अर्णब यांच्या शो वर बंदीसाठी हायकोर्टात २ याचिका, ‘ही’ आहेत कारणे…

Update: 2020-04-27 12:53 GMT

कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी रिपब्लिक भारत वृत्तबाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायलय आणि कर्नाटक उच्च न्यायालयात काँग्रेस नेत्यांकडून दोन याचिका दाखल झाल्या आहेत. संबंधित याचिकेत प्रकरणाची चौकशी पुर्ण होईपर्यंत रिपब्लिक वृत्तवाहिनीच्या प्रसारणावर बंदी आणि अर्णव गोस्वामी यांच्याकडून प्रसारित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी आणावी अशी मागणी करण्यात आली आहे.

हे ही वाचा..

लाईव्ह लॉने दिलेल्या वृत्तानुसार या याचिका महाराष्ट्रातून विधान परिषद सदस्य भाई जगताप, महाराष्ट्र यूथ काँग्रेसचे उपाध्यक्ष सूरज ठाकूर तर कर्नाटकातून सामाजिक कार्यकर्ते व आरटीआय कार्यकर्ते मोहम्मद आरिफ जमील यांनी दाखल केली आहे.

महाराष्ट्रात याचिकाकर्त्यांनी आपले वकील राहुल कामेरकर यांच्या मार्फत पालघर चौकशी पूर्ण होईपर्यंत अर्णव गोस्वामी व रिपब्लिक टीव्हीच्या प्रसारणावर तात्पुरती बंदी घालावी असे म्हटले आहे.

कर्नाटक उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत मोहम्मद आरिफ यांनी, देशातला लॉकडाऊन तीन महिने राहील, या फेक न्यूजमुळे शहरांत काम करणाऱ्या स्थलांतरित मजुरांनी पलायन करण्याचा प्रयत्न केला होता, असे निरीक्षण ३१ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले होते, त्याचा हवाला या याचिकेत दिला आहे.

त्यावेळी सरन्यायाधीश शरद बोबडे व न्या. नागेश्वर राव पीठाने कोरोना संबंधित वृत्तांकन करताना मीडियाने जबाबदारी पाळावी आणि वृत्त खरे असेल तरच ते प्रसिद्ध करावे असे निर्देश दिले होते. पण सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्देशाकडे दुर्लक्ष करत रिपब्लिक टीव्हीवर खोटे वृत्त दिल्याचे या याचिकेत नमूद करण्यात आले आहे.