मृत्यू...आठवणीतला!

Update: 2020-01-01 11:16 GMT

13 डिसेंबर 2008 ला दुपारी माझा अपघात झाला. त्यानंतर साधारण आठ एक दिवस काही समजत नव्हतं. दरम्यान पायावर एक ऑपरेशन झालं होतं. शुद्धीवर आल्यावर आयसीयू मध्ये असल्याचं लक्षात आलं. आयसीयू मध्ये वेगवेगळ्या वयाचे, आजाराचे, अपघाताचे पेंशट. कुणी रिकव्हर होत आलेलं, कुणी अत्यावस्थ्य असलेला, कुणी शेवटचा श्वास घेणारा... असे आम्ही सगळे त्या आयसीयूत. एका बेडच्या मध्ये काचेच्या भिंती, त्या भिंती पल्याडचं काही दिसू नये यासाठी लावलेले जाड पडदे. आणि शांतता....

अधून मधून नर्सेस, वॉर्डबॉय, मावशी यांचा येणारा आवाज, राऊंडला येणारे डॉक्तर आणि जवळ थांबु देत नसल्यानं लांबुन पाहून जाणारे घरचे....यात एक आवाज सतत यायचा तो म्हणजे व्हेंटिलेटरचा, बीपी मोजणाऱ्या मशीनचा....नंतर नंतर हा आवाज सवयीचा झाला. बऱ्या पैकी शुद्धीवर आल्यावर आसपास कोणकोणते पेशंट आहेत, काय झालं याची चौकशी नर्सकडे करायला सुरवात. मग गप्पा. 24 तास कसे घालावायचे हा प्रश्न नव्हता. कारण झोपेचं इंजेक्शन किंवा गोळी त्यावरच उत्तर असायचं. होणाऱ्या वेदना थांबविण्यासाठी वेदनाशामक गोळ्या, सलाईन...काय काय सोबतीला होत....एक थाटचं होता आयसीयूत. काही दिवसांनी रुळले तिथं. ओळखी झाल्या. पण मला इथून बाहेर कधी काढणार यावर नक्की उत्तरं कोणी देत नव्हतं. दिवस कोणता आणि रात्री कोणती हे समजत नव्हतं. एक्सरे किंवा एमआरआय करण्यासाठी आयसीयू मधून बाहेर काढल्यावर पिंजऱ्यातून बाहेर पडल्यासारखं वाटायचं.

त्यातच 31 डिसेंबर उजाडलं. आज आयसीयू मध्ये नेहमी पेक्षा जास्त गडबड सुरु होती. डॉक्तर, नर्सेस, वॉर्डबॉय, मामा, मावशी साऱ्यांची पळापळ सुरु होती. काय सुरु आहे समजत नव्हतं. मग एक नर्स सलाईन लावायला आली. तिला विचारलं आज काय एवढी धावपळ सुरुये. त्यावर ती म्हणाली आज थर्टी फस्ट आहे ना. मग आयसीयू रिकामा करतोय. जे पेशंट बऱ्यापैकी रिकव्हर झालेत त्यांना रुम मध्ये शिफ्ट करणार. रात्री ट्रामाचे पेशंट खूप येतात. ड्रंक अँड ड्राइव्हचे. मग आयत्यावेळी गोंधळ नको म्हणून आम्ही आधीच तयारी करतो. मी हे ऐकून, मनातच काय नियोजन आहे, असं म्हणत या निमित्तानं आपली या तुरुंगातून सुटका होणार म्हणून खुश झाले. डॉक्तर राऊंडला आल्यावर त्यांना विचारलं, मला पण इथून हलवणार का.? असा प्रश्न केला, त्यावर घाई काय गं, असं म्हणत ते पुढं निघून गेले. मग लक्षात आलं आपली काय सुटका नाही, इथंच थर्टी फस्ट साजरा करायचा. पर्याय नसल्यानं ठीक आहे इतकंच म्हणाले.

काही तासात बऱ्यापैकी आयसीयू रिकामा झाला. दुपारची वेळ. भयाण शांतता...वेळ सरत नव्हती. एकीकडं लोक नवीन वर्षाचं स्वागत करताना इथं काय सुरू आहे, हा प्रश्न सतावत होता. पण लगेच ध्यानात आलं, अरे आपण पण रिपोर्टरिंग करताना अशी आधी तयारी करतोच कि. किती बंदोबस्त, किती पाइंट, किती केसेस, किती अपघात, त्यातले फेटल किती, गंभीर किती, किरकोळ किती मांडतोच कि आपल्या बातमीत. ठीक आहे असं स्वतःला म्हणत असतानाच समोर उभ्या असलेल्या नर्सने गोळ्या इंजेक्शन देऊन झोप आता असं सांगितलं.

इंजेक्शनने झोप लागली. डोकं जड झालं होतं. समोरच्या बेड वरुन खूप आवाज येत होता, एक आजोबा होते त्यांना हार्ट अटॅक आला होता. सर्व डॉक्तर त्यांना वाचवायचा प्रयन्त करत होते. पण तो प्रयत्न फसला. ते आजोबा गेले. तो पर्यत अपघाताचे इतरही पेशंट सोबतीला आले होते. आयसीयूतली शांतता संपली होती. माझी झोप हि उडाली होती. समोर मृत्यू झाला होता. इतक्यात अजून दोन जणांना आयसीयूत आणलं गेलं. एक माझ्या उजव्या हाताच्या तर एक डाव्या हाताच्या कॉटवर. आता पर्यत समोर असलेले डॉक्तर विभागले गेले. त्या दोघांवर उपचार सुरु झाले. पुन्हा तीच पळापळ. तोपर्यत मध्यरात्र झाली होती. माझ्या कॉट जवळचा मोठा लाईट बंद होता. एक मंद प्रकाश देणारा झिरो बल्प पिवळा प्रकाश देत होता. काही क्षणांपुर्वी समोर मृत्यू पाहिल्यनं आणि दोन्ही बाजूला अत्यवस्थ पेशंट आल्याने, एक अनामिक भीती वाटू लागली. आता आपणही जाणार का..असा विचार सुरु झाला.

त्यामुळं बीपी वाढल्याचं मशीनने अलार्म देऊन कळवलं. तो ऐकून नर्स धावत आली. माझ्या कपाळावर घाम फुटला होता. तिनं तपासत काही होत नाही, असं म्हणतं एक इंजेक्शन दिलं. डोळ्यावर पट्टी ठेवली, पडद्याला फट होती त्यातून पलीकडचं दिसत होतं. म्हणून पदडा नीट सरकवून बंद केला. मला झोपवायचा प्रयत्न करत काही वेळ थांबली, पण डोळे काही बंद होईनात. डोळे बंद केली की मी गेले...असं वाटून पुन्हा घाम फुटायचा. वेळ काही सरता सरेना....तितक्यात अजून एक ट्रामाचा पेशंट आमच्यात आला. मग नर्स तिकडे गेली. मी तशीच एकटी... आणि मग उजव्या हाताला जो पेशंट होता त्याला वाचविता न आल्यानं तो गेला. इतका वेळ तिथं सुरु असलेली गडबड आवाज एका क्षणात थांबला. दिड तासातला दुसरा मृत्यू....माझी घालमेल...आता डाव्या हाताला तिचं गडबड, तेच प्रयत्न, तोच आवाज.....पण काही वेळात तिथं हि शांतता.....तिसरा मृत्यू......हुश्य....इकडे पुन्हा बीपी वाढलं.....पुन्हा इंजेक्शन पण डोळा काही लागेना...नर्स येत जात होती, समजावयाचा प्रयत्न करत होती. झोप गं, वाटले बरं....पण मनात भीती...माझ आपलं एकच सुरु मला इथून बाहेर काढा...शेवटी अजून एक इंजेक्शन दिल गेलं न मला झोप लागली. काही तासांनी जाग आली तेव्हा पुन्हा सगळं आठवलं. स्वताचा स्वताच्या तोंडाहून हात फिरवत सगळं ओके ना, याची खात्री केली.....थोडं हसायला आलं...आणि काही दिवसांनी मी आयसीयू मधून मृत्यूला भेटून बाहेर आले.....

- अश्विनी सातव-डोके

Similar News