ही भावनांची ABCD मुलांना शिकवलीच पाहिजे
भावनांच्या गोंधळातून मुलांना बाहेर काढण्यासाठी पालकांनी फक्त शिस्त नाही, तर भावनांची भाषा शिकवणारे पहिले शिक्षक बनणे का आवश्यक आहे?
X
मुलांच्या भावनिक जगाचा पाया आपण मोठे होईपर्यंत फारसा उलगडत नाही. पण मानसिक आरोग्यावरील नवीन संशोधन दाखवते की मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा, नात्यांचा, आत्मसन्मानाचा आणि भविष्यातील मानसिक स्थैर्याचा सर्वात महत्त्वाचा पाया त्यांच्या बालपणीच्या भावनिक शिक्षणात लपलेला असतो. Emotional Literacy म्हणजेच भावनांना ओळखण्याची, व्यक्त करण्याची, आणि त्यांच्याशी आरोग्यदायी पद्धतीने व्यवहार करण्याची क्षमता ही आजच्या काळातील मुलांसाठी सर्वात महत्त्वाची “जीवनकौशल्ये” आहेत. पण ही कौशल्ये आपोआप मुलांच्या मनात येत नाहीत. त्यांची बियाणं पालकांच्या वागण्यात, संभाषणात आणि दैनंदिन प्रतिसादांतून पेरली जातात.
आपण म्हणतो, “मुलं चांगली असावी” पण चांगली या शब्दाची व्याख्या अजूनही बहुतेक घरांमध्ये “शांत, न रडणारी, न रागावणारी, उलट उत्तर न देणारी” अशी केली जाते. यामध्ये एक फार मोठी समस्या दडलेली असते मुलांना वाटू लागते की त्यांच्या भावनांना जागा नाही. परिणामी राग दाबला जातो, भीती लपवली जाते, मत्सर दडवला जातो आणि या भावना हळूवारपणे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात गाठी म्हणून जमा होऊ लागतात. हे भाव बालपणी संभाळले नाहीत तर ते मोठेपणी anxiety, aggression, withdrawal किंवा सतत मान्यता शोधण्याच्या रूपात धोका बनतात.
पालकांनी मुलांना भावनांची भाषा शिकवणे म्हणजे त्यांना “कंट्रोल” शिकवणे नव्हे तर “समज” शिकवणे. एखाद्या मुलाला राग येतो तेव्हा आपण बहुतेक वेळा म्हणतो, “बस! आता शांत!” पण राग ही एक नैसर्गिक भावना आहे; तो चुकीचा नाही. चुकीचा केवळ त्याचा अव्यवस्थित, अनियंत्रित, नुकसानकारक वापर असू शकतो. मुलांना “राग राग नको करूस” म्हणणे म्हणजे त्यांना त्यांच्या आत उठणाऱ्या अगदी खऱ्या, मानवी, शारीरिक-मानसिक प्रतिक्रियांपासून दूर नेणे. त्याऐवजी जर आपण म्हणालो, “तुला राग आलाय, मला दिसतंय. आता आपण पाहूया, तो कसा हाताळायचा” तर आपण मुलाला स्वतःला समजून घेण्याचा मार्ग दाखवतो.
भीती देखील मुलांसाठी एक मोठी भावना आहे. अंधाराची भीती, शाळेची भीती, अपयशाची भीती, नकाराची भीती… ही भीती दाबणं बरोबर नाही. जेव्हा मुलं म्हणतात, “मला भीती वाटते” आणि पालक त्यांना म्हणतात, “कसली भीती? तू मोठ्ठा झालायस!” तेव्हा आपण मुलांनी अनुभवलेल्या वास्तवाला दुर्लक्षित करतो. मुलांच्या जगात त्यांच्या भीती real असतात. पालकांनी या भीतीला नाकारण्याऐवजी स्वीकारायला, तिचं कारण शोधायला आणि त्या भावनेला शब्द द्यायला मदत केली पाहिजे. कारण ज्या भावना आपण नावांद्वारे ओळखतो, त्या भावना आपल्यावर कमी हावी होतात.
मत्सर हा देखील मुलांमध्ये वारंवार दिसणारा भाव आहे. लहान भावंडांबद्दल मत्सर, मित्राच्या खेळण्याबद्दल मत्सर, शाळेत इतर मुलं “चांगली” ठरत असल्यामुळे मत्सर—या भावनांना “वाईट मुलं” असे लेबल लावले जाते. पण मत्सर हा भाव एखाद्या अपूर्णतेतून, असुरक्षिततेतून, “प्रेम कमी मिळेल” या भीतीतून येतो. मुलांना मत्सराची जाणीव करून देणे म्हणजे त्यांना “वाईट” म्हणणे नाही—तर त्यांच्यातील मत्सरामागचं दुःख समजून घेण आवश्यक आहे.. जर मुलाला वाटले की त्याला पूर्णपणे ऐकून घेतले जाते आहे, त्याच्या भावनिक गरजांना मान्यता मिळते आहे, तर मत्सराचे रूप बदलते—तो संवादात परिवर्तित होतो.
मुलांच्या भावनिक शिक्षणातील पालकांची भुमिका म्हणजे “role model” बनणे. मुलं आपल्याकडून फक्त आपण काय म्हणतो ते ऐकत नाहीत; आपण कसे जगतो ते पाहतात. आपणच आपला राग कसा व्यक्त करतो? संघर्ष कसे हाताळतो? क्षमा मागतो का? आपली चूक मान्य करतो का? भीतीचा सामना कसा करतो? या सर्वांच मुलं निरीक्षणं करतात. Emotional literacy म्हणजे मोठ्यांचा संयम, संवाद, आणि मुलांबरोबरचा प्रामाणिक openness. मुलांना तुम्ही स्वतःच्या भावना कशा हाताळता हे दाखवलंत, तर ते शिकतात की भावना दाबायच्या नसतात—त्यांचं निरीक्षण करायचं असतं.
आजच्या डिजिटल काळात emotional literacy अधिक महत्त्वाची झाली आहे. स्क्रीन मुलांना बऱ्याच गोष्टी शिकवतात, पण स्क्रीन भावनांची भाषा शिकवू शकत नाही. राग, भीती, मत्सर—या भावना स्क्रीनवर नाही, नात्यांमध्ये तयार होतात आणि नात्यांमध्येच त्यांचे निराकरण होते. मुलांसाठी घरातील open communication ही त्यांची पहिली “emotional safety zone” असते. पण अनेक घरांत संवादाऐवजी सूचना असतात—“असं करू नकोस”, “शांत बस”, “रडू नकोस”, “बोलू नकोस”, “आता नाही”. आणि मग मुलं आतल्या आत भावनिकपणे बंद होऊ लागतात.
Emotional literacy शिकवणे म्हणजे मुलाशी “conversation partnership” तयार करणे. “तुला असं का वाटलं?” “त्या क्षणी तू काय अनुभवल?” “तुला मदत हवी आहे का?” “आपण एकत्र उपाय शोधूया” या वाक्यांचा परिणाम मुलांच्या मानसिक विकासावर प्रचंड होतो. हे बोलणं मुलाला सांगते की त्याच्या भावना महत्त्वाच्या आहेत. शेवटी, भावनांची भाषा शिकवणे म्हणजे मुलाला संपूर्ण माणूस बनवणे. शैक्षणिक यश, करिअर, स्किल्स—all meaningless without emotional stability. रडायला लाजत नाही, राग समजून घेतो, मत्सर समजून घेतो, भीतीला नाव देतो असा मुलगा - मुलगी आयुष्यात कोणत्याही परिस्थितीचा सामना करू शकतो. Emotional literacy ही मुलांची future immunity आहे.






