंवा “हा आवाज कसा आहे?” अशा सोप्या प्रश्नांमुळे मुलांच्या विचारशक्तीला दिशा मिळते. गाणी गाणे, गोष्टी सांगणे, हातांनी छोटे तालबद्ध खेळ खेळणे या सर्व क्रिया पालकांशी जिव्हाळ्याचं नातं तयार करत असतात. या वयात मुलांना गोष्टीपेक्षा पालकांचा आवाज, हसू आणि उपस्थिती जास्त महत्त्वाची असते, आणि हाच आधार त्यांच्या भावनिक सुरक्षिततेचा पाया बनतो.

३ ते ५ वर्षांची मुले कल्पनाशक्तीच्या रंगांनी जग रंगवत असतात. ते कधी डॉक्टर, कधी सुपरहीरो, तर कधी शिक्षक बनून आपल्या कल्पनांच्या दुनियेत पालकांनाही ओढतात. या काळात पालकांनी मुलांच्या कल्पनांना कधीच थांबवू नये; उलट त्यात सामील व्हावे. “आज आपण प्राण्यांसाठी दवाखाना उघडूया” अशी पालकांनी केलेली एक साधी सुरुवातही मुलांमध्ये कुतूहल निर्माण करते. त्यांच्या भूमिकेत शिरून त्यांच्यासोबत कथा बनवणे, त्यांना प्रश्न विचारणे यामुळे केवळ मनोरंजन होत नाही, तर मुलांची भाषा, विचार, कल्पकता आणि आत्मविश्वास यांचा विलक्षण विकास होतो. निसर्गभ्रमंती, पानं-फुलं गोळा करणे, किंवा अगदी घरच्या घरातच छोटे हस्तकला प्रोजेक्ट्स करणे. पालकांसोबतचे असे अनुभव मुलांच्या मनात “मी महत्त्वाचा आहे आणि माझे पालक माझ्या जवळ आहेत” अशी सुरक्षित भावना दृढ करून जातात.

प्राथमिक वयातील म्हणजे ६ ते ८ वर्षांची मुले आता अधिक जिज्ञासू आणि शोध घेणारी बनतात. त्यांना बोर्ड गेम्स, पझल्स, छोटे वैज्ञानिक प्रयोग किंवा शोधमोहिमा अशा अनेक गोष्टींची आवड असते. या वयात पालकांनी मुलांसोबत वेळ घालवताना त्यांच्यासोबत स्पर्धा करण्यापेक्षा सहयोग करणे अधिक महत्त्वाचे ठरते. एखादा पझल सोडवताना, “आपण एकत्र हा तुकडा कुठे बसेल ते शोधू” असे म्हणणे मुलांना टीमवर्कची भावना शिकवते. एखादा छोटा विज्ञान प्रयोग करताना “आता काय होईल असं तुला वाटतं?” असे विचारल्यास मुलांना स्वतःच्या निरीक्षणांवर विश्वास ठेवायला मदत होते. अशा संवादातून शिकणे हा मजेचा भाग बनतो आणि पालकांच्या सहभागामुळे मुलांच्या आत्मविश्वासाला एक वेगळीच झेप मिळते. रोजच्या छोट्या जबाबदाऱ्या जसे की झाडांना पाणी घालणे किंवा स्वयंपाकात थोडी मदत करणे यामुळे मुलांना कुटुंबातील आपलेपणाची अनुभूती देखील मिळते.

९ ते १२ वर्षांच्या मुलांच्या वयात त्यांची बौद्धिक जिज्ञासा, क्रिएटिव्हिटी आणि स्वतंत्र विचार करण्याची क्षमता अधिक वाढू लागते. या वयात मुलांना मोठे प्रोजेक्ट्स, मॉडेल्स, रोबोटिक्स सारखे प्रयोग, बागकाम किंवा “आपण स्वतः काहीतरी तयार करूया” अशा गोष्टींत रस असतो. पालकांनीही या सर्जनशीलतेत सहभागी होणे हे केवळ शिकवण्यापुरते मर्यादित नसते ते त्यांच्या नात्यातील एकत्रित निर्मितीचा आनंद असतो. मुलांना जेव्हा पालक विचारतात, “या प्रोजेक्टमध्ये तू काय कल्पना सुचवशील?” तेव्हा त्यांना वाटते की त्यांचे मत महत्त्वाचे आहे. अशा वेळी मुलांमध्ये निर्णयक्षमता, आत्मविश्वास आणि समस्यांवर उपाय शोधण्याची वृत्ती वाढते. बाह्य उपक्रम जसे सायकलिंग, ट्रेक, मैदानी खेळ किंवा कौटुंबिक आव्हानांमध्ये पालकांनी सहभागी झाल्यास मुलांसाठी हे अविस्मरणीय आठवणींचा भाग बनतात आणि कौटुंबिक नात्यातील उब कायम राहते.

किशोर वयातील म्हणजे १३ ते १८ वर्षांच्या मुलांमध्ये स्वातंत्र्याची गरज वाढलेली असते, पण त्याच वेळी त्यांना पालकांचा आधारही हवा असतो फक्त वेगळ्या प्रकारे. या वयातील संवाद “सांगण्यापेक्षा” अधिक “ऐकण्यावर” आधारित असतो. मित्र, सोशल मीडिया, भविष्यातील चिंता, अभ्यासाचा ताण, करिअर या सर्व विषयांवर मुलांना खुलेपणाने बोलण्यासाठी एक सुरक्षित वातावरण पालकांनी तयार करणे आवश्यक असते. एखादी संध्याकाळ एकत्र स्वयंपाक करताना, आवडी-निवडी चर्चा करताना किंवा एखादा फोटो किंवा व्हिडिओ-प्रोजेक्ट तयार करताना, मुलांना पालकांची साथ मित्रासारखी वाटू लागते. किशोरांना उपदेशापेक्षा आदर हवे असतो मार्गदर्शनापेक्षा समजून घेणे हवे असते. पालकांनी त्यांच्या स्वायत्ततेचा मान राखून, त्यांच्या मतांना महत्त्व देत संवाद साधला तर मुलांना घर ही त्यांची ताकद वाटू लागते.

या सर्व गोष्टीनच सार एकच ते म्हणजे पालक-मुलांचा एकत्रित वेळ, संवाद आणि सहभाग त्याहून महत्त्वाचा असतो. मुलांना फक्त “व्यस्त” ठेवण्यापेक्षा त्यांच्यासोबत जाणीवपूर्वक वेळ घालवणे, त्यांच्या भावनांना जाणणे, त्यांच्यातील कल्पनाशक्तीला प्रोत्साहन देणे आणि त्यांना स्वतःला व्यक्त करू देणे हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे ठरते. मुलांचा मोकळा वेळ म्हणजे फक्त रिकामा वेळ नाही, तर पालक आणि मुलांच्या नात्याला जिवंत ठेवणारा, मुलांच्या आत्मविश्वासाला बळ देणारा आणि त्यांच्या भावनिक विकासाला दिशा देणारा सुवर्णकाळ असतो. त्यामुळे मुलांसाठी वेळ “फायदेशीर” बनवायचा असेल तर त्यांच्यासोबत “उपस्थित” राहणे ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे.

Updated : 20 Nov 2025 6:30 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top