"डोंबिवलीकर रोझ फेस्टिवल" यावर्षी १३ ते १५ जानेवारीला होणार
X
१२ जानेवारी-दरवर्षीप्रमाणे यंदाही 'डोंबिवलीकर रोझ फेस्टिवल'चे आयोजन करण्यात आले असून १३ ते १५ जानेवारी दरम्यान बालभवन, रामनगर, डोंबिवली पूर्व येथे या भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये राज्यातील विविध ठिकाणहून आलेल्या गुलाबांच्या विविध जातींचे तसेच विविधा रंगाचे, सुवासिक गुलाब पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. डोंबिवलीकर मासिकाचे संपादक व सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येत असलेल्या या 'डोंबिवलीकर रोझ फेस्टिवल'मध्ये राज्यस्तरिय गुलाब प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. उद्या शुक्रवारी, १३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता मंत्री चव्हाण यांच्या हस्ते या प्रदशनाचे उद्धाटन होणार आहे.
'डोंबिवलीकर रोझ फेस्टिवल' संदर्भात माहिती देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण ह्यांनी सांगितले की, यंदाही डोंबिवलीतील गुलाब प्रदर्शन हे राज्यस्तरीय स्वरुपाचे आहे. सकाळी १० ते रात्री ०९ पर्यंत हे प्रदर्शन सुरु राहणार आहे. इंडियन रोझ फेडरेशन ह्या अखिल भारतीय गुलाबप्रेमी संस्थेच्या सहकार्याने महाराष्ट्रातील मोठमोठ्या गुलाब शेती करणाऱ्या व्यक्ती व संस्था 'डोंबिवलीकर रोझ फेस्टिवल'मध्ये सहभागी होणार आहेत. त्याप्रमाणे मुंबई, पुणे, वांगणी, पनवेल, नाशिक शहापूरमधील गुलाब उत्पादकही सहभागी होणार आहेत. फेस्टिवलमध्ये अभिनव प्रकारच्या गुलाब स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेतील विजेत्यांना गुलाबांचा राजा, राणी, युवराज, युवराज्ञी आदी अनोखी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
'डोंबिवलीकर रोझ फेस्टिवल'साठी गौरवास्पद गोष्ट म्हणजे ठाणे जिल्ह्यातील दोन प्रमुख गुलाब उत्पादक कल्याणचे डॉ. म्हसकर व वांगणीचे मोरे बंधू पहिल्या वर्षांपासून प्रदर्शनात सहभागी होत आहेत. दोघांनीही गुलाब लागवडीत खरोखर पथदर्शक काम केलं आहे. डॉ. म्हसकर कल्याण डोंबिवलीतील प्रख्यात प्रसूतीतज्ज्ञ असून ते सच्चे गुलाबप्रेमी आहेत. तर वांगणीच्या आशीष मोरे यांनी भारतातील विविध गुलाब प्रदर्शन स्पर्धांमध्ये अनेक पारितोषिके जिंकली आहेतं.
तसेच दुर्मिळ टपाल तिकीटे, आणि प्रख्यात व्यक्तींच्या स्वाक्षऱ्यांचे संग्राहक सांगलीच्या गजानन पटवर्धन यांचे विविध देशांचे गुलाब विषयावरील प्रदर्शन पाहायला मिळेल. त्यांनी देशविदेशातील सुमारे ५०,००० टपाल तिकिटे, त्या संबंधीचे टपाल साहित्य, तसेच सुमारे १५०० हून अधिक स्वाक्षऱ्या वैशिष्ट्य पूर्ण संग्रहात जतन केल्या आहेत असेही मंत्री चव्हाण यांनी सांगितले.
डोंबिवली गुलाब प्रदर्शनामध्ये सर्वसामान्य डोंबिवलीकरांना केवळ छानछान गुलाब पहायला मिळणार नाहीत तर त्यांच्या घराच्या बागेतील गुलाबही प्रदर्शनामध्ये मांडता येणार आहेत. हौशी स्पधर्कांच्या स्पर्धेत त्यांना सहभागी होता येईल. व्यावसायिक व घरगुती विभागातील स्पर्धेत लाल, गुलाबी, पिवळा, नारिंगी, निळसर, पांढरा, दुरंगी, रेघांचा, सुवासिक, मिनिएचर इ. १० प्रकारच्या गुलाबांचा समावेश असेल. गुलाब प्रदर्शनाव्यतिरिक्त याप्रसंगी आकर्षक पुष्परचना सजावटीची स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये गुलाब फुलाला केंद्र स्थानी ठेवून अन्य फुले वापरण्याची मुभा देण्यात आली आहे.