कोल्हापूरात चक्क महिलांचा जुगार अड्डा, अड्ड्यावर पोलिसांचा छापा

Update: 2020-07-15 23:57 GMT

जुगार अड्डा म्हणटलं की आजपर्यंत पुरूष हेच समीकरण बहुतांशी लोकांना माहित होतं. परंतु कोल्हापूरात चक्क महिलांचा जुगार अड्डा पोलिसांना सापडला आहे. राजारामपुरी परिसराला लागून असलेल्या टेंबलाईवाडी नाका झोपडपट्टीत जुगार अड्डा चालतो, अशी माहिती राजारामपुरी पोलिसांना मिळाली. शोभा हेगडे ही महिला हा अड्डा चालवते आणि तेथे महिला जुगार खेळतात, अशी माहिती खबऱ्याने दिली. त्यानुसार राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक नवनाथ घुगरे यांच्या नेतृत्त्वाखाली पथकाने या अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली. या छाप्यात पोलिसांनी रोख सहा हजार रूपये, दोन मोबाईल, जुगाराचे साहित्य असा एकूण १४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यापुर्वी दारू अड्डे, मटका अड्डे चालवणाऱ्या महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. पण महिलांच्या जुगार अड्ड्यावरील छाप्याची ही पहिलीच कारवाई असून ती जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे.

दरम्यान कोल्हापुरात मटका, जुगार पूर्णपणे बंद आहे, असा पोलिसांचा दावा आहे. पण अनेक ठिकाणी तो राजरोसपणे सुरू आहे. लॉकडाऊन च्या काळात तर त्याला आणखी ऊत आला आहे. दुपारच्या वेळी तर चक्क महिलाच जुगार खेळत आहेत. कोल्हापुरातील या कारवाईने पोलीसही चक्रावले आहेत. या प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे. अशा पद्धतीने आणखी कुठे जुगार अड्डा सुरू असेल तर माहिती द्यावी, त्यावर तातडीने कारवाई करण्यात येईल, असे पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी सांगितले.

 

Similar News