नव्या घरात शिफ्ट होताना...

Update: 2019-12-14 08:19 GMT

शिफ्टिंग नेहमीच त्रासदायक असतं, मग ते घरच असो वा व्यवसायचं. मुळात नोकरी न करता स्वतःचं काही नवीन करावं का असा विचार करणाऱ्या टिपिकल मानसिकतेतून बाहेर पडून व्यवसायात उतरणं अवघड. कारण समोर यश कधीच दिसत नसतं. दिसत असतात ते अडथळे, अंधार आणि अपयश आलं तर लोक काय म्हणतील ही भीती. बायकांना कदाचित जरा जास्तच.

पण जेव्हा निर्णय पक्का होतो तेव्हा अडथळे पार करण्याची उर्मी, अंधारात छोटासा का होईना पण चाचपडत पुढे नेणारा सहकाऱ्यांचा दिवा आणि अपयशाची भीतीच वाटू नये म्हणून यशाला गवसणी घालण्याची अतीव इच्छा सोबत करू लागतात.

LekhaMeghana यांनाही हे सर्व अनुभव आले जेव्हा त्यांनी UniKraftz सुरू केले. लेखाचा नवरा म्हणून तिला पाठींबा व सुरुवातीला थोडी आर्थिक मदत यापलीकडे मी तिला कोणतीही मदत करू शकत नव्हतो. मेघना व तिच्या नवऱ्याकडे देखील हीच स्थिती. जो व्यवसाय निवडला त्याची पूर्ण माहिती घेणे, research करणे, कामासाठी जागा भाड्याने घेणे, स्वस्त कच्चा माल शोधणे, आर्थिक बाबी सांभाळणे व पैसे कमावणे हे सर्व त्यांनाच करणे गरजेचे होते व जे फक्त व फक्त त्यांनीच केले.

ही पोस्ट लिहिण्याचे कारण म्हणजे त्या दोघीनी व्यवसायात घेतलेली छोटीशी उडी. जुन्या छोट्याशा खोलीतून बाहेर पडून प्रथमच जमलेले पैसे वापरून एक गाळा भाड्याने घेतला आहे. शिफ्टिंग हे त्याचच. ना मी ना अनंत. सामान हलवण्यापासून ते गाळा रंगवण्यापर्यन्त प्रत्येक गोष्ट दोघीनी केली. टेम्पोवाल्यासोबत घासाघीस ते गाळा उघडल्यावर पैसे मागायला आलेल्या अनाहूत पाहुण्यासोबत 'बोलणी' देखील.

कोणाचे फार कौतुक करू नये आणि व्यवसायाच्या सुरुवातीला तर अजिबातच नको, हे माझे मत आहेच. पण घेत असलेल्या शारीरिक व बौद्धिक कष्टांचे appreciation झालेच पाहिजे आणि ते करण्यासाठीच हा मेसेज.

तुम्हाला येत असलेल्या ऑर्डर्स चौपट व्हाव्यात व तुम्ही अजून प्रगती साधावी यासाठी दोघींना सदिच्छा! बायकोने अधिकाधिक मोठे व्हावे यासाठी तिला डबल ऑल द बेस्ट!!!!

 

 

-अलोक देशपांडे यांच्या फेसबुकवॉल वरून साभार

Similar News