रिपब्लिक टीव्हीच्या महिला पत्रकाराचा राजीनामा...

Update: 2020-09-10 08:57 GMT

सध्या अर्णब गोस्वामीच्या (arnab goswami) रिपब्लिक टीव्हीवर सुशांत सिंह राजपूत प्रकरण जोरदारपणे दाखवले जात आहे. मात्र, या सर्वांमध्ये ‘सत्य सोडून बाकी सारं’ दाखवलं जात असल्याचा आरोप करत महिला पत्रकाराने राजीनामा दिला आहे. काय म्हटलंय या पत्रकाराने...

शांताश्री सरकार या पत्रकार स्त्रीने रिपब्लिक टीव्हीमधून राजिनामा दिला आहे. आणि त्याबद्दल तिने ट्वीटरवर लिहिले आहे.

ती लिहिते-

मी अखेर हे सोशल मिडियावर उघड करते आहे. मी रिपब्लिक टीव्ही सोडला ते नैतिक कारणांमुळे. अजूनही माझा नोटिस दिल्यानंतरचा कालावधी सुरू आहे, पण तरीही मला आता रिपब्लिक टीव्हीने रिया चक्रवर्ती विरुद्ध चालवलेल्या अतिशय आक्रमक अशा हेतुपूर्वक मोहिमेबद्दल लिहिलेच पाहिजे अशी वेळ आली आहे. मला बोललेच पाहिजे.

पत्रकारिता ही सत्य उजेडात आणण्यासाठी केली जाते असं मला शिकवलं गेलं होतं. सुशांतच्या या प्रकरणात मात्र मला सर्व तपशील खोदून काढायला सांगितले गेले- सत्य सोडून बाकी सारं. मी शोध घेत असताना मला दोन्ही कुटुंबांशी बोलल्यानंतर हे कळले की सुशांतला अवसाद किंवा डिप्रेशनचा त्रास होत असे. पण रिपब्लिकच्या अजेंड्याला हे मान्य करणे परवडत नव्हते.

मला या प्रकरणातील आर्थिक कंगोरा काय आहे त्याचा तपास करायला सांगितले गेले. रियाच्या वडिलांच्या खात्याचे तपशील शोधायला सांगितले गेले. त्यांच्या मालकीच्या दोन फ्लॅट्समध्ये सुशांतचा पैसा गुंतवण्यात आल्याचे त्यात कोणत्याही प्रकारे दिसत नव्हते, सिद्ध होऊ शकत नव्हते. अर्थातच हेही रिपब्लिकच्या अजेंड्याला सोयीचे नव्हते.

मग मी पाहिलं, माझे अनेक सहकारी रियाच्या घरी गेलेल्या, जाऊन आलेल्या कुणालाही सतावू लागले. पोलिसांनाच काय अगदी साध्या डिलिवरी करणाऱ्या मुलांनाही त्यांनी भंडावून सोडले. ओरडाआऱडा करणे आणि बाईचे कपडे खेचणे यातून आपली चॅनेलमधली वट वाढते असा त्यांचा समज आहे.

हे सारे वृत्तांकन पाहून, एका स्त्रीला जाहीररित्या नाहक बदनाम केले जात असलेले पाहून मी संतप्त होत होते, तेव्हाच मी त्यांना हव्या तसल्या बातम्या लावत नाही म्हणून मला त्रास दिला जाऊ लागला. जराही विश्रांती न देता माझ्यावर काम टाकले जाऊ लागले. एकदा तर मी ७२ तास न थांबता काम केले.

रिपब्लिक टीव्हीमध्ये पत्रकारितेचा मुडदाच पडला आहे. आजवर मी केलेल्या वृत्तांकनात कधीही एका विशिष्ट बाजूला झुकले नव्हते. आणि आज एका स्त्रीला दोषी ठरवण्यासाठी नैतिकता विकण्याचा प्रश्न आला तेव्हा मी भूमिका घेतली आहे. रियाला न्याय मिळालाच पाहिजे. #JusticeForRhea

सुशांत राजपूतचे कट्टर फॅन्स जे जे असतील, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की आपल्या बॉयफ्रेंडबरोबर ड्रग्ज घेतल्याचा आरोप कुटुंबियांनी लावलेला नाही. ते आरोप आहेत, खुनाचे आणि पैसा लुटल्याचे- या आरोपांची चौकशी सुरू आहे. मी स्वतः एक बंगाली आणि एक स्त्री आहे, आणि या देशात सत्य सहन केले जात नाही याची मला शरम वाटते.

 

Similar News