आपल्या सोबत असलेल्या व्यक्तीला चक्कर आल्यास काय करावे?

कधी कधी आपल्या सोबत असलेल्या व्यक्तीला चक्कर आली तर काय करावे हे देखील आपल्याला सुचत नसते. मात्र, आपण जरा हुशारी दाखवली तर एखाद्या व्यक्तीचे प्राण नक्कीच वाचू शकतात. वाचा पत्रकार मिलिंद भागवत यांना याच बाबतीत आलेला एक अनुभव....

Update: 2020-03-10 08:36 GMT

आज ऑफिसला येताना लोअर परळ स्टेशनवर दोन मुली आणि एक मुलगा जिन्यावर थांबले होते. चांगलेच अस्वस्थ होते. कारण त्यातल्या एका मुलीला चक्कर आली होती.

तिचे दोन्ही सहकारी तिला धरून उभे होते आणि क्या हुआ? क्या हुआ? असं विचारत होते. चक्कर आलेल्या मुलीचा काहीच सुधरत नव्हतं. ती बिचारी थरथरत होती. डोळे बंद होते, थोडा घाम फुटला होता. पण तिच्या बरोबरचे मित्र फक्त क्या हुआ इतकंच पालुपद सुरु होतं. काही जणं थांबले होते, मी सुद्धा क्षणभर थांबलो. ९० टक्के बघे होते. मी आणि आणखी एकाने पाण्याची बाटली काढून दिली. म्हटलं, ‘त्या मुलीच्या तोंडावर पाणी मारा जोरात. थोडी हुशारी येईल’. हातात पाणी दिलं. तर त्या मुलांना तोंडावर धड पाणी सुद्धा मारता येत नव्हतं. दोन, तीन वेळा त्यांनी प्रयत्न केला, पण तोंडावर धड पाणीच उडत नव्हतं. ती मुलं सुद्धा थोडी घाबरलेली दिसत होती. शेवटी मीच माझ्या हातावर घेऊन त्या चक्कर आलेल्या मुलीच्या तोंडावर जोरात पाणी मारलं. तेंव्हा तिने डोळे किंचित उघडले. पण तिला काहीच सुधरत नव्हतं. बघ्यांकडून निरिक्षण सुरु होतं. तर काही जणं खाली बसवा,वारा घाला म्हणत होते. पण त्या चक्कर आलेल्या मुलीच्या मैत्रिणींना काहीच सुधरत नव्हतं.

शेवटी मी त्यांना म्हटलं तिला एखादी लिमलेटची गोळी किंवा चॉकलेट खायला द्या.. मला समोरून प्रश्न विचारण्यात आला, त्याने काय होईल... मी अवाक झालो.. चक्कर आल्यावर तोंडावर पाणी मारायचं कसं मारायचं, काही खाल्लेलं नसेन तर लिंबू पाणी किंवा एखादं चॉकलेट खाल्लं तर लवकर हुशारी येते. ही साधी गोष्ट सुद्धा त्या मुलांना माहीत नव्हती.

एकाने एक लिमलेटची गोळी काढून दिली त्या मुलीला.. मी सहज विचारलं तुम्ही काय करता, तर त्या तिघांमधला एक जण म्हणाला, आम्ही बारावीचा पेपर देऊन आलो आहेत. तर दुसरी मुलगी, चलो इसके पापा को फोन करते है, म्हणत होती.. आपल्या सहकाऱ्याची संकटकाळी कशी काळजी घ्यायची हे सुद्धा त्या १२ वी पास होऊ घातलेल्या मुलांना माहीत नव्हतं याचं मला फार आश्चर्य वाटलं.

पत्रकार मिलिंद भागवत यांच्या वॉलवरुन साभार..

Similar News