या कारणामुळे दिला हरसिमरत कौर यांनी मंत्री पदाचा राजीनामा

Update: 2020-09-18 03:37 GMT

संसदेत आणलेल्या कृषी संबंधी विधेयकाच्या निषेधार्थ भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या आणि केंद्रीय अन्न प्रकिया मंत्री हरसिमरत कौर यांनी शुक्रवारी मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष बाब म्हणजे मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्यांनी राजीनामा दिला आहे.

विशेष बाब म्हणजे भाजपचा जुना सहकारी मित्र पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाच्या नेत्यानं राजीनामा दिल्यानं भाजप पासून मित्र पक्ष दूर जाताना दिसत आहे. शिवसेनेने भाजपची साथ सोडल्यानंतर आता शिरोमणी अकाली दल देखील साथ सोडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, हरसिमरत कौर यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा ट्विटरवरुन केली आहे. यासंबंधी केलेल्या ट्वीटमध्ये त्या म्हणाल्या की 'शेतकरीविरोधी अध्यादेश व कायद्याच्या निषेधार्थ मी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आहे. शेतकऱ्यांसोबत त्यांची मुलगी आणि बहीण म्हणून त्यांच्यासोबत उभं राहण्याचा मला अभिमान वाटतो.' असं त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे.

मात्र, हरसिमरत कौर यांनी राजीनामा दिला असला तरी आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) चे सहकारी आहोत. असं म्हटलं आहे.

दरम्यान शिरोमणी अकाली दलचे नेते सुखबीर बादल यांनी कृषी उत्पन्न व्यापार व वाणिज्य (पदोन्नती आणि सुलभता) विधेयक-२०२० आणि शेतकरी (सबलीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन करार आणि कृषी सेवा विधेयक-२०२० वर झालेल्या चर्चेत भाग घेताना या विधेयकाचा विरोध केला होता.

'शिरोमणी अकाली दल हा शेतकर्‍यांचा पक्ष आहे आणि या कृषी संबंधी विधेयकाला आमचा विरोध आहे.' अशी भूमिका त्यांनी घेतली होती.

Similar News