गोंधळलेल्या बापाची कहाणी

Update: 2020-03-24 11:34 GMT

२४ मार्च २००५ हाच तो दिवस ज्यादिवशी माझा पुनर्जन्म झाला. बाप म्हणून...

मी शार्दूलचा पप्पा आणि रोहिणी मम्मा झाली. २००५ ते २०२० या १५ वर्षात शार्दूलमुळं खूप काही मिळालं. आनंद, सुख, समाधान, अभिमान... खूप खूप... त्याबद्दल शार्दूलचे हृदयापासून आभार... पण एक गोष्ट इथं प्रांजळपणं मला सांगायचीय, ती म्हणजे अलिकडच्या काळात आमच्या बाप-लेकाच्या नात्यात काहीतरी गडबडतंय...

आमच्या दोघांचं अजिबात म्हणजे अजिबातच पटत नाही. साध्या साध्या गोष्टींवरुन आमच्यात भांडणं होतात. सुसंवाद कमी आणि वादच जास्त. मी X सांगितलं की हा YZ करणार... शिवाय त्यानं जे केलं ते कसं योग्य आहे, यावर ऑर्ग्युमेंट करणार... ऑर्ग्युमेंटमध्ये तो कुणाच्या बापाचं ऐकत नाही... मम्माकडून त्यानं हा गुण सही सही उचललाय. माँ से बेटा सवाई...

फेसबुकवर, इन्स्टाग्रामवर साहेब आहेत. पण तिथं त्यानं मला चक्क ब्लॉक केलंय. त्याचे सोशल मिडीयावरचे ‘कारनामे’ मला समजू नयेत, यासाठीचा त्याचा हा खटाटोप... (लेकीन हम भी उसके बाप है, हे त्याला अजून माहिती नसावं.... असो...)

सांगायचा मुद्दा हा की, गेल्या २-३ वर्षांत आमच्या नात्यात गोडवा राहिलेला नाही. हा जनरेशन गॅप आहे की मीच त्याला समजून घ्यायला कमी पडतोय, मला कळत नाही. त्याला जे हवंय ते सगळं सगळं त्याला देण्याचा प्रयत्न करतो. साहेबांनी इच्छा व्यक्त करण्याची खोटी, ती गोष्ट त्याला मिळते. काही हवं असेल की तो बरोबर लाडीगोडी लावतो. मी भाव नाही दिला तर तो रोहिणीला इमोशनल ब्लॅकमेल करतो. त्यानं एवढ्या लवकर रोहिणीला ‘डी-कोड’ केलंय की विचारु नका...

मला अजून रोहिणी पूर्ण समजलेली नाही. पण चिरंजीवांना तिचे प्लस, मायनस पॉईंट्स सगळे माहीत आहेत. कोणतं बटण दाबलं की रोहिणी गळाला लागते, याचा त्याचा गृहपाठ एकदम पक्का आहे. इमोशनल अत्याचार....

एकुलता एक असल्यानं आम्ही जे करतोय ते त्याचंच आहे. आम्ही काही उपकार करत नाही, तर तो त्याचा अधिकारच आहे, अशा अविर्भावात तो कधी कधी वागतो. आम्हाला आयुष्यात जे मिळालं नाही ते त्याला मिळावं असाच आमचाही प्रयत्न असतो. पण जेव्हा त्याची साधी जाणीवही त्याला नसते, तेव्हा वाईट वाटतं.

यंदा त्याचं दहावीचं वर्षं.... त्यानं सिरीअसली अभ्यास करावा, एवढीच माझी माफक अपेक्षा... तो पढाकू, पुस्तकी कीडा व्हावा असं मला कधीच वाटलं नाही. पण निदान चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळावं, एवढे तरी मार्क त्यानं मिळवायला नकोत? अभ्यास कर म्हटलं की त्याचं एकच उत्तर.... पप्पा, तू नको डोक्याला शॉट लावून घेऊस. तू चील मार....

अजून आयुष्यात काय करायचं, हे ठरलेलं नाही. अकरावीला कोणतं स्ट्रीम निवडायचं, त्याचा अतापता नाही. मित्र-मैत्रिणी, गेट टुगेदर, टाइमपास, टिकटॉक, फोटो आणि रॅप साँग असं मस्त धम्माल धम्माल चाललंय... ते सगळं करायला माझी काही हरकत नाही. पण त्या सगळ्यात अभ्यासावरचा, लाइफवरचा फोकस कुठंतरी हलतोय, हे त्याच्या लक्षात कधी आणि कसं येणार?

मी माझ्या मुलाशी (किंवा मुलीशी) मित्रासारखा वागणार, असं त्याचा जन्मही झाला नव्हता, तेव्हाच ठरवलं होतं... पण ‘पप्पा, तू म्हातारा झालास... तू डोक्यात जातोस...’ असं तो माझ्या तोंडावर सांगतो. तेव्हा खूप खूप वाईट वाटतं.

मी चांगला मित्र होऊ शकलो नाही.... निदान यापुढं चांगला बाप होण्याचा प्रयत्न नक्की करेन... तुझ्या प्रत्येक निर्णयात तुझ्या पाठिशी भक्कमपणे उभा राहण्याचा प्रयत्न करेन.... तुझ्या १५ व्या वाढदिवशी हा माझा संकल्प.

हॅप्पी बर्थडे बच्चा.... खूप खूप मोठा हो.... आय❤ यू....

सुनिल घुमे, पत्रकार, झी २४ तास

Similar News