मुंबईकर पाण्यात, या मोसमातील उच्चांकी पावसाची नोंद

Update: 2020-08-06 02:00 GMT

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला अतिवृष्टीचा अंदाज खरा ठरवत पावसाने बुधवारी मुंबई आणि ठाण्याला अक्षरश: झोडपून काढले. मुंबईत तर जागोजागी पाणीच पाणी दिसत होते. जे.जे.हॉस्पिटल, मंत्रालय परिसर, यासारख्या ठिकाणीही पाणी भरले होते. काही ठिकाणी तर समुद्राचे पाणी रस्त्यांवर आले होते. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले. रेल्वे स्टेशनवर अडकलेल्या लोकांना बोटींद्वारे बाहेर काढावे लागले. मुंबईत सकाळी ८ ते रात्री ८ या कालावधीत शहर भागात २१५.८ मिमी, पूर्व उपनगरात १०१.९ मिमी; तर पश्चिम उपनगरात ७६.०३ मिमी पावसाची नोंद झाली. तर मरीन लाइन्स परिसरात संध्याकाळी ४:१५च्या सुमारास १०१किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत होते.

मुंबईत या मोसमातील १२ तासातील सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक‌ म्हणजे ३०९ मिलीमीटर पाऊस महापालिकेच्या 'डी' विभाग परिसरात नोंदवण्यात आला आहे.

मुंबईत जोरदार वाऱ्यांच्या तडाख्याने १४१ ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. अतिवृष्टीमुळे मध्य व पश्चिम रेल्वेची वाहतूक बंद झाल्याने अत्यावश्यक सेवेतील अनेक कर्मचारी रेल्वेस्थानकांवर अडकून पडले होते. यांच्यासाठी तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था रेल्वे स्थानकांलगतच्या मनपा शाळांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली. या अतिवृष्टीच्या आणि सुरु असलेल्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व सहाय्यक आयुक्त, खातेप्रमुख, सर्व संबंधित अधिकारी यांनी सतर्क राहण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी दिले आहेत. ठाण्यातही अनेक भागांमध्ये पाणी भरल्याने वाहतूक ठप्प झाली होती. ठाण्यात पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांनी अत्यावश्यक असेल तरच बाहेर पडावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Similar News