‘या व्यक्तीमुळे मी इथपर्यंत पोहोचले...’ खासदार वंदना चव्हाण यांनी मानले आभार

Update: 2020-09-19 02:49 GMT

राज्यसभेच्या उपसभापतींच्या पॅनेल मध्ये निवड झाल्यानंतर शुक्रवारी देशातील सर्वाच्च सभागृहाचे पीठासीन म्हणून कामकाज करण्याची संधी खासदार वंदना चव्हाण यांना प्रथमच मिळाली. राज्यसभेचे कामकाज शुक्रवारी सकाळी नऊ वाजता सुरू झाले. साडेदहाच्या सुमारास चव्हाण पीठासीन अधिकारी म्हणून विराजमान झाल्या, सभागृहात चालू असलेल्या चर्चेदरम्यान त्या येताच सभागृहातील सदस्यांनी बाके वाजवून त्यांचे स्वागत केले. त्यानंतर काही वेळ चव्हाण यांनी सभागृहाचे कामकाज बघितले.

या नंतर व्यक्त केलेल्या मनोगतात त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आभार मानले आहेत. “भारतीय लोकशाही चा गाभारा असलेल्या राज्यसभेच्या सभागृहात अनेक महान नेत्यांनी आपले योगदान दिले आहे. गेली ८ वर्षे देशाच्या या सर्वाेच्च सभागृहात सदस्य म्हणून काम करत आहे. मार्गदर्शक व नेते आदरणीय शरद पवार साहेबांनी राज्यसभेवर जाण्याची संधी दिली. त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचले.”

“सभागृहात अनेक महत्वांच्या विधेयकांवरील चर्चांमध्ये सहभागी झाले, यावेळी मी केलेल्या काही सूचनांचा समावेश संबंधित विधेयकांत झाला याचा विशेष आनंद आहे. तर विविध घटकांचे प्रश्न सभागृहात मांडता आले आणि यामुळे काही अंशी का होईना त्यांना न्याय देता आला याचे समाधान आहे. त्याचसोबत संसदीय समितींच्या मार्फत प्रतिनीधीत्व करत असताना नानाविविध विषयांचे आकलन झाले, विधायक निर्णय प्रक्रियेत सहभागी होता आले. या सर्वांची परिणीती म्हणेज सतत सभागृहात कार्यमग्न राहाता आले.

आता सभागृहात पीठासीन म्हणून अधिकची जबाबदारी यानिमित्ताने मला पार पाडावी लागणार आहे याची कल्पना आहे; वैभवशाली परंपरा असलेल्या राज्यसभेचे पीठासीन म्हणून कामकाज पाहण्याची संधी मिळणं हे मी माझे भाग्य समजते. सभागृहाच्या या महान परंपरेचे वैभव व गरिमा अबाधित ठेवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल” अशी भावना खासदार वंदना चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली.

दरम्यान, देशाचे उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती व्यैंकय्या नायडू यांनी जुलै महिन्यात उपसभापती पॅनेल मध्ये नविन सहा सदस्यांची निवड केली होती. सर्व सदस्य वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधीत्त्व सभागृहात करतात. सभागृहातील कामगिरी, अनुभव आणि ज्येष्ठता या निकषांवर सहा सदस्यांची निवड सभापती करतात आणि यावर्षीच्या पॅनेल मध्ये खासदार वंदना चव्हाण यांचा समावेश यामध्ये करण्यात आला.

Similar News