Home > Auto > स्वराज्यासाठी प्राण गेले तरी बेहत्तर- राजमाता जिजाऊ

स्वराज्यासाठी प्राण गेले तरी बेहत्तर- राजमाता जिजाऊ

स्वराज्यासाठी प्राण गेले तरी बेहत्तर- राजमाता जिजाऊ
X

दरवर्षी १२ जानेवारी हा दिवस राजमाता जिजाऊ यांची तारखेनुसार जयंती साजरी केली जाते. माता ही एक शक्ती आहे. ती मायाळू सुद्धा आहे. यासाठी दरवेळी आई आपल्या मुलांना जिजाबाईचं उदाहरण देते. राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले. स्वराज्य संकल्पनेची बीजे जिजाबाईंनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनात पेरली आणि तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे, असा प्रचंड आत्मविश्वास शिवरायांमध्ये जिजाबाईंनीच निर्माण केला आणि स्वराज्य घडले.

१२ जानेवारी १५९८ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा जवळील देऊळगाव या ठिकाणी झाला. त्यांच्या वडीलांचे नाव लखुजी जाधव आणि आईचे नाव म्हाळसाबाई होते. त्यांचा विवाह वेरूळचे मालोजी भोसले यांचे चिरंजीव शहाजी राजे भोसले यांच्याशी झाला. आई जिजाऊ यांनी शिवबाच्या जन्माअगोदर तुळजाभवानीला प्रार्थना केली होती की, माझ्या कुळाला, देशाला, धर्माला अभिमान वाटेल असा पुत्र माझ्या पोटी जन्माला येऊ दे. आई तुळजाभवानीने जिजाऊ यांचं हे गाऱ्हाणं ऐकलं. आणि राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले.

राजामाता जिजाऊ यांनी लहानपणापासूनच शिवरायांवर रामायण आणि महाभारताचे संस्कार रुजवले. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजारांच्या हातात शहाजीराजांनी पुण्याची जहागीर सुपूर्द केली. आई जिजाऊ यांच्या शिवबावर केलेल्या संस्कारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी वर्षानुवर्षे चालत आलेली गुलामगिरी मोडीत काढली. शिवाजी महाराजांमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण करणाचे काम आई जिजाऊ यांनी केले. हिंदवी स्वराज्याची स्थापना ज्या शिवरायांनी केली, त्याचे खरे श्रेय राजमाता जिजाऊ यांना जाते. राज्यात न्याय-निवाडा करण्याचे धडे राजमाता जिजाऊ यांनी शिवबाला दिले. जिजाबाई शिवाजी महाराजांच्या आद्यगुरु होत्या असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा सुवर्ण क्षण डोळ्यादेखत पाहिल्यानंतर अवघ्या बारा दिवसांतच म्हणजे १७ जून १६७४ रोजी किल्ले राजगडाजवळील पाचाड गावात राजमाता जिजाऊ यांनी अखेरचा श्वास घेतला. जिजाऊ या आदर्श माता होत्या. आपल्या मुलांना त्यांनी धैर्य, परोपकार, आत्मविश्वास, शौर्य, न्याय, निर्भय, राष्ट्र प्रेम या सर्वांचे धडे देण्याचे काम केले. असे संस्कार करण्याचे सामर्थ्य प्रत्येक आईमध्ये असावे, अशी त्यांची प्रामाणिक इच्छा होती. प्रत्येक स्त्रीने आपली शक्ती ओळखून आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याच्या निर्मिर्तीसाठी प्रयत्न केले पाहिजे, असा संदेशच जणू त्यावेळी जिजाऊंनी सर्व मातांना आपल्या कार्यातून दिल्याचे दिल्याचे दिसून येते.

Updated : 12 Jan 2023 1:09 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top