आईच आईपण...

Update: 2020-09-15 08:56 GMT

माझ्या लहानपणीची एक घटना मला आठवतेय. गावात तेव्हा कोंबड्यावरचा काहीतरी रोग आला होता. मी खूप लहान होते तेव्हा… गावातल्या सगळ्या कोंबड्या त्यात मेल्या. आमच्या घरच्याही कोंबड्या त्यात मेल्या. फक्त कास कोण जाणे एक कोंबडीच पिल्लू वाचाल. खूप अशक्त झालं होत तेव्हा ते. त्याला चालायता येत नव्हतं.

आम्ही सगळी भावंडं गावी होतो. आत्या, काकाची मुलं ती सगळी खेळण्यात मश्गुल असायची. माझं लक्ष मात्र या पिल्लाकडे लागलेलं असायचं. घरात आजी आणि इतर वडिलधाऱ्यांमध्ये चर्चा सुरु होती ‘’आता हे पण एक दोन दिवसात मरेल... '' मरूकच इला हा ता " मग काय, मी तिला विचारलं, आजी हे वाचणार नाही का? काहीतरी औषध असेल ना त्याला वाचवायला. आईविना ते छोटंसं पिल्लू कसबस ओरडायचा प्रयत्न करायचं.

आजीने मला सांगितलं अग, औषध आहे. पण ते वाचेल की नाही याची खात्री नाही. मला आनंद झाला हे ऐकून. म्हटलं मला सांग. कसलं औषध? कसं आणि किती द्यायचं ते. मी कारेन. मी याला मरू देणार नाही. मी करेन त्याचं औषध आणि तिने मला कसलातरी पाला आणून दिला. पाट्यावर वाटून त्याचा रस त्या पिल्लाच्या तोंडात पीळ म्हणाली दोन चार थेम्ब बघ जगला तर जगला आणि मी लागलीच कामाला लागले.

मी लहान होते तेव्हा पण माझ्या समोर ते पिल्लू मरावं असं मला अजिबात वाटत नव्हतं. मी पाट्यावर तो पाला वाटला. त्या पिल्लाला पकडून त्याच्या छोट्याशा चोचीत तो रस पिळला आणि तशीच त्याला घेऊन बसून राहिले. थोड्या वेळाने ते पिल्लू जरा तरतरीत दिसू लागलं. झालं, मला आनंद झाला. पुढचे चारपाच दिवस तरी त्या पिल्लाला मी खाली काही सोडलं नाही. रात्री आजी दरडावून ते पिल्लू टोपलीखाली ठेवायची.

तहान भूक हरपून त्या पिल्लाची आई झाले. माझ्या भावंडांसोबत खेळण्यापेक्षा त्या पिल्लाला दिवसभर तो रस भरवणं यातच स्वतःला वाहून घेतलं. म्हणजे आजीला सांगावं लागलं अग बस कर नाहीतर जास्त रस दिल्यामुळे ते पिल्लू आजारी पडेल.

अर्थात हे प्रेमानेच होत. कारण या चार पाच दिवसात माझ्या या उद्योगाने ते पिल्लू खरंच वाचल. घरात सगळ्यांना माझं कौतुक. हिने हे गावातलं एकमेव पिल्लू वाचवलं. पुढे सुट्टी संपून आम्ही मुंबईला आलो. काही महिन्यांनी ते पिल्लू मोठं झालं. ती कोंबडी होती. तिचा परिवार वाढत गेला. पुढे बराच काळ, आजी अधूनमधून तिची अंडी मला पिठाच्या डब्यात ठेवून पाठवायची.

ही गोष्ट आज आठवायचं कारण म्हणजे . एक वर्षांपूर्वी १ ऑगस्ट २०१९ ला आईला ब्रेन हॅमरेज झाला. खूप क्रिटिकल परिस्थिती तिची होती. दोन महिने आयसीयूमध्ये होती ती. या दरम्यान किमान दहा बारा वेळा डॉक्टरांनी बोलावून सांगितलं असेल. परिस्थिती गंभीर आहे. काहीही होऊ शकेल. गरज लागली तर व्हेंटिलेटर लावावं लागेल. खरंच होतं ते. हॅमरेजमुळे तिचा डावा डोळा बंद झाला होता.

घशावरही परिणाम झाला होता, त्यामुळे काहीही गिळताना तिला त्रास होत होता. बोलताना त्रास होत होता. तिच्या डोळ्यात मध्येच शून्यवत भाव असायचे. ती कोमात होती. सगळ्या संकटापासून त्या जाणिवेपासून कोसो दूर आणि सगळे अवघड निर्णय आम्हाला घ्यावे लागत होते.

तिथे पिल्लू होतं. इथे आई होती. याच काळात तिला गळ्यात सेंट्रल लाईन टाकावी लागली. आजही ते दिवस आठवले तर अंगावर काटा येतो. रोज नवी आव्हान. चढ उत्तर. त्यात आयसीयूमध्ये भेटायला दिल नाही म्हणून काही नातेवाईकांची नाराजी सहन करावी लागली. असं खूप काही झेलत असताना उत्तम माणसं. अपवाद सोडता, उत्तम डॉक्टर्स, नर्सेस भेटले. अनेक देवमाणसं पावलोपावली भेटली. या सगळ्यांनी तेव्हा प्रत्येक ठिकाणी जी मदत केली ती कधीच फेडता येणार नाही.

दोन महिन्यांनी आईला डिस्चार्ज मिळाला. थोडं हायस वाटलं. पण पुढच्या तीनच महिन्यात पुन्हा ऍडमिट व्हावं लागलं. नाकात नळी, कॅथेटर आणि सोबत बेड सोर असं सगळं सांभाळावं लागत होतं. १६ दिवस हॉस्पिटलमध्ये काढल्यानंतर या सगळ्यासहित तिला घरी आणलं.

रोज नवनवीन आव्हान समोर येत राहिली. दरवेळी ती पार करताना दिव्य करावी लागत होती. दोनच महिने तिला घरी आणून होत नाहीत तोवर मार्चमध्ये कोरोना नामक राक्षस उभा राहिला. पुन्हा एक नवीन तारेवरची कसरत सुरु झाली. मे महिन्यात माझे दोन भाऊ त्याने ग्रस्त झाले. आईची सगळी धुरा माझ्या एकटीवर आली. याच काळात एक जवळचा मित्र गमावला. अजून काही ओळखीतले लोक गेले. काही या आजाराने ग्रस्त झाले.

आईसुद्धा तेव्हा खूप अशक्त झाली होती. फक्त लिक्विड फूड तिला देत होते तेव्हा. मला इतकं टेन्शन यायला लागलं होत. रोज भीतीदायक बातम्या वाचत आणि पाहत होते. जेष्ठांना कोरोनाचा अधिक धोका. आईला डायबिटीस, बीपी, ब्रेन हॅमरेज सगळंच इन्फेक्शन होण्याची टेंडन्सी म्हणजे तिलाही कोरोनाचा धोका अधिक. हे सगळं आव्हान पेलायचे कसं एकटीने? हा यक्ष प्रश्न उभा राहिला होता. मग मला हि पिल्लाची गोष्ट आठवली. अरे जर आपण एका पिल्लासाठी इतकं केलं. इथे तर आई होती. आईला काही होऊ द्यायचं नाही. वाटेल ते कष्ट पडले तरी चालतील हे मनाशी पक्कं केलं.

अनेक जवळच्या लोकांनी यावेळी त्यांच्या स्वभावातले खरे रंग दाखवले. यात काही नातेवाईक होते तसे काही मित्र मैत्रिणीही होते. ज्यांना आपण जवळच मानलं. ज्यांच्यासाठी आपण सर्वस्व देत आलो. ते मात्र स्वतःच्याच विश्वात मश्गुल राहिले. हा धक्का मोठा होता. माणसं अशी वागू शकतात. मग म्हटलं ठीक आहे. यानिमित्ताने मुखवट्यामागचे खरे चेहरे तर समोर आले.

नाही म्हणायला एक मैत्रीण तिला जमेल तसं येत राहिली. एका बाजूला दोन भाऊ आजारी. दुसरीकडे आई आणि तिसऱ्या बाजूला माझी स्वतःची तब्येत बिघडली होती. पण आईला या सगळ्या आजारपणातून बाहेर काढायचं हे एकच लक्ष्य डोळ्यासमोर होत. दिवसरात्र इतकं झोकून दिल स्वतःला की सगळंच विसरले. सोशल मीडिया, फोन करणं घेणं सगळी काम गुंडाळून ठेवली. जे जितकं गरजेचं आहे तितकंच बोलले. आणि या मेहनतीला यश आलं.

आज तुम्हा सगळ्यांना हे सांगायला आनंद वाटतोय की एकटीने हे शिवधनुष्य पेलू शकले. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने आणि शुभेच्छांमुळे आई एका मोठ्या धोक्यातून बाहेर आली. तिच्या नाकाची नळी गेली. ती बोलू लागलीय. आणि जेवू खाऊ लागलीय.

खूप जणांचं योगदान यात आहे. माझा चुलत भाऊ आणि भाऊ दोघांची साथ नातेवाईक, मित्र मैत्रिणी, जिथे काम केलं तिथले अधिकारी, सहकारी, कर्मचारी, खुपजण कितीजणांनी नाव घेऊ. या सगळ्यांना जेव्हा आई बारी झाल्याचं कळवलं तेव्हा त्यांनाही खूप आनंद झाला. अर्थात अजून खूप पल्ला गाठायचा आहे. बेड सोर बरे होतायत अजून आणि कॅथेटरसुद्धा जायला हवी आहे. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने तेही जाईल. आणि आई पुन्हा पहिल्यासारखी चालू लागेल याची खात्री आहे.

आई एका बाजूला बरी होतेय याचा आनंद आहे. मी मात्र प्रचंड पाठ दुखीने त्रस्त आहे. पण तिच्या बऱ्या होण्याचा आनंद या वेदना सहन करण्याचं बळ देतो. तिचा हा प्रवास तुम्हा सर्वांबरोबर शेअर करतेय. यात मी केलाय हा अभिनिवेश नाही. बरेचदा माणसं खचून जातात. मेडिकल मॅनेजमेंट हा दीर्घ काळ चालणारा प्रवास आहे. ज्यावर फार कुणी बोलत नाही. या प्रवासात तुमची आर्थिक, मानसिक, शारीरिक आणि भावनिक सगळीच गणित कोलमडतात अनेकता निराशा येते लोकांना. मलाही आली. पण सुदैवाने माझी जिवाभावाची काही माणसं सोबत राहिली. काहींनी जरी दगा दिला असला तरी काही सुहृद भक्कमपणे पाठीशी उभे राहिले.

त्यांनी मला भक्कम सावरलं. म्हणूनच हा टप्पा पूर्ण करू शकले. हे तीन साडेतीन महिने सोडले तर माझे भाऊ सोबत होते. त्यांच्याशिवाय तसाच काही वडीलधारे नातेवाईक काही मित्र मैत्रिणी यांच्याशिवाय हा दिवस दिसला नसता. तुम्ही सर्वही होतातच. मधल्या काळात अनेकांचे वॉट्सअप, मेसेंजर, फोनवर मेसेज आणि प्रत्यक्ष फोनही आले. काहींना उत्तर देऊ शकले. काहींना आजही देता अली नाहीत. या सर्वांची माफी मागते. आजही आई प्रायोरिटी असल्याने. माझ्याकडे फार वेळ उरत नाही. त्यामुळे समजून घ्याल अशी आशा आहे.

पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार. असेच आशीर्वाद सोबत राहू द्या. तुमच्याही आयुष्यात असे प्रसंग आले तर हिम्मत हरू नका. आपल्या जवळच्या लोकांशी बोला. मार्ग मिळेल. दहा दरवाजे बंद होतात. पण परमेश्वर असतो. मी गेले दिड वर्ष त्याचा प्रत्यय घेतेय. मी फार श्रद्धाळू नाही तरी. इतक्या उत्तर चढावांमधून जात असताना. अनेक निराशेचे क्षण अनुभवताना. कशासाठी इतका पैसे खर्च करतेयस. आई जगणार असं तुला वाटत का? असे जहरी प्रश्न पचवूनही मी केवळ श्रद्धेने आईची सेवा करत राहिले. भाऊसुद्धा करत राहिला. सबुरी ठेवली आणि हे फळ बरोबर वर्षाने पदरात पडलं. तेव्हा सकारात्मक राहा आपला आतला आवाज ऐका.

आपण शेवटी माणसं आहोत. जंगलाचा नियम न वापरता आपल्या माणसांसाठी जगायला हवं आणि त्यांना जागवायला हवं. आयुष्यात काम काय होत राहतात. आई वडील मात्र एकदाच मिळतात. काम आणि आई यात मी आईला स्वीकारलं. कारण बाहेर काम करत असताना आईला काही झालं असत तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. कधी कधी पाठीच्या वेदना असह्य असतात. इतरही दुखणी डोकं वर काढू लागतात. तेव्हा असं वाटत मी नाही राहिले तरी शेवटपर्यंत आईसाठी काही कमी पडू दिल नाही. तिची सेवा करता आली हे समाधान अनमोल आहे.

खूप बोलायचं आहे पण थांबते. मित्रहो, असे प्रसंग आले तर कधी हार मानू नका इतकंच सांगेन. असच प्रेम करत राहा. आईसाठी प्रार्थना करत राहा. लव्ह यु ऑल...

सस्नेह,

- तृप्ती एआर

Similar News