राज्यात लॉकडाऊनची मुदत वाढणार? आज होणार ठाकरे आणि मोदींची चर्चा  

Update: 2020-04-27 00:36 GMT

राज्यात कोरोना बाधितांची संख्या ८ हजाराच्या पार झाली असून देशभरातील राज्यामध्ये कोरोना विषाणूचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात झाला आहे. राज्यातील लॉकडाऊन ३ मे रोजी संपणार आहे. राज्यात अजूनही कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय. अशा बिकट परिस्थितीत कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्र शासनाची मदत मिळणं अत्यावश्यक आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी म्हटलं आहे. राज्यातील लॉकडाऊनची मुदत आणि केंद्र शासनाकडून इतर सहाय्य मिळण्यासंदर्भात आज उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याशी बातचीत होणार असल्याचे संकेत दिले आहे.

केंद्र सरकारकडून राज्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यासह या लढाईत अग्रेसर असणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य सेवकांच्या सुरक्षेसाठी PPE किटची जास्त प्रमाणात गरज आहे. लॉकडाऊन च्या काळात नागरिकांना अन्नधान्य पुरविणं हे सरकारसमोरील मोठं आवाहन आहे. सोबतच लॉकडाऊनमुळे त्रस्त परप्रांतीय मजुरांची मोठी समस्या निर्माण झाली आहे. या मजुरांना आपल्या राज्यात पाठवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी काल प्रथमच केंद्र सरकारवर निशाणा साधताना केंद्राच्या नितीवर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी या कठीण काळात विरोधी पक्षातील नेत्यांच्या राजकीय प्रश्नांवर बोलताना ‘मला जीव वाचवायचे आहेत. त्यांना राजकारण करु दे’ अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारण न करता महाराष्ट्र सरकारच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आभार व्यक्त केले.