सुन्न करणारा आणखी एक बालमृत्यू

Update: 2019-12-23 11:35 GMT

लंकाताई राजेभाऊ खरात या महिलेची बातमी दोन-तीन महिन्यांपूर्वी माध्यमांत छापून आली. २१ ते १७ वेळा बाळंतीन होणारी महिला म्हणून माध्यमांध्ये लंकाबाई झळकल्या. यानंतर बीड जिल्ह्यातील आरोग्य प्रशासन, अंगणवाडी विभाग खडबडून जागे झाले. माजलगावच्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लंकाताईची सोनोग्राफी, मदर अँन्ड चाईल्ड ट्रँकींग सिस्टीम कार्ड, रक्त तपासणी सगळं करून बीडच्या सरकारी दवाखान्यात दाखल केले.

नवरा दारूडा आणि कधीतरी काम करत असल्याने घरातील ७ मुले जगवण्याची जबाबदारी लंकाबाईंवर होती. यामुळे दवाखान्यात न थांबण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्या तशा अवस्थेत काम करण्यासाठी निघाल्या. दरम्यानच्या काळात तहसिल कार्यालयाने त्यांना रेशन कार्ड तयार करून दिले. त्या कारखान्याला जाऊ लागल्या.

काही दिवसांपूर्वी त्यांच्या नातेवाईकांकडून समजले होते की, त्यांचं मूल होऊन वारलं. पण ते कसे वारले हे सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांनी स्पष्ट केलं. कर्नाटकमधील शंकेश्वर कारखान्याला जात असतांना लंकाबाईंनी ३ दिवस ट्रॅक्टरचा प्रवास केला. त्यात बसणाऱ्या धक्क्यामुळे आणि गाडीत एकाच जागेवर बसून राहील्याने ओटीपोटातच गुदमरून त्या बाळाचा मृत्यू झाला. ट्रॅक्टरमध्येच त्यांची प्रसुती झाली. दुसऱ्या दिवशी त्या चालत दवाखान्यात गेल्या आणि इंजेक्शन घेतले. यावेळेस मुकादम, कारखान्याने त्यांच्या उपचाराची कसलीही सोय केली नाही.

खरंतर हा प्रश्न लंकाताईचा एकटीचा नाही. साखर कारखान्यासाठी स्थलांतरित होणाऱ्या गरोदर, स्तनदा माता यांची नोंदणी, फडावर आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी कारखाना, मुकादम, सरकार कोणीही ठोस प्रयत्न करत नाहीत. यामुळे अशा घटना वारंवार घडतांना दिसतात. याची कुठेही नोंद घेतली जात नाही.

लंकाताई यांच्यासोबत त्यांच्या ५ मुली आहेत. त्या शिक्षण घेण्याच्या वयाच्या असून त्या मुलीही साखर कारखान्यावर आहेत. त्यांच्याकडेही कोणी लक्ष देत नाही. या मुलीही येणाऱ्या काळातील माता आहेत. त्या ही शारिरीकरित्या सदृढ असण्याची शक्यता नाही. पालावरील मुली जर शाळेत जावू लागल्या तर बालामातांचे प्रमाण कमी होऊ शकते. माता मृत्यु टाळून बालमृत्युही कमी करता येऊ शकतील. पालावर दारू पोहचली पण अनेक सुविधा पोहोचलेल्या नाहीत. त्या पोहोचल्या असत्या तर कदाचित लंकाताईची मुलगी पोटात मेली नसती.

राज्यात माता मृत्यूची संख्या गंभीर असून दर १ लाख प्रसूतीमागे माता मृत्युचा दर ६१ इतका आहे. त्यामुळे माता मृत्युचं प्रमाण प्रतिलाखामागे ३० एवढे कमी करायचे आहे. यात माता जर शारिरीकरित्या सदृढ नसतील तर माता मृत्यबरोबर बालमृत्यू दरही वाढतच जाईल.

लंकाबाईची मुलगी जन्मताच गेली असली तरी लंकाबाईसारख्या महिला या आजही उसतोडणी कामगार म्हणून काम करतात. त्या पालावर राहतात, त्या शिक्षणापासून वंचित आहेत, त्यांच्या अधिकारांपासूनही वंचितच आहेत. राज्यातील माता मृत्यूचे प्रमाण वाढत असल्यामुळे आता यावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यातील आरोग्य विभाग पुढे आला आहे. यासाठी या विभागाने विशेष आराखडा तयार केला असून त्याअंतर्गत सर्व जिल्ह्यांतील आरोग्य विभागाला माता मृत्यूच्या सनियत्रंण आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असं असले तरी या आराखड्यात जोपर्यंत प्रत्येक लंकाबाईला स्थान मिळणार नाही तोपर्यंत मातामृत्यू आणि बालकमृत्यू यांची आकडेवारी वाढतच राहिल.

 

-प्रियदर्शिनी हिंगे

Similar News