कौटुंबिक हिंसाचार असाही...

Update: 2020-04-22 05:36 GMT

कौटुंबिक हिंसाचाराविषयी बहुतेकदा शारीरिक हिंसेचा विचार प्रामुख्याने होतो. एखादी थप्पड, विडी-सिगारेटचे चटके ते सहन न होण्याइतकी मारझोड अनेकींच्या वाट्याला येते. मानसिक पातळीवर होणार्‍या छळाविषयी आजकाल थोडंफार बोललं जाऊ लागलं आहे. पण त्यापलीकडेही निराळ्या प्रकारचा हिंसाचार बाईच्या वाटणीला येतो त्याकडे कुणी फार लक्ष देत नाही, ज्याविषयी आपण आज जाणून घेऊ या.

सामाजिकदृष्ट्या लग्न करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अपत्यप्राप्ती. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा तर मुलगी म्हणजे परक्याचं धन असं पुरुषप्रधान समाज समजतो आणि सगळ्यांना मुलगा हवा असतो. पुरुषप्रधान समाजात वाढलेली बाईही या कल्पनांचा बळी असते. यामुळे बाईला निरनिराळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं. उदाहरणार्थ पोटातल्या गर्भाच्या लिंग तपासणीसाठी बाईवर बळजबरी करणे. हा मानसिक हिंसाचारच आहे. १९९४ साली गर्भजल परीक्षाबंदी कायदा झाला आणि २००३ मध्ये त्याच्या सुधारित रुपाला मान्यता मिळाली; ज्यात अशा तपासणीसाठी अल्ट्रासोनोग्राफी आणि इतर नव्या तंत्रज्ञानाच्या वापरावरही बंदी घातली आहे. तेव्हापासून या प्रकारे गर्भाचे लिंग जाणून घेणे किंवा डॉक्टरांनी ते सांगणे हे बेकायदेशीर आहे. तरीही अनेकदा बाईच्या मर्जीविरुद्ध ही तपासणी तिला करून घावी लागते. मुलीचा गर्भ असेल तर बाईवरील हा हिंसाचार गंभीर रुप धारण करु शकतो. बाईच्या मनात असो/नसो; कुटुंबाच्या दडपणामुळे स्त्री-गर्भाचा गर्भपात घडवून आणण्याची सक्ती होऊ शकते. यात मानसिक हिंसाचाराबरोबर बाईला निराळ्या प्रकारच्या शारीरिक हिंसेला तोंड द्यावं लागतं.

काही महिलांच्या गर्भपाताविषयीच्या अनुभवावरुन असं दिसतं की गर्भपात नैसर्गिक कारणांमुळे होवो किंवा पोटात स्त्री-गर्भ वाढत आहे म्हणून होवो; पोटात वाढत असलेला, आपल्या शरीरातून निर्माण झालेला जीव गर्भपातामुळे आपल्या मनाविरुद्ध नष्ट झाला याचा मनावर दीर्घकाळ वाईट परिणाम राहतो. डिप्रेशन सारखी मनस्थिती बराच काळ टिकून राहू शकते. याचा अर्थ असा की कुटुंबियांच्या दबावामुळे वा सामाजिक दडपणांमुळे गर्भपाताला तयार झालेली बाई कुटुंबातल्या हिंसाचाराचीच बळी असते.

नैसर्गिक गर्भधारणेसाठी (कृत्रिम गर्भधारणेच्या तुलनेत) स्त्री-पुरुषांनी शारीरिक पातळीवर एकत्र येण्याची, संभोगाची गरज असते. पण स्त्री-पुरुष केवळ मूल जन्माला घालण्याच्या इच्छेनेच एकत्र येत नाहीत. तर जवळिकीचा आनंदही त्यांच्यासाठी महत्वाचा असतो. अशा लैंगिक जवळिकीसाठी लग्न हा सर्वमान्य मार्ग आहेच पण नव्या पिढीत; विशेषतः शहरी भागात, लग्नाचं वय वाढत चालल्यामुळे लग्नाआधी स्त्री-पुरुषांनी एकत्र येणे, संभोगाचा आनंद घेणे हेही घडते. अशा वेळी गर्भधारणा होऊ नये याची काळजी लग्न झालेल्या, लग्न ठरलेल्या किंवा नुसतेच मित्रमैत्रिणी असणार्‍या लोकांना घ्यावी लागते. या संततिप्रतिबंधाच्या प्रक्रियेत महिलांना काय प्रकारच्या हिंसाचाराला कुटुंबात आणि कुटुंबाबाहेरही तोंड द्यावे लागते याचा विचार आपण पुढल्या भागात करु.

डॉ. विनिता बाळ, प्रीती करमरकर

नारी समता मंच, पुणे narisamata@gmail.com

Similar News