महिलांवरील अत्याचारात पुरुषांप्रमाणे महिला ही तितक्याच जबाबदार- चित्रा वाघ

Update: 2020-03-09 10:40 GMT

राज्यातील तब्बल 84 हजार मुली-महिला बेपत्ता आहेत, अनेक मुलींचे बालविवाह होतायत, कुणावर ऍसिड तर कुणावर पेट्रोल-डिझेल टाकून जाळलं जातंय... अशा पार्श्वभूमीवर राज्यातलं सरकार स्वतःचे 100 दिवस पूर्ण झाले म्हणून स्वतःची पाठ थोपटवून घेतंय. थातूर मातूर घोषणांची सजवलेल्या बजेटला जेंडर बजेट म्हणून ढोल बडवून घेतंय.. 8 मार्च... महिला दिनाच्या निमित्ताने मुद्दाम अशा घटनांची उजळणी करावी लागते, मात्र मायबाप सरकारला याची चिंताच वाटत नाही याची खंत आणि सल मनामध्ये टोचतेय. ही सल-टोचणी घेऊनच सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देते.

महिला दिनाच्या निमित्ताने जगभर #EACHFOREQUAL या थीम खाली महिलांच्या संघर्षाचं स्मरण केलं जातंय. आजही समानतेचा अधिकार जगाला ओरडून सांगावा लागतोय. जगभरात महिलांच्या श्रमाचं योगदान गेल्या काही वर्षांत कमी झालंय, याचाच अर्थ महिलांचा रोजगार कमी झालाय. युनायटेड नेशन्स नी या संदर्भातला एक अहवाल नुकताच प्रकाशित केला होता. मानवी तस्करी हा जगासमोरचा सर्वांत मोठा प्रश्न आहे. जगभरातून अनेक मुली-महिला सेक्स रॅकेटच्या जाळ्यात ओढल्या गेल्यात. महिला या केवळ उपभोग्य वस्तू आहेत ही समाजाची मानसिकता झालीय.

या महिला दिनाच्या निमित्ताने प्रत्येक महिलेने शपथ घ्यायला हवी. समाजातील महिलांच्या आजच्या स्थितीला पुरुष जितके जबाबदार आहेत तितक्याच महिला ही आहेत. आपण आपल्या मुलांना महिलांचा सन्मान ठेवण्याचा संस्कार दिला पाहिजे. त्याचप्रमाणे चुकलेल्या मुलांना शिक्षा ही दिली पाहिजे. आईचा धाक काय असतो हे मुलांना-पुरूषांना दाखवून दिलं पाहिजे. मुला-मुली मध्ये भेद करता कामा नये. राज्यातील एका महिला नेत्याने मुलगा हवा म्हणून सुनेचा छळ केल्याची बातमी नुकतीच वाचली. अशा बातम्या समाजमनावर गंभीर परिणाम करत असतात. त्यामुळे महिलांनीही सावधगिरी बाळगली पाहिजे. पुरुषांना एक आई, बहिण, बायको, मैत्रिण घडवत असते.. या सर्व भूमिकांमधील सर्व महिलांनी आता सक्षमपणे समाजाचं नेतृत्व आपल्या हातात घेतलं पाहिजे.

या महिला दिनाच्या निमित्ताने स्वतःला एक सांगायला हवं, की आपण कमजोर नाहीत. आपण या जगाचा उद्धार करू शकतो. हिंमत हरू नका, स्वतःला अबला समजू नका.. उद्याचा दिवस आपलाच आहे. महिला शक्तीचा आहे.

धन्यवाद

- चित्रा वाघ

उपाध्यक्ष, भाजपा

Similar News