Home > बालक-पालक > आणि बाप “आई”च्या भूमिकेत जातो..!!

आणि बाप “आई”च्या भूमिकेत जातो..!!

आणि बाप “आई”च्या भूमिकेत जातो..!!
X

“नवरात्रीनिम्मितानं पोराबाळांना सांभाळत नोकरी करणा-या खु-या दुर्गांना सलाम” लहानपणापासून आपण आई बद्दल खुप काही ऐकत आलोय, आईबद्दलच्या भावनिक चारोळ्या, कविता खुप काही ऐकल्या होत्या, पण आई म्हणून मुलीसोबत भूमिका निभवण्याची पहिल्यांदाच माझ्यावर वेळ आली. तेव्हा एका बापानं “आईपण” काय असतं हे अनुभवलं. बायको कामानिमित्त बाहेर ट्रेनिंगला असल्यानं मी आणि साईशा (माझी मुलगी) पहिल्यांदाच घरी राहण्याचा योग आला. लेकीला रात्री कुशीत घेऊन झोपण्याचा आनंद काय असतो तो पहिल्यांदा अनुभवला तेव्हाच आपण बाप नाही तर “आई” झाल्याचा भास झाला.

आईच्या पोटात बाळाच्या हरकती काय असतात ते साईशा कुशीत झोपताना अनुभवल्या, त्या रात्रीची सकाळ कधीच होऊ नये असं वाटत होतं, कारण घरी कोणीही नसताना साईशा माझ्या कुशीत झोपण्याची ती पहिलीच वेळ होती. इवलेसे हात, इवलेसे पाय जेव्हा वळवळ करायचे तेव्हा हदयाला होणा-या गुदगुदल्या काही वेगळ्याच अनुभवल्या, तिचा स्पर्श परिसासमानच जणू, सकाळी तिची आंघोळ, शाळेची तयारी, शाळेचा डबा, शाळेत सोडणे/घेऊन येणे सर्व काही वेगळं वाटत होतं.खूपच दडपण होते पण आई बनल्याचा आनंद जास्त होत होता.

एखादी आई जेव्हा आपल्या पोटच्या पोराला प्ले ग्रुप, नातेवाईक, आजीं-आजोबांकडे सोडून इच्छा नसताना कामावर जायला निघते तेव्हाची ती वेळ प्रत्येक आईसाठी कठीण असते हिच वेळ त्यादिवशी माझ्यावर आली. माझाही घरातून पाय निघत नव्हता “साईशालाही मी पाहिजे होतो आणि मला ती”.. आॅफिसचे फोन सतत सुरु होते ,लाईव्ह करायचं होतं कारण युतीचा प्रश्न तितकाच गंभीर होता, त्यामुळे काही काळ साईशाला माझ्यासोबत ठेवलं आणि लाईव्ह देऊन टाकलं, क्षणभरासाठी लेकरांना सोडून कामावर जाणा-या असंख्य स्रिया डोळ्यासमोरून गेल्या. या पैसे कमावण्याच्या नादात आपण काय करतोय? हेच कळत नव्हतं. थोड्यावेळ मला ही वाटलं “द्यावं सोडून हे सगळं”,

पण परत पुढे प्रश्न उभा रहातो तो लेकरांच्या शिक्षणाचा, घरासाठी घेतलेल्या कर्जाचा, त्यामुळे हे स्वत:लाच समजूत घालावी लागली.

आपलं कुटुंब, घराचं कर्ज, मुलाचं शिक्षण, घरातलं आजारपण यासाठी चार पैसे जमावे यासाठी आजकालची आई इच्छा नसताना जाॅब करते. पण तिच्या मागे काय दगदग असते हे प्रत्यक्षात अनुभवलं. मुलाचं पालनपोषण, स्वत:ची तयारी, रोजचा प्रवास, आॅफिसातलं राजकारण, घरी गेल्यावर परत जेवण आणि दिवसभर त्रास सहन करूनही घरात हसत खेळत राहण्याची मोठी जबाबदारी पार पाडतात, त्या सर्व समस्त महिला वर्गाला माझा कोपरापासून दंडवत !!

😘 !! हॅट्स ऑफ ऑल मॉम !! 😘

- एक “बाप”

(लेखक ABP माझा या वाहिनीत राजकीय प्रतिनिधी आहेत)

Updated : 30 Sep 2019 4:12 AM GMT
Next Story
Share it
Top