अरब महिलांच्या लैंगिक संबंधावर ‘त्या’ भाजप खासदाराचं ट्वीट मोदींना पडलं महागात

Update: 2020-04-20 05:54 GMT

भारतात कोरोना फैलावास जबाबदार धरून मुस्लिमांविरोधात नियोजनबद्धरित्या पसरवण्यात आलेल्या विद्वेषाचे पडसाद आखाती देशात उमटलेले असतानाच, मोदी-शहांचा लाडका खासदार तेजस्वी सुर्या (Tejasvi Surya) याने अरब महिलांसंदर्भात केलेलं एक जुनं आक्षेपार्ह ट्वीट रिट्वीट झालं असून, अरब राष्ट्रात त्याविरोधात संतापाची लाट आहे. तेजस्वीविरोधात कारवाईची मागणी अरबांकडून भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींकडे करण्यात आली आहे.

तेजस्वी सुर्याचं ट्वीट २३ मार्च, २०१५ चं आहे. पण दुबईतील एका वकिलाने ते काल रिट्वीट केलंय. भारतात सद्या सुरू असलेल्या इस्लामोफोबियाच्या पार्श्वभूमीवर ते वर आलं असावं. आता त्याविरोधात युएईमधील मिडियामध्येही मोठं रान उठलंय. भारतीय मिडियाने केलेल्या कोरोना जमाती, कोरोना जिहाद या उल्लेखांवर आखाती जगतातून जोरदार आक्षेप आलेला असून समाज माध्यमातील तो सध्याचा सर्वाधिक चर्चेचा विषय आहे.

युएईत एका कंपनीत बड्या कंपनीत काम करणाऱ्या प्रीती गिरी आणि अभिमन्यू गिरी या भारतीय दाम्पत्याच्या मुस्लिमविद्वेषी ट्वीटस् ची दुबई पोलिसांत तक्रार करण्यात आलेली असून प्रीती गिरीने आपलं अकाऊंट माफी मागून डिलिट केलंय. प्रीती यांच्या अकाऊंटला त्यांचा मोदींसोबतचा फोटो आहे. त्यासंदर्भाने अमिराती एक्टिविस्ट नूरा अल गुरेर यांनी ट्वीट करून म्हटलंय की कोणासोबत फोटो ठेवलाय, म्हणून तुझा बचाव होईल, हे विसरून जा. गिरी प्रकरण तापलेलं असतानाच आता तेजस्वी सुर्याच्या ट्वीटने आगीत तेल ओतलंय.

https://twitter.com/AlGhurair98/status/1251846220663963648?s=19

९५ टक्के अरब महिलांना ऑर्गॅझम येत नाही, त्यांना होणारी मुलं निव्वळ सेक्समधून होतात, त्यात प्रेम नसतं...अशा आशयाचं तेजस्वी सुर्याचं ट्वीट होतं. आता ते डिलिटेड आहे. पण रिट्वीटसोबत मजकुराचा स्क्रीनशाॅट उपलब्ध असल्याने आता अरब राष्ट्रांसमोर नरेंद्र मोदी तेजस्वी सुर्याचा कसा बचाव करतात, हे पाहणं मोठं उत्सुकतेचं ठरणार आहे.